रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत मिरविण्यापेक्षा रोजच्या पेहरावालाच नवरात्रीचा टच देण्याकडे यंदा तरुणींचा कल आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत ऑफिस, कॉलेज असे दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याने या ठिकाणी जाताना भरजरी कपड्यांपेक्षा रोजच्या कपड्यांतच वैविध्य आणत उत्सव आणि काम यांचा मेळ पोशाखातून साधला जात आहे.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा एकापाठोपाठ येणार्या सणांसाठी विविध पोशाखांची आखणी केली जाते. नवरात्रीत येणार्या नवरंगासाठी कपड्यांची जुळवाजुळव होते. घागरा, चनिया चोली, भरजरी साड्या, त्यावर खुलणारे दागिने अशा वेशभूषा केलेल्या तरुणींनी दांडिया फुलून गेल्याचे चित्र काही काळापूर्वी दिसत असले तरी यंदा मात्र रोजच्याच पेहरावाला तरुणींनी पसंती दिली आहे. नवरात्रीतील नऊ रंगांचे पोशाख परिधान करणे सोपे असले तरी साध्या पोशाखात ते रंग वापरले जातात. नोकरी, कॉलेज अशा रोजच्या ठिकाणी प्रवास करणार्या महिलांना पारंपरिक पोशाख करणे शक्य नसते. त्यामुळे कुर्ती, टॉप, चुडीदार या रोजच्या वापरातील पोशाखांकडेच महिलांचा कल आहे. महिलांची ही गरज लक्षात घेत यंदा बाजारातही अशाच पद्धतीच्या पोशाखांनी गर्दी केली आहे. यामध्ये लाल, पिवळा, निळा अशा गडद रंगांचे कुर्ती, त्यावरील आरशांची नक्षी, हँडप्रिंट केलेले टॉप यांच्यात वैविध्य आहे. पारंपरिक पोशाखांच्या तुलनेत कमी खर्चिक असणारे हे प्रकार कामाच्या ठिकाणी घालणे सहज शक्य आहे, तसेच नवरात्रीनंतरही ते वापरता येत असल्याने महिलांची अशा कपड्यांना मागणी आहे.