गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (22:01 IST)

सूर्यमालेत पृथ्वीसारखा नवीन ग्रह सापडला आहे का?

आपल्या सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून असे एकूण आठ ग्रह आहेत.
 
तसंच प्लुटो, सिरस, ऑर्कस यांसारखे बटू ग्रह आहेत. त्याशिवाय अनेक लघुग्रह आणि धूमकेतूही सूर्याभोवती फिरतात.
 
पण आता जपानचे शास्त्रज्ञ पुन्हा सांगतायत की सूर्यमालेत नववा ग्रह असू शकतो आणि तो काहीसा पृथ्वीसारखाच असण्याची शक्यता आहे.
 
हा नववा ग्रह नेमका कुठे असण्याची शक्यता आहे आणि त्या ग्रहावर कुणी राहात असेल का?
 
सूर्यमालेत नववा ग्रह सापडलाय का?
सूर्यमालेत आणखी एक ग्रह सापडल्याचे अनेक दावे आतापर्यंत अनेकांनी केले आहेत, पण त्याचे कुठले सबळ पुरावे मिळालेले नाहीत.
 
पण जपानच्या खगोलशास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांना नेपच्यूनच्या पलीकडे कायपर बेल्टमध्ये असे पुरावे सापडले आहेत, ज्यामुळे नवव्या ग्रहाच्या अस्तित्वाची शक्यता नाकारता येत नाही.
 
कायपर बेल्ट म्हणजे नेमकं काय?
तर सूर्यमालेत नेपच्यूनच्या कक्षेपलीकडे बर्फाळ वस्तूंचा एक पट्टा आहे. इथे प्लुटो, माकीमाकी सारखे बटू ग्रहही आहेत.
 
डच खगोलशास्त्रज्ञ जेरार्ड कायपर यांच्या नावावरून त्याला कायपर बेल्ट असं म्हटलं जातं. दुरून पाहिलं तर एखाद्या तुकड्यातुकड्यांनी बनलेल्या कड्यासारखाच किंवा बांगडीसारखा हा भाग सूर्याभोवती फिरताना दिसतो.
 
पृथ्वीपासून सूर्याचं अंतर म्हणजे एक अस्ट्रॉनॉमिकल युनिट असं मानतात आणि कायपर बेल्ट सूर्यापासून 30 अस्ट्रॉनॉमिकल यूनिट एवढा दूर आहे.
 
या प्रदेशाला ट्रान्स-नेपच्युनियन ऑब्जेक्ट्स म्हणजेच नेपच्यूनच्या पलीकडील वस्तूंचा प्रदेश म्हणूनही ओळखलं जातं.
 
अमेरिकन अंतराळ संस्था नासानं दिलेल्या माहितीनुसार सूर्यमाला विकसित होत असतानाच्या सुरुवातीच्या काळात ज्या वस्तू उरल्या त्या सगळ्या वस्तू या कायपर बेल्टमध्ये जमा झाल्या असू शकतात. अगदी अलीकडेच माणसानं या पट्ट्यातील वस्तूंचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे.
 
याच प्रदेशात पृथ्वीसारखा एक ग्रह असल्याची शक्यता जपानच्या नॅशनल अस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरीच्या संशोधकांनी मांडली आहे.
 
ही शक्यता त्यांनी कशी मांडली, हे समजून घेण्यासाठी आधी नेपच्यूनचा शोध कसा लागला, हे जाणून घ्यावं लागेल.
 
तर, 1781 साली विल्यम हर्षेल यांनी सूर्यमालेत युरेनस हा सातवा ग्रह हुडकून काढला होता. पण युरेनसनं सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करेपर्यंत 1846 साल उजाडलं. दरम्यानच्या काळात युरेनसच्या कक्षेत शास्त्रज्ञांना अनियमितता आढळून आली.
 
ही अनियमितता त्याच्यापलीकडे असलेल्या एखाद्या ग्रहामुळे असावी, असा अंदाज बांधला गेला.
 
फ्रान्सच्या पॅरिसमध्ये अर्बेन ल वेरियर यांनी गणितं मांडून हा ग्रह कुठे असू शकतो, याचं भाकित केलं. मग जर्मनीच्या बर्लिन वेधशाळेच्या खगोलशास्त्रज्ञांनी आकाशाच्या त्या भागाची पाहणी केली आणि नेपच्यूनचा शोध लागला.
 
आता कायपर बेल्टमध्येही असंच काहीतर घडत असल्याचं जपानच्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. त्यांचा दावा आहे की कायपर बेल्टमधील काही वस्तूंचं वर्तन पाहिलं, तर त्यांच्यात एखादा छोटा ग्रह लपलेला असण्याची शक्यता वाटते.
 
म्हणजे या वस्तूंच्या कक्षेत आढळणारी विसंगती ही आसपास असलेल्या एखाद्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडल्यामुळे निर्माण होत असावी, असं ते सांगतात.
 
या ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा किमान तीन पटींनी मोठा असू शकतो, असा अंदाजही ते मांडतात. मात्र तिथे जीवन असण्याची शक्यता नाहीये कारण त्या ग्रहावरील तापमान प्रचंड थंड असेल.
 
केवळ एकच ग्रह नाही तर आणखीही काही ग्रह असे सूर्यमालेच्या या दूरच्या भागात लपलेले असू शकतात असं शास्त्रज्ञांच्या या टीमला वाटतं.
 
प्लूटो ग्रह आहे की नाही?
नवव्या ग्रहाच्या अस्तित्वाची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करतायत पण याच बेल्टमध्ये असलेल्या प्लुटोला विसरता येणार नाही.
 
सुमारे सत्तर वर्ष अनेकजण प्लुटोला नववा ग्रहच मानत होते. पण 2006 साली प्लुटोचं डिमोशन झालं आणि त्याला dwarf planet म्हणजेच बटूग्रहाचा दर्जा मिळाला. कारण प्लुटोचा आकार आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षाही लहान आहे.
 
आता प्लुटो हा बटूग्रह असला तरी तो कायपर बेल्टमध्ये सापडेली आजवरची सर्वात मोठी वस्तू आहे.
 
14 जुलै 2015 ला नासाच्या न्यू होरायझन्स अंतराळ यानाने प्लुटोच्या कक्षेत प्रवेश केला होता. या यानाने प्लूटो आणि त्याच्या उपग्रहांचे फोटो पाठवलेत.
 
त्यामुळे सौरमालेतल्या या रहस्यमयी जगाबद्दल आपल्याला बरीच नवीन माहिती मिळाली आहे.
 
न्यू होरायझन्सनं गोळा केलेल्या माहितीतून प्लुटोवर लाल रंगाचं बर्फ, निळं स्वच्छ आकाश आणि उंचच उंच पर्वत असल्याचं दिसून आलं.
 
या मोहिमेनं हेही दाखवून दिलं की कायपर बेल्टविषयी आणि तिथल्या वस्तूंविषयी आपल्याला असलेली माहिती अजूनही तोकडीच आहे आणि त्यामुळेच इथे नव्या ग्रहांचा, वस्तूंचा शोध अजून संपलेला नाही.