शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Updated : शनिवार, 29 नोव्हेंबर 2014 (10:47 IST)

हॅप्पी जर्नी : चित्रपट परीक्षण

चित्रपट : हॅप्पी जर्नी 
लेखन-संकलन : सन्ना मोरे  
निर्मिती : एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट
निर्माता : संजय छाब्रिया
दिग्दर्शक : सचिन कुंडलकर
कलाकार : अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष, सिद्धार्थ मेनन, चित्रा पालेकर, शिव सुब्रह्मण्यम, सुचिता थत्ते, माधव अभ्यंकर आदी.
 
भावा-बहिणीच्या वेगळ्या नात्यावर आणि वेगळ्या कथेवर आधारित असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी तुमच्या थिएटरपर्यंतचा प्रवास करायला काहीच हरकत नाही.. कारण हा तुमचा प्रवास 'हॅपी' होईल, एवढे नक्की! अतुल कुलकर्णी म्हटल्यानंतर काहीतरी नावीन्य आणि वैविध्यपूर्ण असणार असा आतापर्यंत प्रेक्षकांचा विश्‍वास दाट झालेलाच आहे आणि त्या विश्‍वासाला खरे उतरण्यात यशही मिळाले आहे. सचिन कुंडलकर सारखा दिग्दर्शक जो भावनांना महत्त्व देतो.. इथेही त्याने वेगळ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत अनेकांच्या गोष्टी आपण चंदेरी पडद्यावर पाहिल्या आहेत.. परंतु या वेळी अशी वेगळी कथा आपल्याला पाहायला मिळत आहे. भावा-बहिणीचे नाते खूपच वेगळे असते.. जेव्हा भाऊ दूर परदेशी असतो आणि बहीण त्याची प्रतीक्षा करीत असते.. तेव्हा त्यांच्या प्रेमाला खरेच तोड नसते.. किंबहुना या प्रेमाला वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न सचिन कुंडलकर यांनी केला आहे. 
 
कथा : निरंजन (अतुल) लहानपणीच पैसा कमवण्यासाठी परदेशात गेलेला असतो. त्याची बहीण जानकी (प्रिया) त्याची आतुरतेने वाट पाहत असते; परंतु ती ब्लड कॅन्सरने आजारी असते आणि तो येण्यापूर्वीत मृत्यू पावते. आपल्या माणसांपासून दूर राहिल्यामुळे निरंजनला आपल्या कुटुंबीयांची इतकी ओढ राहिलेली नाही. त्याच्यासाठी पैसा आणि काम हेच महत्त्वाचे बनले आहे. त्याचे बालपणापासून अँलिस (पल्लवी सुभाष)वर प्रेम आहे. मात्र तिच्या वडिलांमुळे त्यांचे कधी प्रेम यशस्वी होईल, असे वाटत नाही. इकडे आपल्या बहिणीचे दिवसकार्य झाल्यावर निघण्याच्या तयारीत असलेल्या निरंजनला त्याची बहीण एका गॅरेजमधल्या गाडीत भेटते.. आणि मग अतृप्त राहिलेले भावा-बहिणीचे वेगळे नाते फुलत जाते.. शोकांतिकेचा सुखांत होतो! 
दिग्दर्शक : सचिन कुंडलकर यांनी छोट्या धाग्यांना धरून आतापर्यंत अनेक चित्रपट तयार केले आहेत. त्यांचे ते वैशिष्ट्य आहे. इथेही त्यांनी भावा-बहिणीच्या प्रेमाचा धागा पकडला आहे. मात्र त्यांच्यातील एकजण मृत्यू पावलेला आहे. त्या बहिणीचा अतृप्त आत्मा भावाशी संवाद सांधतो.. हा भुताटकीचा चित्रपट होण्याची भीती होती. मात्र तसे काही झाले नाही. हे भूत खूप प्रेमळ आणि आपल्या भावावर जीव ओवाळून टाकणारे आहे. त्यामुळे असे भूत आपल्यालाही हवे, असे वाटण्यापर्यंत प्रेक्षकांची मजल जाऊ शकते, इतके ते लव्हेबल झाले आहे! एकूणच लेखक-दिग्दर्शकाची भूमिका सचिन कुंडलकरांनी चांगल्या प्रकारे निभावली आहे. उगाचच भयपट तयार करण्याऐवजी लव्हेबल आणि फ्रेश चित्रपट बनवला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत. 
 
अभिनय : चुलबुली प्रिया सर्वांना भावून जाते. अर्थात वेगळा अतुल या चित्रपटातही आपल्याला पाहायला मिळतो. पल्लवीची छोटीशी भूमिकाही भावून जाते, तर सिद्धार्थ मेनन आणि अतुल यांच्यातील संवाद शोकांतिकेला अतिशय हलके बनवण्याचे काम करतात. एकूणच सर्वांच्या भूमिका सरस झाल्या आहेत. आणि हो.. त्या गाडीचीही अफलातून भूमिका यात पाहायला मिळत आहे.
 
गीत-संगीत : सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या फिल्ममधला, प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी यांच्यावर चित्रित झालेला या गाण्याच्या व्हिडिओही सगळ्यांना खूपच आवडलेला दिसतोय. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा लाडका संगीतकार अमित त्रिवेदीनं एका विशेष फंक्शनमध्ये "फ्रेश" या गाण्याचं अनावरण केलं तेव्हापासून या गाण्याला सगळ्याच प्रेक्षक वर्गातनं अफलातून रिस्पॉन्स मिळाला आहे. यंग जनरेशनने तर "हे आमच्या जनरेशनचं गाणं आहे" असं म्हटलं आहे. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब म्युझिक चॅनल्स सगळीकडे फक्त "फ्रेश"चाच बोलबाला झालाय. 
 
इशकजादे मधल्या "परेशान"मुळे घराघरात पोचलेली रॉक स्टार शाल्मली खोलगडे हिनं हे रॉकिंग गाणं आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने गायलंय. करण कुलकर्णी या अमित त्रिवेदीचा सहायक संगीत दिग्दर्शकान "फ्रेश" द्वारे मराठीत जोरदार एन्ट्री घेतली आहे. नवोदित गीतकार ओंकार कुलकर्णीचे शब्द आजच्या तरुण ऑडियन्सला मनापासून भावलेत. यातील गीते अगोदरच लोकांच्या तोंडावर रेंगाळत आहेत. गुणगुणली जात आहेत. त्यामुळे 'फ्रेश' झाल्याचा अनुभव येतो.. भावा-बहिणीच्या आगळ्या वेगळ्या प्रेमाची केमिस्ट्री पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. हा प्रवास निश्‍चित सुखाचा होईल, यात तीळमात्र शंका नाही.
 
रेटिंग : 3.5