1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By वेबदुनिया|

फर्मास 'धोबीपछाड'

- केदार पाटणकर

केदार पाटणकर
PRPR
अशोक सराफची निर्मिती असलेला एक डाव धोबीपछाड म्हणजे शुद्ध हसवणूक आहे. प्रत्येक कलाकार प्रसंगागणिक आपापले अभिनयाचे डाव टाकत जातो, एकामागून एक विनोदाचे सुरुंग फुटत जातात आणि प्रेक्षक या हस-या कारंज्यात पूर्ण न्हातो.

दादा दांडगे नावाचा गुंड अनेक वर्षापूर्वीच्या प्रेयसीला अचानक भेटतो आणि त्यामुळे नव्याने चांगला माणूस होण्याचे ठरवतो. स्वतः चांगला बनत जातो, जाता जाता दोन स्वतःच्या दोन मुलींची लग्नेही चांगल्या माणसांशी लावून देतो.

चांगला माणूस बनण्याच्या भानगडीत दादाला एकाच दिवसात विविध बारीक विनोदी प्रसंगांना सामोरे जावे लागते. दादाच्या साथीदारांच्या भूमिका पुष्कर श्रोत्री व भारत गणेशपुरे यांनी उभ्या केल्या आहेत. दादाचा अकाउंटंट प्रसाद ओकने उभा केला आहे. सायली ही तरुणी मधुरा वेलणकरने साकारली आहे. दादाच्या मुलीची, सुलक्षणाची भूमिका मुक्ता बर्वेने केली आहे तर तिचा प्रियकर भाषाप्रेमी प्राध्यापक सुबोध भावेने उभा केला आहे. या सहाही कलाकारांनी दिलेली कामे चोख वठवली आहेत.

विनय येडेकरचा टेलरही तितकाच झकास. यापैकी प्रत्येकाला विनोदाची जाण असल्याने एकूण एक प्रसंगात धमाल उडते. या पैकी प्रत्येक कलाकाराची अशोक सराफबरोबर एकदा तरी जुगलबंदी झडतेच आणि त्यात प्रत्येकजण तोडीस तोड ठरतो. पण मास्टरपीस ठरतो तो अशोक सराफच. त्याच्या काही दमदार भूमिकांमध्ये या भूमिकेचा समावेश नक्कीच व्हावा. वरून राकट पण आतून हळवी व्यक्तिरेखा सादर करणे, हा त्याच्या डाव्या हातचा मळ. शाव्दिक, कायिक, वाचिक, प्रासंगिक हे विनोदाचे सर्व प्रकार चित्रपटात पाहायला मिळतात आणि प्रेक्षक हस-या अवस्थेतच राहतो.

गिरीश जोशी, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, उदय सबनीस लहान भूमिकांत आहेत. किशोरी शहाणे पाहुणी कलाकार आहे. तिने दादाच्या पूर्वीच्या प्रेयसीचे काम अगदी समजून केले आहे.

गिरीश जोशींकडे संवादांच्या धमालीचे श्रेय जाते. सतीश राजवाडेचे दिग्दर्शन सफाईदार आहे. झी ची नि्र्मिती नेहमीप्रमाणे चकचकीत. चित्रपटात 'माझा पती करोडपती' मधील गीत जसेच्या तसे वापरण्यात आले आहे.

अशोक सराफ आणि किशोरी शहाणे असलेल्या या गीतामुळे जुन्या आठवणी जागृत होतात, टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. एकदा तरी (टाकून) पाहावा असा हा डाव आहे. सगळेच भिडू मस्त आहेत.