राज्यातील १५ हजार ५१५ पदे भरण्यासाठी वित्त विभागाचा हिरवा कंदील
महाराष्ट्रात २०१८ पासून रिक्त असलेली विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यातील एकुण १५ हजार ५१५ पदे भरण्यासाठी वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेमुळे आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केले. ही रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याच्या अनुषंगाने उपाययोजना करत ठोस निर्णय घेण्यात आला. या भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी विधानसभेत सभागृहाला सांगितले.
परीक्षांचे निकाल जलद गतीने लावण्यासाठी उपाययोजना करताना ठोस निर्णय घेण्यात आले. त्यासाठीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या एकुण १५ हजार ५१५ रिक्त पदांमध्ये गट अ, ब आणि क श्रेणीतील रिक्त पदांचा समावेश आहे. अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडून या पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. एमपीएससीची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. या पदांच्या भरतीला आता वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये ही भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असेही अजितदादांनी सभागृहाला सांगितले.