गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. मराठी कलावंत
Written By राकेश रासकर|

वर्षा उसगांवकर : ग्लॅमरस अभिनेत्री

वर्षा उसगावकर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या वर्षाने केवळ त्यासाठी गोवा सोडून मुंबईत धाव घेतली. दामू केंकरे यांच्या मदतीने तिने या क्षेत्रातील करीयरला आकार देण्याचा प्रयत्न केला. 'कार्टी प्रेमात पडली' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमवीर तिने पदार्पण केले.

पण तिची दखल मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीने घेतली ती 'ब्रम्हचारी' या नाटकामुळे. आचार्य अत्रे लिखित हे नाटक सुरवातीपासून त्यातील बोल्ड नायिकेमुळे गाजले होते. एक काळ गाजवला होता तो मेनका शिरोडकर यांनी घातलेल्या बिकिनीमुळे. आता वर्षाने शॉर्ट व टी शर्ट घालून रंगभूमवीर प्रवेश केला, आणि तोपर्यंत सोज्वळ नायिकांची सवय झालेल्या

मराठी चित्रपटसृष्टीला (पुन्हा एकदा) धक्का दिला. तिच्या दिसण्याला एक मॉडर्न लूक आहे, जो तोपर्यंच्या नायिकांमध्ये फारसा नव्हता. त्यामुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिला संधीही लवकर मिळत गेल्या. योगायोगाने निर्माता दिग्दर्शक सचिनला 'गंमत जंमत' या चित्रपटात अशीच ग्लॅमरस, बोल्ड नायिका हवी होती, ती त्याला मिळाली.

मग वर्षाच्या मागे चित्रपटाची रांग लागली. पैंजण, सवत माझी लाडकी, पैसा पैसा, मुंबई ते मॉरीशस, आत्मविश्वास, पैज लग्नाची असे विविध चित्रपट येत गेले. मग तिने हिंदीतही स्वतःस आजमवायचे ठऱविले. तशा संधीही मिळाल्या.

पण त्यात तिच्या अभिनयापेक्षा तिच्यातील बोल्ड अभिनेत्रीलाच संधी मिळाली. तरीही सुमारे २५ हिंदी चित्रपटात तिने कामे केली. दूध का कर्ज, तिरंगा, हनिमून, घरजमाई, खलनायिका हे तिचे काही हिंदी चित्रपट. तिने कोकणी, बंगाली व भोजपुरी चित्रपटातही काम केले आहे.


वर्षा उसगावकरचे काही चित्रपट :


तुझ्यावाचून करमेना
गंमत जंमत
खट्याळ सासू नाठाळ सून
सगळीकडे बोंबाबोंब
मज्जाच मज्जा
रेशीमगाठी
आत्मविश्वास
हमाल दे धमाल
कुठं कुठं शोधू मी तुला
नवरा बायको
अफलातून
भुताचा भाऊ
पसंत आहे मुलगी
आमच्या सारखे आम्हीच
मालमसाला
उपकार दुधाचे शेजारी शेजारी
पटली रे पटली
घनचक्कर
बाप रे बाप
डोक्याला ताप नाही
मुंबई ते मॉरिशस
ऐकावं ते नवलच
एक होता विदूषक
शुभमंगल सावधान