शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मैत्री दिन
Written By मनोज पोलादे|

जोडी तुझी माझी

मानवी भावभावनांचाच अविष्कार असलेला चित्रपटही मैत्री या भावनेपासून कसा वेगळा राहिल. चित्रपटासाठी काम करताना अनेकांचे सूर जुळले. मनांच्या तारा जुळल्या. परस्परांचे उत्तम कॉम्बिनेशन झाले. यातूनच मैत्रीचे बंध बांधले गेले. त्यामुळेच विशिष्ट जोडी एकत्र आली की त्यांची कलाकृती चांगली होते. तिला प्रतिसादही चांगला मिळतो. चित्रपटसृष्टीत अनेक दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री किंवा संगीतकार यांचे कॉम्बिनेशन तयार झाले आहे. हीट कॉम्बिनेशन म्हणून ते ओळखले जाते.

अशा मैत्रीची उदाहरणे तरी किती म्हणून सांगावीत. मागे डोकावले तरी बरीच उदाहरणे दिसून येतील. गुरूदत्त, देव आनंद, गुरूदत्त आणि जॉनी वॉकर या जोड्या अनेक चित्रपटात एकत्र होत्या. गुरूदत्त आणि जॉनी वॉकरला वेगळे काढता येणार नाही एवढे त्यांचे मैत्र जुळले होते. तीच कथा गुरूदत्त आणि पटकथाकार अब्रार अल्वींची. अनेक प्यासा, कागज के फूल सारखे अनेक चांगले चित्रपट या जोडीच्या संवेदनशीलतेतून जन्माला आले.

दिग्दर्शक राजकपूर, गीतकार शैलेंद्र व संगीतकार शंकर जयकिशन यांची जोडीही अशीच. आवारा, श्री. 420, मेरा नाम जोकर, बुटपॉलीश यासारख्या अद्वितीय कलाकृती या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारल्या. यात मुकेशचेही नाव घेता येईल. राज कपूरला मुकेशचा आवाज हे कॉम्बिनेशन इतके अतूट आहे, की राज कपूरची इतर गायकांनी ऐकलेली गाणी चटकन वेगळी वाटतात, एवढे राज आणि मुकेशच्या आवाजाचे मैत्र जुळले होते.

शोलेमधील जय (अमिताभ) आणि वीरूची (धर्मेंद्र) यांची मैत्री अजरामर झाली. पण हेच कॉम्बिनेशन पुढील अनेक चित्रपटात यशस्वी ठरले. चुपके चुपकेमध्ये हे दोघे एकत्र होते. शोलेतील या जोडीला एक तिसराही कोन होता, अमजद खानचा. अमिताभ आणि अमिताभ हे नायक- खलनायकाची जोडी अनेक यशस्वी चित्रपटांचा पाया आहे. लावारीससह अनेक चित्रपटातून त्यांचा `याराना` दिसून येतो. अभिताभची जोडी काळानुरूप अनेक दिग्दर्शकांशी जमली. ऋषिकेश मुखर्जीपासून तर रामगोपाल वर्मापर्यंत. ऋषिदांसोबत त्याने अभिमान, मिली, गुड्डीसारखे संवेदनशील चित्रपट दिले. प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई हे य़शस्वी व्यावसायिक कॉम्बिनेशन होते. या दोघांबरोबर अमिताभने मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी, जंजीर, नसीब अशा अनेक चित्रपटांत काम केले. ही यादी बरीच वाढवता येईल. सध्या रामगोपाल वर्मांबरोबरही त्यांची केमेस्ट्रीही चांगली जुळली आहे. सरकारपासून तर सरकार राजपर्यंत त्याचेच प्रत्यंतर येते.

अगदी अलिकडच्या काळातील उदाहरण घ्यायचे झाले तर गोविंदा डेव्हिड धवन, करण जोहर शाहरूख खान हे घेता येईल. शाहरूख खान हा करण जोहरचा अत्यंत आवडता अभिनेता आहे. त्यामुळे दिल तो पागल है, कुछ कुछ होता है पासून कभी अलविदा ना कहना पर्यंत त्यांची जोडी टिकून आहे. तीच कथा डेव्हिड धवन आणि गोविंदाची. ऑखेपासून दोघांची भट्टी अशी जमली की ते जणू एकमेकांचे `पार्टनर` आहेत की काय असे वाटते. मधल्या काळात डेव्हिडचे चित्रपट अपयशी ठऱत होते. पण त्याने गोविंदाला घेऊन पार्टनर केला आणि यशाची पाटी पुन्हा डेव्हिडच्या नावापुढे झळकली.
गुलजार संजीवकुमारची जोडीही अशीच. अगदी परफेक्ट. एकाच्या उक्तीतून दुसर्‍याची कृती उमटणार. ऑंधी, मौसम, कोशीश चित्रपट बघितले की त्यांच्या केमिस्ट्रीतून पडद्यावर साकारलेल्या अप्रतिम कलाकृतीचा प्रत्यय येते.

मधुर नाते
संगीत हे क्षेत्र मुळातच एकमेकांच्या सहकार्यावर, मैत्रीवर अवलंबून असणारे क्षेत्र आहे. एसडी, आरडी बर्मन, अनिल विश्वास, सलील चौधरी, रवी, मदनमोहन या प्रतिभावंत संगीतकारांनी एकट्याने संगीत दिले असले तरी अनेक संगीतकार जोड्यांचे मधुर संगीत त्यांच्यातील मैत्रीच्या गोडीचे निदर्शक आहे. शंकर जय किशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी यांच्यापासून ते आजच्या शंकर एहसान लॉयपर्यंत ही यादी वाढवता येईल. पण याचबरोबरीने विशिष्ट् संगीतकाराचे विशिष्ट गायकाशी जुळलेले नाते अवीट गोडीची कलाकृती निर्माण करून जाते. लता मंगेशकर यांनी सर्वंच संगीतकारांबरोबर चांगली गाणी दिली. पण मदनमोहन आणि सचिन देव बर्मन यांच्याबरोबरची गाणी काही वेगळीच. त्याचवेळी ओ. पी. नय्यर यांनी लताला वगळून चांगले संगीत दिले ते आशा भोसलेंच्या साथीने. या दोघांची अतिशय चांगली गाणी आजही चटकन ओठावर येतात. राहूल देव बर्मन व किशोर हीसुद्धा अशीच प्रतिभावंत जोडी. हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळानंतरच्या काळातील अनेक अविस्मरणीय गाणी यांनी दिली आहेत.

मैत्रीची अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. पडद्याबाहेरचे हे मैत्र पडद्यावर सृजनात्मक अविष्काराला कारणीभूत ठरले आहे. या सृजनाच्या तळाशी मात्र त्यांचे जुळलेले सूर आहेत, हेही तितकेच खरे.