सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 23 जून 2024 (10:05 IST)

IND vs BAN : भारताने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला,उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित

team india
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या सुपर एट टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी केली आणि सलग दुसरा विजय नोंदवून उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. दुसरीकडे बांगलादेशने सलग दुसरा सामना गमावल्याने त्यांच्यापुढील मार्ग जवळपास संपला आहे.
 
हार्दिक पांड्याच्या अर्धशतकानंतर, मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने सुपर एट टप्प्यातील सामन्यात बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 146 धावाच करू शकला. भारताची विजयी मोहीम अशीच सुरू राहिली आणि संघाने स्पर्धेतील सलग पाचवा सामना जिंकला. भारतीय संघाने सुपर एट टप्प्यातील सलग दोन सामने जिंकून उपांत्य फेरीतील आपला दावा पक्का केला आहे. आता 24 जून रोजी या टप्प्यातील अंतिम सामन्यात संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
 
भारतीय संघ सलग दोन सामने जिंकून चार गुणांसह गट एकमध्ये अव्वलस्थानी आला असून उपांत्य फेरीसाठी जवळपास पात्र ठरला आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ अंतिम चारसाठी पात्र ठरणार असल्याची माहिती आहे. या सामन्यात भारताकडून हार्दिक पांड्याने चमकदार कामगिरी केली. त्याने 50 धावांची नाबाद खेळी खेळली आणि एक विकेटही घेतली. हार्दिकला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. कुलदीपने दमदार गोलंदाजी करत तीन गडी बाद केले, तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 40 धावा केल्या. बांगलादेशचा संघ सुपर एटमध्ये सलग दुसरा सामना हरला आणि आता त्यांच्यासाठी दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. 
 
Edited by - Priya Dixit