शब्दांना अर्थ देणारे सलीम-जावेद
`
ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही`, पोलिस स्टेशनमध्ये टेबलावर पाय पसरून बसलेल्या शेरखानला (प्राण) इन्स्पेक्टर विजय अर्थात अमिताभ बच्चन म्हटले, तेव्हा एका सुपरस्टारचा जन्म झाला. हा सुपरस्टार जन्माला आला तो स्वतःच्या गुणवत्तेने हे खरेच. पण त्याला यशस्वी होण्यासाठी लागणारे शब्द सुरवातीला दिले ते सलीम जावेद या जोडीने. तोपर्यंत चौदा चित्रपट ओळीने फ्लॉप ठऱलेल्या अमिताभने गावी जायचे तिकीट जवळपास काढूनच ठेवले होते. पण सलीम जावेदच्या शब्दांनी त्याचे आयुष्य बदलले. केवळ जंजीरच नाही, शोले, दिवार, जंजीर, डॉन हे अमिताभच्या आयुष्यातील माईल स्टोन चित्रपट सलीम जावेदच्या लेखणीतून साकारले आहेत. सलीम-जावेद नसते तर अमिताभ यशस्वी ठरू शकला असता?प्रश्न कठिण आहे. पण त्यासाठी या काळाच्या इतिहासातही डोकवावे लागेल. सलीम -जावेद या जोडीने आपल्या सशक्त कथा-पटकथा लेखनाने सत्तरचे दशक अक्षरश: गाजवले. या दोघांनी तब्बल अकरा वर्ष सोबत काम केले. पण त्यांची केमिस्ट्री इतकी जुळली होती की त्यातून अजरामर कलाकृती घडल्या. पण मुळात हे मैत्र झाले कसे असा प्रश्न पडतो.मैत्री ठरवून होत नसते. तशी ही सुद्धा झाली नाही. सरहदी लुटेरा नामक चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे भेटले. जावेद अख्तरने त्याचे कथानक लिहिले होते. दोघेही चित्रपटसृष्टीत नशीब आजमवात होते. फिल्म सिटीत त्यांना अडीच हजाराची नोकरी मिळाली. रमेश सिप्पींकडे काम करत असतानाच त्यांची राजेश खन्नाशी भेट झाली. राजेश तेव्हा सुपरस्टार होता. त्याच्या शिफारशीनेच त्यांना हाथी मेरे साथीच्या पटकथा लेखनाची संधी मिळाली. यानंतर सलीम-जावेद जोडी जमली. त्यांनी मागे वळून बघितले नाही. या जोडीने चित्रपटनिर्मित कथा, पटकथा एक स्वतंत्र विभाग असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या यशाचे घोडे चौखूर उधळले. सलीम-जावेद ब्रँड प्रस्थापित केला. अमाप प्रसिद्धीचचा कैफ कुणावरही चढतोच. त्याला हे तरी अपवाद कसे असणार. आमच्या उत्तम पटकथानकामुळे दिग्दर्शकास फारसे काम शिल्लक राहत नसल्याची फुशारकी मारण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामुळे काही निर्मात्यांनी त्यांच्याबरोबर काम करणेही बंद केले.
या दोघांची मैत्री जेवढी घट्ट तेवढेच त्यांचे यशाशी नातेही अगदी पक्के. सलीम-जावेद म्हणजे यश व यश म्हणजे सलीम-जावेद असे समीकरणच त्यांनी प्रस्थापित केले. त्यांनी लिहिलेल्या अनेक संवादांनी शब्दांना, भूमिकांना अर्थ दिला आहे. 'मेरे पास गाडी है, बंगला है.. तुम्हारे पास क्या है...? मेरे पास मॉ है.... (दिवार), पचास कोस दूर जब कोई बच्च रोता है तो मॉं कहती है गब्बर आयेगा...(शोले), मुझे तो सब पुलिसवालोंकी सूरत एक जैसी लगती है (शोले). असे किती डायलॉग सांगावेत. शोले तर पूर्ण संवाद पाठ असणारे आजही अनेक लोक आहेत. केवळ गद्य शब्दांच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. पण सलीम जावेदने ती करून दाखवली. शोले, दिवार, जंजीरचे संवाद बदलून दुसरे लिहिले तर तो चित्रपट तितका गाजेल? लोकांना ते आवडेल? सलीम-जावेद जोडीच्यचा यशाचा झंझावात तब्बल अकरा वर्षे होता. त्यांच्या मैत्रीची घट्ट वीण यावरून दिसते. प्रचंड पैसा, प्रसिद्धी लाभूनही यश त्यांच्या डोक्यात शिरले नाही. इर्षा, असूया या मानवी भावनांचा या काळात त्यांच्यावर प्रभाव पाडू शकल्या नाहीत. पण तरीही ही जोडी 1980 नंतर फुटली. त्याची कारण अनेक सांगितली जातात. मतभेद हेही एक कारण. पण ते निर्माण कशामुळे झाले याचीही अनेक कारणे आहेत. जावेदच्या जीवनात शबाना आझमी आल्यानंतर जावेदला स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली. शायरीचा छंद त्यांना वयाच्या तेराव्या वर्षापासूनच होता. त्यामुळे या जोडीने विभक्त होऊन स्वतंत्रपणे काम करायला सुरवात केली. जावेदने गीतलेखनात स्वतःची वाट शोधली. नंतरही त्यांनी स्वतंत्रपणे पटकथा लिहिल्या. पण पूर्वीची सर त्याला आली नाही. विभक्त झाल्यानंतर सलिमने नाम व जावेदने प्रतिकारची पटकथा लिहिली. पण यश तितके मिळाले नाही. मध्यंतरी जावेदने दीर्घ कालावधीनंतर फरहानसाठी 'लक्ष्य' ची पटकथा लिहिली. पण चित्रपट फार गाजला नाही. शेवटी प्रश्न पडतो, दोघेही प्रतिभावान होते, तरीही स्वतंत्रपणे ते तितके यशस्वी संवादलेखन का करू शकले नाहीत? परस्पर प्रेरणेचा अभाव हे त्याचे उत्तर असू शकेल. सुरवातीला बरोबर काम करताना एकमेकांच्या शब्दांत प्राण त्यांनी ओतले असतील. त्यामुळेच शब्दांना अर्थ आला. एकमेकांची प्रेरणाही ते स्वतःच होते. त्यामुळे वेगळे झाल्यानंतर प्रेरणेचा हा स्त्रोतच आटला. आणि कागदावर फक्त शब्द लिहिले गेले. कोरडे. प्राणहीन.