भारतीय संघाचा प्रशिक्षक 10 जुलैला ठरणार
मुंबई- भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाचा फैसला येत्या 10 जुलैला होणार असल्याचे संकेत सीएबीचा अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने दिले आहेत. विराट कोहलशी झालेल्या कथित वादानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. या वादावर आणि नव्या प्रशिक्षकाबाबत अधिक बोलण्यासा गांगुलीने नकार दिला आहे.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचे पद सध्या रिक्त असून सचिन तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मण हे तिघे नव्या प्रशिक्षकाची निवड करणार आहेत. दरम्यान, बीसीसीआयची सर्वसाधरण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा दिलेल्या राजीनाम्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या सभेत मुख्य अंजेड्यावर एक राज्य, एक मत आणि पाच सदस्यीय टीम सिलेक्शनची नियुक्ती असणार आहे. दरम्यान, राज्यसंघटनांच्या प्रतिनिधींनी सीओएची भेट घेतली. यावर लोढा समितीच्या शिफारशींवर चर्चा केली गेली.
दरम्यान, श्रीनिवास यांनी बैठकीला हजेरी लावल्याने काही सदस्य नाराज आहेत. आता या बैठकीत कोणते नवे निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.