आयडियाची कल्पना
- चंद्रकांत शिंदे
सचिनची नवीन वर्षानिमित्त प्रेक्षकांना उत्कृष्ट भेट
WD |
जयराम (सचिन) मनोहर बारशिंगे (अशोक सराफ) नावाच्या वकीलाचा मेहुणा असतो. जयराम चित्रपट अभिनेता सचिनचा प्रशंसक असतो आणि त्याच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करीत असतो. एका स्पर्धेच्या वेळी एका मुलीच्या गाडीचा धक्का लागून जयराम पडतो, त्याचवेळेस तेथे आलेल्या मनोहरला यातून पैसे कमविण्याची आयडिया सुचते. तो गाडीच्या मालकावर हिट ऍन्ड रनची केस करण्याचे ठरवतो. ती गाडी असते पोलीस कमिशनर महेश ठाकुर (महेश कोठारे) ची. महेश ठाकुर या केसपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला ठाउक असते कि मनोहर जाणूनबुजून पैसे कमविण्यासाठी केस करण्याचा प्रयत्न करीत आहे. कमिशनर महेश जयराम आणि मनोहरला उघडे पाडण्याचा प्रयत्न करतो तर मनोहर एकाहून एक सरस आयडिया लढवून कमिशनवर मात करण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा या दोघांचा प्रयत्न म्हणजेच हा चित्रपट. कमिशनरची बहिण प्रीति (भार्गवी चिरमुले) जयरामवर प्रेम करू लागते. हे दोघे एकत्र येऊ पाहातात. मनोहर कशा पद्धतीने कमिशनरला हरवतो आणि जयराम-प्रीतिचे मिलन घडवून आणतो ते पडद्यावर कमालीच्या उत्सुकतेने दाखवण्यात आलेले आहे. ही चित्रपटाची वरवरची कथा आहे. खरे तर चित्रपटात याहून अधिक आहे परंतु ते येथ देण्याचा मोह टाळत आहे. कारण ते चित्रपटगृहात जाऊन पहाणेच आनंदाचे ठरेल.
दिग्दर्शक सचिनने कथा खूपच मनोरंजक आणि पुढे काय होईल याची उत्सुकता कायम राखीत चित्रपटाची गती कायम ठेवली आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या गाण्यापर्यंत प्रेक्षक खुर्चीवर बसून राहतो. चित्रपटात एकाहून एक सरस ट्विस्ट सचिन घेऊन येतो. स्वतःला मनमोहन देसाई स्कूलचा विद्यार्थी समजणा़र्या सचिनने खरोखर या चित्रपटाद्वारे मनमोहन देसाईंची याद ताजा केली आहे. सचिन मराठी चित्रपटसृष्टीतील मनोरंजक चित्रपट देणारा श्रेष्ठ दिग्दर्शक आहे हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. आयडियाची कल्पना ही प्रेक्षकांना सचिनची नवीन वर्षांची उत्कृष्ट भेट म्हणता येईल.
WD
सचिनने तिहेरी भूमिका नेहमीच्या पद्धतीने साकारली आहे, महेश कोठारे ने नेहमीप्रमाणे पोलीस अधिका़र्याची भूमिका साकारली आहे. परंतु या चित्रपटात सचिनने महेशला प्रमोशन देऊन पोलीस कमिशनर बनवले आहे. सचिन आणि महेशने आपापल्या भूमिका नेहमीच्या पद्धतीनेच साकारल्या आहेत. भार्गवी चिरमुलेने नायिकेची भूमिका साकारली आहे. तिन्ही नायिकांमध्ये अशोक सराफप्रमाणेच निर्मिती सावंतने कमाल केलेली आहे. निर्मिती ने दुहेरी भूमिका साकारली आहे.
चित्रपटाचे संगीत चित्रपटाला पूरक असेच आहे. अवधूत गुप्ते ने आम्ही नाही जा आणि हम तो चले कलकत्ता गाणी कर्णप्रिय बनवली आहेत. आम्ही नाही जा गाणे लोकप्रिय होण्यासारखे आहे. सचिनने आयडियाची कल्पना हे शीर्षक गीत लक्षात राहाण्यासारखे तयार केले आहे.
एकूणच सचिनने नव्या वर्षानिमित्त प्रेक्षकांना मनोरंजनाचा खरोखरीच तिहेरी डोस दिलेला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन अवश्य पाहावा आणि नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित करावा.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, सुश्रिया चित्र कृत आयडियाची कल्पना. निर्मिती, दिग्दर्शन- सचिन पिळगांवकर.
कलाकार- अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर, निर्मिती सावंत, भार्गवी चिरमुले, प्रीति कदम. संगीत- अवधूत गुप्ते, सचिन पिळगांवकर.
