1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र-समीक्षा

धमाल वात्रटपट एकावर तीन

- दीपक जाधव

PRPR
निर्माते पियुष शहा आणि सौ. वर्षा प्रकाश गायकर निर्मित एकावर तीन हा धमाल चित्रपट सांगलीत प्रदर्शित झाला असून लवकरच उर्वरित महाराष्ट्रात तो प्रदर्शित केला जाणार आहे. अष्टविनायक एंटरप्रायझेसच्या बॅनरखाली निर्माण केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन दिलीप प्रधान यांनी केले असून लेखनही त्यांचेच आहे. धमाल कथा व आवडते कलाकार यामुळे हा चित्रपट चांगलाच मनोरंजक असल्याचा दावा निर्माते व दिग्दर्शकांनी केला आहे.

PRPR
एकावर तीन हा चित्रपट तीन अफलातून बाईलवेडयांवर आधारीत आहे. पतंगराव पाखरे, नाना नकटे आणि तात्या गोडबोले हे तीन इरसाल नमुने. दिसली पोरगी की मारली लाईन हा त्यांचा आवडता धंदा. हे तिघेही सतत कुणा ना कुणा मुलीच्या मागावर असतात आणि तोंडघशी पडतात. अशावेळी त्यांच्या आयुष्यात येते चांदणी चौघुले. ही फटाकडी पोरगी या तिघांना वेड लावते. जो तो तिला पटवण्यासाठी धडपडतो. अशावेळी तिचे सूर जुळतात ते दिग्विजय या पतंगरावाच्या पुतण्याबरोबर. पण तरीही चांदणी सर्वांना खेळवत असते. त्यामागे तिचा एक हेतू असतो या तिघांना लुबाडायचा. पण त्यामागे नेमकं कोणतं कारण असतं? हा उत्कंठावर्धक भाग सिनेमात पाहिलेला बरा.

PRPR
अष्टविनायक एंटरप्राईझेसची ही दुसरी निर्मिती आहे. याआधी त्यांनी 'आपला हात जगन्नाथ' या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एकावर तीन हा नावाप्रमाणेच विनोदी चित्रपट असून यातला वात्रटपणा, चावटपणा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावेल असा निर्माता व दिग्दर्शकाला विश्वास आहे. यात मिलिंद गुणाजी, रमेश भाटकर, डॉ. विलास उजवणे, उपेंद्र दाते, प्रमोद नलावडे, अंजली उजवणे, तेजस्विनी सरकार, अमित पिंगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात एकूण तीन गाणी असून त्यांची रचना गौतम आठवले व सुधीरकुमार आवळे यांची आहे. संगीत संतोष शर्मा यांचे असून नृत्य अनिल सुतार यांची आहेत.

PRPR
दिग्दर्शक दिलीप प्रधान यांचा हा दुसरा चित्रपट असून याआधी त्यांनी कमाल धमाल' हा विनोदी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. गेली वीस वर्षे ते या क्षेत्रात आहेत. हाय डेफिनेशन कॅमेरा वापरून रिव्हर्स टेलिसी पध्दतीने त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. एकावर तीन या चित्रपटासाठी त्यांनी खास ट्रीटमेंट दिली असून हा फॉर्म्युला मराठी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा त्यांना आत्मविश्वास आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा