वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारतीय पुरुष क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून एक आठवडा उलटला असला तरी संपूर्ण देशभर या विजयाची चर्चा सुरू आहे.सोशल मीडियावर भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो आणि व्हीडिओने धुमाकूळ घातलाय. संघातल्या खेळाडूंची भाषणं, रिल्स आणि इतर गोष्टींवर सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे.
पाच जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया हॅण्डल्सवर एक व्हीडिओ शेअर करण्यात आला. विश्वचषक जिंकून भारतात परत आल्यानंतर चार जुलैला भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी गेला होता तेव्हाचा हा व्हीडिओ आहे.
या भेटीदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी त्यांचा अनुभव तिथे सांगितला आणि याच चर्चेचे व्हीडिओ शेअर करण्यात आले.
मग रोहित शर्माने मैदानावरचं गवत चाखून बघण्याचा किस्सा असो किंवा मग विराट कोहलीने अहंकारावर केलेलं भाष्य असो, प्रत्येक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या बातमीत आपण भारतीय संघातल्या खेळाडूंनी सांगितलेले अनुभव आणि ती चर्चा नेमकी काय होती हे सांगणार आहोत.
यासोबतच मुंबईतल्या विजयी परेडचे फोटो तुम्ही बघितलेच असतील पण ही परेड सुरू असताना, टीम इंडियात कोणकोणत्या गोष्टी घडत होत्या, या परेडमध्ये कोणत्या गमतीजमती घडल्या, हे आपण पाहूया. यातल्या बऱ्याचशा गोष्टी कॅमेऱ्यावर चित्रित झालेल्या नव्हत्या.
रोहितला खेळपट्टीवरील गवताचा प्रश्न विचारला गेला
टी- 20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मैदानावरील गवत चाखून बघितलं होतं आणि तो रोहित असं करत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता.
पंतप्रधान मोदी रोहित शर्माला म्हणाले की, "मला त्या क्षणाबद्दल जाणून घ्यायचं आहे, जेव्हा तू खेळपट्टीवरील गवत काढून ते चाखून बघितलं."
या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, "आम्ही विजयी झालो तो क्षण मला आयुष्यभर लक्षात ठेवायचा होता आणि म्हणून मला ते गवत चाखून बघायचं होतं. कारण त्याच खेळपट्टीवर खेळून आम्ही विश्वचषक जिंकलो होतो."
रोहित म्हणाला की, "आम्ही सगळ्यांनी यासाठी खूप वाट बघितली. कित्येक वेळा आम्ही विश्वचषक जिंकायच्या अगदी जवळ आलो होतो पण आम्हाला त्यावेळी यश मिळू शकलं नाही. पण यावेळी प्रत्येक खेळाडूच्या प्रयत्नांमुळे आम्ही हा विश्वचषक जिंकू शकलो."
रोहित म्हणाला, "जे काही घडलं ते त्या खेळपट्टीवर घडलं त्यामुळे त्या क्षणी ते माझ्या हातून घडलं."
कोहली म्हणाला - 'माणसाला अहंकार येतो'
कर्णधार रोहित शर्मा सोबतच संघातल्या इतरही खेळाडूंनी त्यांचा अनुभव सांगितला.
विराट कोहली म्हणाला की, "हा दिवस नेहमी माझ्या लक्षात राहील. कारण या संपूर्ण स्पर्धेत मला संघासाठी काहीही योगदान देता आलेलं नव्हतं."
कोहली म्हणाला की, "एक वेळ अशी आली होती जेव्हा मी राहुल (द्रविड) भाईंना म्हणालो होतो की मी स्वतःला आणि माझ्यासंघाला या स्पर्धेत न्याय दिला नाही. ते मला म्हणाले की मला आशा आहे, की संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा तू नक्की चांगली कामगिरी करशील."
कोहली म्हणाला की, "अंतिम सामन्यात जेव्हा सुरुवातीला तीन विकेट गेल्या, तेव्हा मला असं वाटलं की मला अशा परिस्थितीत पाठवण्यात आलं आहे. मी त्यानुसारच खेळू लागलो. नंतर मला कळलं की एखादी गोष्ट जर घडणार असेल तर ती कोणत्याही पद्धतीने होते म्हणजे होतेच."
कोहली म्हणाला की, "एवढ्या मोठ्या सामन्यात मी संघासाठी योगदान देऊ शकलो याचा मला आनंद आहे. अंतिम सामन्याचा संपूर्ण दिवस मी कधीही विसरू शकत नाही."
कोहलीने सांगितलं की, "तुमच्या डोक्यात अहंकार आला की तुम्ही खेळापासून दूर जाता. त्यामुळे अहंकारापासून लांब राहणं गरजेचं होतं. त्यादिवशी परिस्थितीच अशी झाली होती की अहंकारासाठी माझ्या मनात जागाच उरली नव्हती. त्यामुळे संघासाठी मला अहंकार मागे सोडावा लागला. त्यानंतर मी खेळाला सन्मान दिला आणि या खेळानेही मला मोठा सन्मान मिळवून दिला."
'इडली खाऊन जातोस की काय मैदानावर'
जसप्रीत बुमराह हा टी-20 विश्वचषकाचा 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'(मालिकावीर) ठरला.
या स्पर्धेत बुमराहला एकूण 15 विकेट मिळाल्या. या संपूर्ण स्पर्धेत बुमराहने अनेकवेळा मोक्याच्या क्षणी निर्णायक गोलंदाजी केली.
जसप्रीत बुमराह म्हणाले की, "भारतीय संघ संकटात असतो, सामन्यातील निर्णायक वेळ असतो, अवघड परिस्थिती असते तेव्हाच मला गोलंदाजी करायची असते. मी संघाची मदत करू शकतो तेव्हा मला खूप बरं वाटतं. या स्पर्धेत अनेकवेळा असे प्रसंग आले, जेव्हा मला माझ्या संघासाठी गोलंदाजी करायची होती. मी संघाची मदत करू शकलो आणि आम्ही ते सामने जिंकू शकलो."
अवघड परिस्थितीत गोलंदाजी करण्याबाबत बोलताना बुमराह म्हणाला की,"ही स्पर्धा खूप चांगली गेली. मी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकणाऱ्या संघात खेळलो आहे. यापेक्षा चांगली भावना मी कधीच अनुभवलेली नाही."
नरेंद्र मोदींनी, 'बुमराहला मैदानावर इडली खाऊन जातोस की काय?' असं विचारल्यावर, बुमराह म्हणाला की वेस्ट इंडिजमध्ये इडलीच मिळत नाही.
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या अविस्मरणीय कॅचबद्दल तो काय म्हणाला?
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये सोळा धावा हव्या असताना सूर्यकुमार यादवने जबरदस्त कॅच पकडला होता.
भारताच्या विश्वचषक विजयामध्ये सूर्यकुमारच्या या कॅचचं मोठं महत्त्व असल्याचंही बोललं गेलं.
या कॅचबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, "माझ्या हातात बॉल आला तेव्हा मला वाटलं की मी तो रोहित शर्माकडे फेकेन पण रोहित खूप दूर उभा होता. म्हणून आधी मी तो बॉल मैदानात उडवला आणि मध्ये जाऊन कॅच पकडली."
अशापद्धतीचे कॅच पकडण्याचा खूप सराव केला असल्याचंही त्याने सांगितलं.
हार्दिक आणि ऋषभ पंत काय म्हणाले?
हार्दिक पंड्याला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
पण टी-20 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याने टाकली. या ओव्हरमध्ये हार्दिकच्या गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला लक्ष्य गाठता आले नाही.
हार्दिक पांड्या म्हणाला, "सहा महिने चढ-उतारांनी भरलेले होते. जेव्हा मी मैदानावर गेलो तेव्हा लोकांनी मला खूप ट्रोल केले. मी हे ठरवलंच होतं की याला उत्तर द्यायचं असेल तर मी ते खेळातूनच देईन."यादरम्यान ऋषभ पंतने त्याच्या अपघाताबाबतही सांगितले.
ऋषभ म्हणाला, "त्या काळात लोक विचारायचे की मी कधी क्रिकेट खेळू शकेन की नाही..."
तो म्हणाला की, "मी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आधीपेक्षा चांगला खेळ करण्याचाच विचार करत होतो."
पंतप्रधान मोदींनी भारतीय संघातल्या युझवेंद्र चहल याच्याशीही संवाद साधला तसेच राहुल द्रविड यांनी देखील त्यांचे मत तिथे मांडलं.
आता 4 जुलैला मुंबईच्या विजयी परेडमध्ये काय घडलं हे आम्ही तुम्हाला सांगू.
मुंबईत टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक
मुंबईतील विजयी परेडमध्ये सहभागी झालेल्या बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे, यांना आलेला अनुभव इथे वाचा :
मरीन ड्राईव्हवर एवढी गर्दी मी कधीच पाहिली नव्हती. अगदी मुंबई मॅरेथॅानच्या दिवशीही नाही.
मरीन ड्राईव्हचा किलाचंद चौक जिथून रस्ता सरळ चर्चगेट स्टेशनकडे जातो, त्या सिग्नलजवळ पाचच्या आधीच बरीच गर्दी जमा झाली होती.
वानखेडे स्टेडियमलकतही रस्त्यावर प्रचंड गर्दी आणि काहीशी गोंधळासारखी स्थिती होती. दोन्ही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीसांच्या नाकी नऊ येताना दिसत होतं.
स्टेडियमच्या गेट नंबर 2, 3 आणि 4 मधून सामान्य लोकांना प्रवेश दिला जाणार होता. ही गेट्स 4 वाजता उघडणार होती आणि लोकांना 6 वाजेपर्यंत प्रवेश मिळेल असं आधी सांगण्यात आलं होतं.
पण तिथे दुपारी 2-2:30 वाजल्यापासूनच लोक जमा झाले होते. प्रवेश सुरू झाल्यावर अर्ध्या तासातच स्टेडियम भरल्याचं आतमध्ये पोहोचलेल्या लोकांनी मला सांगितलं.
आम्ही तोवर नरीमन पॅाइंटला पोहोचलो होतो. हे मरीन ड्राईव्हचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे आणि इथूनच परेड सुरू होणार होती.
या परिसरातील कार्यालयांतले कर्मचारी 2–3 वाजताच घरी निघाले होते. बसस्टँडसमोर रांगा लागल्या होत्या.
मी आणि कॅमेरामन शार्दूलनं नरीमन पॅाइंटजवळून चाहत्यांशी लाईव्ह बातचीत केली. तेव्हा आसपास अजूनही परेडची तयारी सुरू होती. बोर्ड्स लावले जात होते. झाडांच्या फांद्या तोडल्या जात होत्या.
4:30 वाजता आम्ही तिथून निघालो आणि वानखेडेच्या दिशेनं गाडीतून निघालो. हा रस्ता तोवर गाड्यांसाठी बंद केला होता आणि उरलेल्या गाड्या मंत्रालयाकडे वळवल्या जात होत्या.
किलाचंद चौकातल्या पोहोचलो, तोवर तिथे गर्दी ओसंडून वाहात होती. आम्ही कसेबसे रस्ता ओलांडून चर्चगेटच्या वाटेवर आलो. तिथून स्टेशनकडे आणि मग पुढे सीएसएमटीकडे प्रेस क्लबपाशी जाऊन थांबलो. हा भाग वानखेडेवासून दीड किलोमीटरवर आहे पण स्टेडियममधला घोषणा आणि गाण्यांचा आवाज तिथेही ऐकू येत होता.
आम्ही आलो तेव्हा संपूर्ण रस्त्यावर जणू चाहत्यांचे लोंढे येत होते. चर्चगेट स्टेशनवर घोषणा केल्या जात होत्या की मरीन ड्राईव्हवर जाऊ नका, गर्दी वाढली आहे.
अनेकांनी ऐकले आणि मागे फिरले. पण गाडीतून भरभरून लोक येतच होते.
मला आठवतंय, 2007 साली एयरपोर्ट ते वानखेडे असं 30 किमी अंतरावरून परेड नेली होती. त्यामुळे गर्दी विखुरली होती. 2011 साली कुठलं विशेष आयोजन केलेलं नसताना मंच जिंकल्यावर वानखेडे ते टीम हॅाटेल अशी रात्रीच विजययात्रा निघाली होती. मुंबई तेव्हा अख्खी रात्र जागली होती.
पण तो सोशल मीडिया पसरण्याच्या आधीचा काळ होता. तेव्हा लोक थांबून फोटो काढत होते पण रील्ससाठी गर्दी करत नव्हते. काल मी तिसऱ्यांदा विश्वचशकाचं सेलिब्रेशन पाहिलं. ते अभूतपूर्व, आनंददायी आणि भीतीदायकही होतं.
Published By- Priya Dixit