1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र-समीक्षा

'आर. आर. आबा, आता तरी थांबा'

PRPR
गेल्या वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील ऊर्फ आबा चर्चेचा विषय ठरले. डान्सबार बंदी असो वा गाडगे महाराज स्वच्छता अभियान आबा बातमीचा विषय होते. त्यातच त्यांची तंबाखू खाण्याची सवय सार्वजनिक झाली. एकूणच आबांविषयी लोकांमध्येही कुतूहल होते. नेमका याच पार्श्वभूमीवर संवेदना फिल्म फाऊंडेशन 'आर. आर. आबा, आता तरी थांबा' नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. यात आबांचे नाव असले तरी चित्रपटाची कथा मात्र वेगळी आहे, असा निर्मात्यांची दावा आहे. मराठीत राजकीय विनोदी चित्रपटाची उणीव भासते, ती हा चित्रपट पूर्ण करेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

आपल्या अभिनयाने हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी गाजविणारे अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची कन्या रिमा यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. थो़डक्यात अमरापूरकर यांच्या घरचाच हा चित्रपट आहे.

PRPR
राजकीय मराठी विनोदी चित्रपट अशीच त्याची प्रसिद्धी केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्यानंतर बदललेली परिस्थिती आणि यानंतर रंगलेली राजकीय धुळवड हा चित्रपटाचा गाभा आहे. यात गावचे राजकारण मांडताना गावाकडच्या मंडळींचे बदललेले इरसाल रूपही आपल्याला पहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक पुढे येणारी व्यक्तिरेखा म्हणजे 'आबा' आहे. ज्येष्ट अभिनेते सदाशिव अमरापूर यांनीच ही भूमिका रंगवली आहे.

आर. आर. पाटील यांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य साधणारी ही व्यक्तिरेखा आहे. यासंदर्भात दिग्दर्शिक रिमा म्हणाल्या, की वडिलांसाठी दिग्दर्शन करताना खूपच दडपण आले होते. शिवाय या व्यक्तिरेखेचे 'आबां'बरोबर असणारे साम्यही दडपण वाढविणारे होते. पण मुळात बाबांनी ही भूमिकाच इतक्या सहजेतेने केली, की माझे सारे दडपण निघून गेले.

अगदी लहान वयात दिग्दर्शनाची भूमिका करणे ही बाब रिमा यांच्यासाठी कौतुकाचीच आहे. त्यातही अमरापूरकर यांच्यासारखा ज्येष्ट अभिनेता असतानाही त्यांनी ही जबाबदारी पेलली आहे. हसत खेळत दोन पिढ्यातील जनरेशन गॅप दर्शविण्याचा हा प्रयत्न असल्याचे रिमा म्हणाल्या.

या चित्रपटात अमरापूरकर यांच्या व्यतिरिक्त प्रिया बेर्डे, सतीश तारे, नागेश भोसले, रवींद्र बेर्डे, सविता मालपेकर, मिलिंद गवळी, सुरेखा कुडची, विकास समुद्रे, तेजा देवकर आदी कलावंत आहेत. प्रा. बालाजी वाघमोडे यांची कथा व पटकथा आहे. संगीत अवधूत गुप्ते यांचे आहे. छायाचित्रण संजय मेमाणे यांचे आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा