शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Updated : शनिवार, 7 फेब्रुवारी 2015 (12:12 IST)

बाजी : चित्रपट परीक्षण

निर्मिती : दार मोशन पिक्चर्स
 
दिग्दर्शक : निखिल महाजन
 
कलाकार : श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी आदी.
बाजी ही एका शूरवरीराची कहाणी आहे. श्रीरंगपूर या गावात गुप्तधन लपलेले आहे. ते शोधण्याचा आटापिटा एक तरुण मार्तंड (जितेंद्र जोशी) करीत आहे. त्याच गावात लोकांच्या मदतीला धावणारा तरी घाबरट आणि धांदरट असलेला चिदविलास (श्रेयस) आपल्या बालमैत्रीण गौरीला (अमृता) पटवण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र त्याला मार्तंड मारून टाकतो.. तो गुप्तधन मित्राच्या मदतीने शोधतो आणि हव्यासापोटी आणखी गाव खोदत जातो. त्यातून त्याची क्रूरता अधिक भेसूर बनत जाते. त्या गुप्तधनाचे संरक्षण करण्याचे काम बाजी अर्थात चिदविलासचे पूर्वज करत असतात आणि आता संरक्षण करण्याची जबाबदारी चिदूची असते.. परंतु तो मरून जातो आणि अचानक एक नवा चिदू येतो.. तो चिदू कोण असतो? मात्र हा चिदू नसून दुसरा कोणी आहे. हे समोर येते. मग त्या चिदूसारख्या दिसणार्‍या आकाशची कहाणी सुरू होते आणि मग हॅप्पी एण्डींग. आकाशची एन्ट्री 'जो आपल्याशी नडेल तो नरकात सडेल' अश वाक्यांनी होते, पण सिनेमाचे संवाद अगदीच फिके असल्याने, अशा काही वाक्यांमुळे म्हणावा असा परिणाम होत नाही. चिदू त्या गुप्तधनाचे संरक्षण करतो काय? मार्तंडचे काय होते? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चित्रपटात मिळू शकतील.  
 
मोठय़ा लांबीचा असलेला हा चित्रपट पूर्वाधात भरपूर कंटाळवाणा बनला आहे. चिदूची व्यक्तिरेखा तयार करण्यातच वेळ घालवला आहे. मात्र मध्यंतरानंतर चित्रपटाला वेग येतो; परंतु तो वेग अगोदरच्या कंटाळय़ाला घालवू शकत नाही. या चित्रपटात पहिल्यांदाच मालगाडीचा उपयोग केला आहे. अगदी बॉलीवूडच्या पटाप्रमाणे आणि तितक्याच ताकदीने सादर केला आहे. मात्र इतर वेळी हा चित्रपट चांगली छाप पाडत नाही. सुरुवातीपासूनच चित्रपट गटांगळय़ा खात आणि मोठे हेलखावे खात पुढे जातो. चित्रपटाची सुरुवात झाल्यानंतर नामावलीसाठी व्यंगचित्रांच्या माध्यमातून कथा सांगण्याचा हट्ट का झाला? त्यामुळे पहिलाच धक्का बसतो.. आपण सावरतो तोच आणखी एकामागून एक धक्के बसत जातात. मुळात चित्रपटाची कथा अतिशय प्रवाही राखली गेली पाहिजे होती.. त्यात दिग्दर्शक कमी पडला आहे.
सर्वात भाव खाऊन जातो तो जितेंद्र जोशीचा मार्तंड़ त्याने त्यावर बरीच मेहनत केल्याचेही स्पष्ट दिसते. श्रेयसचा आकाश सुंदर झाला असला तरी चिदू अजून खुलला पाहिजे होता. अर्थात त्याने आपल्या नैसर्गिक अभिनयाने उत्तम साकारला आहे. त्याला अमृतानेही चांगली साथ दिली आहे. मात्र गुप्तधनाच्या लोभाने आणि ओढय़ाने झपाटलेला आणि क्रूरतेचा कळस गाठणारा मार्तंड चांगला लक्षात राहतो. बाकीच्या कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे.
 
बाजीच्या निर्मितीतील हेतू चांगला.. पण अनेक प्रकारचे पदार्थ एकाच भांड्यात टाकले गेले.. त्यांचे प्रमाणच लक्षात आले नाही आणि त्यामुळे स्वयंपाक काहीसा पचायला जड झाला आहे. अर्थात ज्यांची पचनशक्ती स्ट्राँग आहे त्यांनी या बाजीच्या वाट्याला गेलेले ठीक.. श्रेयस आणि जितेंद्र यांच्या चाहत्यांनी आणि जिगरबाजांनीच हा चित्रपट पाहावा!

रेटिंग : 2.5