गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2016 (16:44 IST)

लॅन्डमार्क फिल्मस् चं पारडं पुन्हा वजनदार

असिस्टंट डायरेक्टर ते डायरेक्टर आणि डायरेक्टर ते निर्माती अशी चढती कमान असणाऱ्या लॅन्डमार्क फिल्मस्च्या विधि कासलीवाल...
2006 मध्ये ‘विवाह’या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टरचे काम करणाऱ्या विधि कासलीवाल यांनी 2010 मध्ये ‘इसी लाइफ में’ या हिंदी चित्रपटाची कथा लिहून त्याचे दिग्दर्शनही केले होते. दिग्दर्शनानंतर सिनेसृष्टीतले अजून एक माध्यम पारखून बघण्याच्या उद्देश्याने त्यांनी चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या निर्मितीतल्या पदार्पणासाठी त्यांनी ‘सांगतो ऐका…!’ या मराठी चित्रपटाची निवड केली. आणि हा चित्रपट लॅन्डमार्क ठरला. हिंदी – मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज सचिन पिळगावकर आणि तितक्याच ताकदीचा दिग्दर्शक सतीश राजवाडे...यांची भट्टी जमवून एक सुंदर चित्रपट विधि कासलीवाल यांनी प्रेक्षकांखातर आणला. या चित्रपटाचा अनोखा विषय, दिग्गज कलाकारांची फौज, विनोदाचे फवारे आणि उत्तम दिग्दर्शन असे संपूर्ण पॅकेज असणारा हा चित्रपट...अर्थात या सगळ्याचे श्रेय जाते लॅन्डमार्क फिल्मस् च्या विधि कासलीवाल यांना...
सांगतो ऐका च्या निर्मितीनंतर लॅन्डमार्क फिल्मस् च्या विधि कासलीवाल आता पुन्हा एकदा नवा विषय घेऊन येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सिनेसृष्टीतल्या बऱ्याच दिग्गजांच्या अभिनयाने सजलेल्या आगामी चित्रपटामुळे लॅन्डमार्क फिल्मस् चे पारडे पुन्हा एकदा वजनदार झाले आहे.
 
नेहमीच वेगळे विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी या वजनदार चित्रपटाची कथा लिहिली आहे. याविषयी बोलताना निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “सचिनच्या डोक्यातली ही वजनदार कल्पना मला खूपच भावली. प्रत्येकाला अगदी सहज आपलीशी वाटेल अशी ही कथा होती. त्याचे कथेत रूपांतर करण्याचा कालावधी मजेदार होता.” पुढे सचिनबद्दल बोलताना ते तीक्ष्ण बुध्दीमत्तेचे भावूक दिग्दर्शक असल्याची सतत जाणीव होते. कथेसंदर्भातील इतरांची मते ते खुल्या मनाने स्वीकारून त्या मतांना आदर देऊन त्यांना खूप सुंदररित्या चित्रपटात दाखवत असल्याचे ही त्या म्हणाल्या.
 
चित्रपटाच्या चित्रिकरणापासून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याला कारण म्हणजे आघाडीच्या दोन अभिनेत्री यात प्रमुख भूमिकेत आहेत. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघी या वजनदार चित्रपटाचा भाग आहेत. त्याबरोबरच सिध्दार्थ चांदेकर, चिराग पाटील आणि चेतन चिटणीस हे अभिनेते ही या चित्रपटात दिसणार आहेत.
 
निर्माती म्हणून आपली सामाजिक जबाबदारी ओळखून निर्मात्या विधि कासलीवाल यांनी नेहमीच समाजाला पूरक अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. आपल्या प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांना एक नवी उमेद देण्याचा विधि कासलीवाल यांचा प्रयत्न असतो. असाच एक प्रयत्न ‘वजनदार’ या सिनेमातून त्या करत आहेत.