रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: अँटिग्वा , शुक्रवार, 30 जून 2017 (10:41 IST)

दुसर्‍या विजयासाठी टीम इंडिया सज्ज

दुय्यम दर्जाच्या वेस्ट इंडीज संघाविरुद्ध (शुक्रवार) होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी निर्णायक आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
 
खांद्याच्या दुखापतीमुळे सलामीवीर लोकेश राहुल चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्या जागी शिखर धवनला संधी मिळाली. परंतु शिखर धवनने गेल्या स्पर्धेचीच परंपरा कायम राखताना कमालीचे सातत्य दाखवून देत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा “गोल्डन बॅट’ पुरस्कार पटकावला.
 
धवनने विंडीज दौऱ्यातही आपला धडाका कायम राखला आहे. या वेळी त्याला अजिंक्‍य रहाणेची साथ लाभली आहे. रोहित शर्माची जागा घेणाऱ्या रहाणेने तिसरे एकदिवसीय शतक झळकावले. तर धवन व कोहली यांनी शानदार अर्धशतके झळकावताना भारताला पाच बाद 310 अशी आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. विंडीजसाठी हे आव्हान गाठण्याजोगे नव्हतेच. भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव आणि नवा चेहरा कुलदीप यादव यांच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ अपेक्षेप्रमाणेच 205 धावांत गुंडाळला गेला आणि भारताला विंडीजच्या भूमीवरील सर्वात मोठ्या विजयाची नोंद करता आली.
 
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेला चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या पहिल्याच सामन्यात तीन बळी घेत सर्वांचीच वाहवा मिळविली. कर्णधार विराट कोहलीने रहाणे आणि कुलदीपवर प्रशंसेचा वर्षाव केला आहे. त्यामुळेच उद्याच्या सामन्यातही अजिंक्‍य रहाणे आणि कुलदीप यादव यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील.