बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

रेडी टू ड्रींक पेय आरोग्यास घातक

बरेचदा आरोग्यवर्धक अशी रेडी टू ड्रींक पेयाची जाहिरात केल्याने अनेक जण त्या जाहिरातीस बळी पडतात व अशा पेयांच सेवन केलं जात. यामध्ये सर्वसाधारण विविध फळांचे, फ्लेवर्सचे ज्युसेस, डायट कोक, पल्प्स, कृत्रिम शितपेयांचा समावेश असतो. अशा पेयांचे सातत्याने सेवन केल्यास वेगवेगळ्या आजारांना निमत्रंणच असेल यात शंका नाही. 

 

विविध सोहळे, समारंभ, उन्हाळा तसेच संतुलित आहार व आपल्या आरोग्याला सांभाळणा-या अनेकांच्या लिस्टमध्ये अशा रेडी टू ड्रिंक फळांच्या रसांचा, तसेच डायट पुरक शितपेयांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे अनेकदा एनर्जी ड्रिंक घेतल्या जातात हया सर्व उत्पादकांचा आरोग्यावर घातक परीणाम होतो. या कृत्रिम उर्जा, उत्तेजक पदार्थांच्या  सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपल्या पोटात जातात याची आपण कधी कल्पनाही करत नाही. कृत्रिम द्रव पदार्थ बनविण्यासाठी केमिकल्स, साखर, कार्बोहायड्रेड, कॅलरीजचे अति प्रमाण व त्यामुळे साखरेचे वाढलेले प्रमाण तसेच मिठाचेही प्रमाण अधिक असल्याने असे द्रव पदार्थ आरोग्यास हानिकारकच व मधुमेहासारख्या रूग्णांनी याच्या जवळपासही जाऊ नये.  अशा द्रव पदार्थांत साखरेचे प्रमाण हे नियमित साखरेपेक्षा दहा पटीने अधिक असते. 
 
कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अ‍ॅसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, अ‍ॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता असते. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच. लहान मुलांमध्ये हायपर ऍक्टीव्ह तर गरोदर महिलांनी अशा पेयांच सेवन केल्यास बाळाला व्यंग होण्याची शक्यता असते.  सोडीयम बेंझाएटच प्रमाण असलेल्या द्रव पदार्थांच्या अतिसेवनाने अस्थमा अटॅक, रक्तदाब वाढणे, किडनी निकामी होणे, जीवघेणी एलर्जीची रिएक्शन होण्याची शक्यता असते. 
 
द्राक्ष व टोमॅटो द्रव पेयांमध्ये मोनो सोडीयम ग्लुटामेट्सचा वापर असल्याने याची चव मिठाप्रमाणे असते व हा घटक अधिक आकडीचे आजार, मायग्रेन, मेंदूच्या रक्तवाहिन्यांना धोका तसेच मानसिक आजाराला कारणीभूत ठरू शकतो.
 
शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, व्यक्ती जर सातत्याने शीतपेयाचे सेवन करीत असेल तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. कोणतेही ३५० मिलीलिटर (ज्यामध्ये ३१.५ ग्रॅम साखर असते.) शीतपेय एकावेळी घेतल्यास Diabetes-2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता २०% बळावते. शर्कराविरहित पेय अथवा आयस्क्रिम यामध्ये अँस्पोर्टेन या घटकाचे प्रमाण असल्याने कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच पोटाचे विकार होण्याचीही शक्यता असते.
 
कोणतेही पेय जे कृत्रिमरितीने बनविले आहे ते आरोग्यास धोकादायकच आहे,  तरीही तुम्ही अशा पेयांचे सेवन करण्यापुर्वी त्यावर दिलेली माहिती काळजीपुर्वक वाचने आवश्यक आहे. कोणत्याही फळाचं रस करून पिण्यापेक्षा ते फळ तसेच खाणे हे आरोग्यास चांगलेच आहे. कारण, रसांच्या स्वरूपात शरीरात जाणा-या कॅलरींचे प्रमाण अधिक व कर्बोदके कमी अशते. लहान मुलांसाठी फळांचा पल्प बनवून देणे नेहमीच चांगले ठरते.  त्याचप्रमाणे घरी बनविलेले लिंबू पाणी, कोकम सरबत हे आरोग्यास नेहमीच चांगले.  मधुमेह असणा-या रूग्णांसाठी मात्र कोणतेही पेय आरोग्यास पुरक नाहीत.
- डॉ. रोशनी प्रदिप गाडगे, मधुमेहतज्ञ, मुंबई