सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (21:29 IST)

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टी कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बार्टी मार्फत 30 केंद्राच्या विस्तृत यादीसह पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सदर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 09 डिसेंम्बर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.
 
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून 600 असे एकूण 18 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी साठी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये प्रतिमहिना प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येतील. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्रांचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविता येईल. इच्छुक व पात्र असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.