गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 19 जुलै 2014 (10:44 IST)

हवामान क्षेत्रात करिअर संधी

हवामान क्षेत्रात पारंपरिक पध्दतीचे काम करण्याबरोबरच बदलत्या युगात अनेक नव्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळंच, या क्षेत्रात काम करून स्वतःचा ठसा उमटविण्यासाठी मोठा वाव आहे. हवामानाच्या लहरीना अंदाजांच्या चौकटीत बंदिस्त करण्याच्या या आव्हानात्मक कामासाठी तुम्ही तयार आहेत...

पारंपरिक क्षेत्रांशिवाय, गेल्या काही वर्षांमध्ये नव्याने विकसीत झालेल्या हवामानशास्त्राविषयक काहीशा अपारंपरिक क्षेत्रांमध्ये उज्जवल भविष्यासाठी संधी उपलब्ध होत आहेत. केवळ शास्त्रशाखेतील शिक्षणच नव्हे, तर इतर विद्याशाखांथील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठीही हवामानशास्त्राशी निगडीत खालील क्षेत्रांमध्ये उत्तम करिअर करण्यासाठी वाव मिळू शकतो...

1) पर्यावरणविषयक विविध आंतरराष्ट्रीय करार आणि कायदे यासंबंधी जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व करीत असताना राष्ट्राचे हित जपूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य आणि सहकार्याची भूमिका घेऊन वाटाघाटी करण्यासाठी परराष्ट्र व्यवहारसंबंधी उत्तम समज आणि जाण नितांत आवश्यकता असते.

2) अशा प्रकारच्या वाटाघाटींमध्ये कायद्याचे उत्कृष्ट ज्ञान आणि वावपटूत्व असणारे विधिज्ञही महत्वाची भूमिका बाजवू शकतात.

3) जलप्रदूषण, वायुप्रदूषण, सागरी प्रदूषण आणि त्यांचे हवामानावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत उपाययोजन करण्यासाठी इंजिनीअरिंग ज्ञानाची विशेष जरूरी असते.

4) निरनिराळ्या प्रकारच्या प्रदूषणांचे आणि हवामानातील बदलांचे मानवी आरोग्यावर जे परिणाम होतात, त्याचा विशेष अभ्यास करून विशेष उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ काम करू शकतात.

5) चक्रीवादळे, पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, भुस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करण्याच्या कामी नागरी सेवा क्षेत्रातील तज्ज्ञांची जरूरी असते. त्याचप्रमाणे हवामानाच्या आकडेवारिचा योग्य वापर वेगवेगळ्य़ा प्रकारच्या नियोजनात प्रभावीपणे करण्यासाठी व्यवस्थापन आणि नियोजन क्षेत्रातील विशेष ज्ञान उपयोगी पडते.
 

6) हवामान अंदाजाच्या कामी वापरण्यात येणारी वेगवेगळी प्रारूपे (मॉडेल्स) तयार करणे आणि त्यामध्ये संशोधन करून सुधारण करणे, यासाठई कम्प्युटर क्षेत्रातील तज्ज्ञ त्यांचे ज्ञान वापरू शकतात.

7) हवामानाशी निगडीत अंदाज, पूर्वसूचना आणि अतर माहिती निरनिराळ्या उपभोक्त्यापर्यंत कमीत कमी वेळात, अचूकपणे आणि प्रभावीपणे पोहचविण्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील तज्ज्ञ अतिशय महत्तवाची भूमिका बजावतात. याकामी वेब डिझायनिंगशी निगडीत ज्ञानाचाही वापर योग्य तर्‍हेने करता येणे शक्य आहे.

8) हवामानाची निरनिराळी निरीक्षणे अचूकपणे नोंदविण्याची गरज फार महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे जागतिक तापमानवाढीच्या पार्श्र्वभूमीवर अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा प्रभावी आणि आढता वापर होणे, ही काढाची गरज आहे. यासाठी सौरचूल, सौरबंब, पवनचक्की यासारख्या उपकरणांचा आणखी विकास करून ही उपकरणे कमीत कमी खर्चामध्य उपलब्ध करून देणे आवश्यक असते.

9) हवामानाच्या निरीक्षणांचे त्वरित दळण-वळण, हवामानविषयक नकाशांची चित्रीत स्वरूपे तयार करणे आणि यासारख्या इतर अनेक सेवांमध्ये इंफर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील ज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावरक होतो.

10) चिरस्थायी/शाश्वत विकासाचे अंतिम लक्ष्य ध्यानात ठेवून हवामान, वातावरण आणि पर्यावरण यांच्यावर होणार्‍या विपरित परिणामांना आळा घालण्यासाठी समाजामध्ये योग्य ती जागरूकता निर्माण करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आणि त्यात रस असणा-यासाठीही या कामात विशेष आव्हानात्मक भूमिका आहे.

अशा प्रकारे हवामानशास्त्राशी निगडीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी अनेक संधी आज उपलब्ध आहेत. अशाप्रकारचा कामाची निवड केल्यास, स्वत:च्या विकासाबरोबरच राष्ट्रकार्यामध्ये महत्तवाचा सहभाग देता येतो. दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्टिका खंडाचे जागतिक हवामानात विशेष महत्तव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अंटार्क्टिकावरील लोझोन वायुचा विरळ होत गेलेला थर आणि त्याचे पृथ्विच्या वातावरणावर आणि मानवाच्या आरोग्यावर होऊ घातलेले घातक परिणाम यांच्या पार्श्वभूमीवर अंटार्क्टिका येथील हवामानाची विशेष निरीक्षणे आणि त्याविषयी संशोधन या क्षेत्रात काम करण्याची संधी फार महत्त्वाची आहे.

हवामानशास्त्राचा निसर्गाशी खूप जवळच संबंध आहे. त्यामुडेच, या क्षेत्रात काम करत असताना कधी उद्दामपणाचा स्पर्श मनाला होऊ शकत नाही. माणसाच्या जाणीवेला, ज्ञानाला असणार्‍या मर्यादांची जाणीव आपले पाय कायम जमिनीवर ठेवते. हवामानाचे अंदाज बांधणे हे एक शास्त्र आहे आणि त्याचबरोबर एक कलाही. रोजचे सूर्योदय-सूर्यास्त जसे संवेदनशील मनाला निरनिराळे दिसतात; तसेच रोजचे हवामान हे खरोखर निराळेच असते.पा-याला चिमटी पकडावे, तसे हवामानाच्या लहरींना अंदाजांच्या चौकटीत बंदिस्त करणे, हे खरोखरच बौध्दिकदृष्ट्या आव्हानात्मक असे काम आहे. अशा या एका काहीशा वेगळ्या अद्यापि फाशा न मळलेल्या वाटेवर पाऊल टाकून अनुभवाच्या गर्द राईत शिरणे, हा मग जीवनभरीसाठीचा निर्मळ आनंद होऊन जातो.