गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (17:35 IST)

ईशान किशन नक्की कोणत्या मानसिक थकव्याचा सामना करतोय?

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून त्यांना वगळण्यात आल्याच्या सर्व शक्यता भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने फेटाळून लावल्या आहेत.
 
ईशान किशनला अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
 
ईशान किशनने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान मानसिक थकवा जाणवत असल्याचं कारण देत विश्रांतीची मागणी केली होती, असं राहुल द्रविडने बुधवारी स्पष्ट केलं.
 
ईशान किशनची विनंती संघ व्यवस्थापनाने मान्य केल्याचं द्रविडने सांगितलं.
 
निवडीसाठी ईशान किशन स्वत: उपलब्ध नव्हता, पण जेव्हा त्याला स्वत: बरं असल्याचं वाटू लागेल तेव्हा तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये नक्की पुनरागमन करेल, असंही द्रविड म्हणाला.
 
ईशानवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नसून तो निवडीसाठी उपलब्ध नसल्याचा पुनरूच्चार राहुलने केला. दक्षिण आफ्रिकेत ईशानने स्वत:हून विश्रांतीसाठी विनंती केली आणि आम्ही ती मान्य केली.
 
अफगाणिस्तानसोबत सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत द्रविडने या सर्व गोष्टींचा खुलासा केला.
 
ईशान किशनच्या अडचणी
के. एल. राहुल हा एकदिवसीय सामन्यांमधील लोकप्रिय यष्टिरक्षक आणि फलंदाज आहे.
 
दुसरीकडे टी-20 मालिकेत जीतेश शर्मा आणि संजू सॅमसन यांना यष्टिरक्षक आणि फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे.
 
टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऋषभ पंत बरा होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
श्रेयस अय्यरविषयीसुद्धा असंच बोललं जात होतं की, शिस्तभंगाच्या कारावाईमुळे अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-20 मालिकेत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही, मात्र बुधवारी राहुल द्रविडने हे सर्व दावे फेटाळून लावले.
 
राहुल द्रविड म्हणाला की, “श्रेयस अय्यरची निवड न होण्यामागेही शिस्तभंगाच्या कारवाईचं काहीच देणं-घेणं नाही. तो फक्त या मालिकेचा भाग नाही. संघात अनेक फलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-20 संघातही तो नव्हता. पहिल्या अकरा खेळाडूंमध्ये सर्वांना स्थान देणं अतिशय कठिण काम आहे.”
 
द्रविड म्हणाला, “तो एक चांगला खेळाडू आहे मात्र सर्वांनाच पहिल्या अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकत नाही. निवड समितीमध्ये श्रेयस अय्यर प्रकरणी शिस्तभंगाच्या कारवाईची कोणतीही चर्चा झालेली नव्हती.”
 
श्रेयस अय्यर शुक्रवारी रणजी ट्रॉफीसाठी आंध्र प्रदेशविरुद्ध मुंबई संघाकडून खेळणार आहे.
 
गुरुवारी (11 जानेवारी) मोहालीमध्ये अफगाणिस्तानसोबत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरूवात होत आहे.
 
राहुल द्रविडने बुधवारी सांगितलं की, सलामीच्या फलदाजांसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांना पहिली पसंती आहे.
 
विराट कोहलीचादेखील पहिल्या अकरा खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र वैयक्तिक कारणांमुळे त्याने पहिला सामना न खेळण्याचं ठरवलं आहे.
 
ईशान किशन कोणत्या मानसिक थकव्याचा सामना करतोय?
गेल्या काही काळापासून नियमितपणे ईशान किशनचा भारतीय संघात समावेश केला जातोय, परंतु जेव्हा संघातील पहिल्या अकरा खेळाडूंमधील एक किंवा अधिक खेळाडू उपलब्ध नसतात तेव्हाच त्याला खेळण्याची संधी दिली जाते.
 
याच अडचणीमुळे आणि अनिश्चिततेमुळे इशान किशनला मानसिक थकव्याचा सामना करावा लागतोय, असं म्हटलं जातंय.
 
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेत जेव्हा त्याने स्वत:ला संघापासून वेगळं केलं तेव्हापासून त्याच्या मानसिक थकव्याच्या चर्चेला जोरदार सुरूवात झाली.
 
ईशान किशनने ‘बीसीसीआय’कडे विश्रांतीची मागणी केली होती. मागील वर्षभर सातत्याने होत असल्याच्या प्रवासाचं कारण देत त्याने ही मागणी केलेली.
 
या प्रकरणी संघ व्यवस्थापनाने निवड समितीसोबत चर्चा करून त्याची विनंती मान्य केली.
 
3 जानेवारी 2023 पासूनच्या प्रत्येक दौऱ्यात भारतीय संघात ईशान किशनचा समावेश होता, मात्र त्याला खूप कमी वेळा खेळण्याची संधी मिळाली. मागच्या वर्षी पार पडलेल्या विश्वचषकादरम्यान सुरूवातीच्या केवळ दोन सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली होती.
 
शुभमन गिल डेंग्यूच्या आजारातून बरा होऊन परत आल्यानंतर इशानला पुन्हा एकदा पहिल्या अकरा खेळाडूंमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तर दुसरीकडे यष्टिरक्षक म्हणून के. एल. राहुललची वर्णी लागली.
 
त्यानंतर ईशान किशनने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेतील तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकं झळकावली होती.
 
दक्षिण आफ्रिकेमध्ये ईशान किशनला टी-20 मालिकेच्या संघात स्थान देण्यात आलेलं मात्र संघ व्यवस्थापनाने जीतेश शर्माला प्राधान्य दिलं. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या कसोटी मालिकेतही किशनचा समावेश करण्यात आलेला, मात्र त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.
 
मागच्या वर्षी 9 ते 22 फेब्रुवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातही इशानला सामिल करण्यात आलं होतं.
 
संघ व्यवस्थापनाने के. एस. भारतची निवड केल्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चारही कसोटी सामन्यांमध्ये ईशानला खेळण्याची संधी मिळाली नाही. शिवाय तीन एकदिवसीय मालिकेपैकी फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.
 
सतत बदलणारी भूमिका
मुंबई इंडियन्सच्या संघातून ईशान किशन आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळला होता.
 
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी त्याला पर्यायी यष्टिरक्षक म्हणून इंग्लंडला नेण्यात आलं होतं. त्यानंतर 12 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत तो वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. ईशान किशनला पहिले दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती.
 
2021 सालच्या मध्यात ईशान किशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याचा भारतीय संघात नियमित खेळाडू म्हणून समावेश केला जातोय, मात्र आत्तापर्यंत त्याला फक्त 27 एकदिवसीय सामने आणि 32 टी-20 सामनेच खेळण्याची संधी मिळाली आहे.
 
खूप कमी वेळेस त्याला लागोपाठ सामने खेळण्याची संधी मिळालेय. संघ व्यवस्थापनाने संघातील त्याची भूमिकासुद्धा वारंवार बदलत ठेवली आहे. कधी त्याला बॅकअप सलामीवीर म्हणून तर कधी विशेष यष्टीरक्षक म्हणून घेतलं गेलं.
 
आजवर कोणत्याही प्रकारात ईशानला यष्टीरक्षक किंवा सलामीवीर म्हणून पहिली पसंती देण्यात आलेली नाही.
 
याच कारणामुळे ईशान किनशनने मानसिक थकव्याचं कारण देत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला असावा.
 
ईशान किशनने कायमच मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे.
 
जेव्हा भारतीय संघात सलामीवीर म्हणून शिखर धवनऐवजी इतर खेळाडूंना संधी देण्यात आली तेव्हा त्याने बांग्लादेशविरूद्ध एकदिवसीय सामन्याच द्विशतक झळकावलं.
 
तरीही ईशान किशनला संघात शिखर धवनचं स्थान प्राप्त झालं नाही. त्या जागी शुभमन गिलला पसंती देण्यात आली.
 
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यानंतर विश्रांती घेतल्यावर ईशान किशन दुबईमध्ये पार्टी करताना दिसला होता. याला शिस्तभंगाच्या कारवाईच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातंय.
 
दरम्यान राहुल द्रविडने शिस्तभंगाच्या कारवाईचा इन्कार केला आहे.
 
प्रसारमाध्यामांमधील वृत्तानुसार असंही म्हटलं जातंय की, ईशान किशन विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेत सहभागी होऊ इच्छित नव्हता, पण ‘बीसीसीआय’ने त्याची विनंती अमान्य केली.
 
ईशान किशनने प्रवासामुळे थकल्याचं कारण दिलं होतं आणि त्याला कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची इच्छा होती, मात्र त्याऐवजी तो दुबईत पार्टी करताना दिसला. असंही म्हटलं जातंय की, ईशान किशन दुबईमध्ये आपल्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता.