मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

बॉम्बे डाईंगचा तरूण सूत्रधार

ND
नेस वाडिया यांचा जन्म 30 मे 1970 रोजी झाला. नसली आणि मॉरिन वाडीया या दाम्पत्याचा नेस हा मुलगा. वाडिया यांचा बॉम्बे डाईंगा हा कपड्यांतील ब्रॅंड प्रसिद्ध आहे. नेस वाडिया यांची आणखी एक ओळख आहे. पाकिस्तानचे निर्माते कायदे आझम मोहंम्मद अली जीना यांचे ते खापर पणतू आहेत. कमी किमतीत विमान प्रवासाची संकल्पना मांडणारे जेह वाडीया हे नेस यांचे बंधू.

नेस यांनीही अल्पावधीतच आपला ठसा उद्योग जगतावर उमटवला आहे. ते बॉम्बे डाईंगचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीतील टेक्सस्टाईल आणि पॉलिस्टर व्यवसायाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. तसेच वाडिया ग्रुपच्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, शॉपिंग सेंटर, रिटेल उद्योग या शाखांची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.

सेंट लॉरेंन्स स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, नेस यांनी अमेरिकेतील बोस्टन येथील टुफ्ट युनिर्व्हसिटीत शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेस यांनी 1993 मध्ये बॉम्बे डाईंग या घरच्या कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून कामास सुरूवात केली. त्यांनी आपल्या कंपनीच्या विविध विभागात काम केले. हा कामाचा अनुभव घेतल्यानंतरही आपण अजूनही अपूर्णच असल्याचे जाणवल्यानंतर नेस यांनी 1998 मध्ये विज्ञान, तंत्रशिक्षण, व्यवस्थापन विषयात मास्टर डिग्री संपादीत करत, 'लिडींग टू सक्सेस इन इंडिया' या विषयावरचा एक प्रबंध सादर केला. मास्टर डिग्री घेतल्यानंतर 2001 मध्ये त्यांनी पुन्हा बॉम्बे डाईंगचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून धुरा हातात घेतली. आणि लवकरच ते सह व्यवस्थापकीय संचालक झाले.

वाडिया ग्रुप
वाडिया ग्रुप भारतातील अत्यंत प्रतिष्ठीत समजला जातो. त्याला ऐतिहासिक परंपराही लाभली आहे. यापूर्वी वाडिया ग्रुप मरिन कन्स्ट्रक्शनमध्ये होता. त्याकाळात सुमारे 355 जहाज वाडियांनी तयार केले होते. यात ब्रिटीश नेव्हीसाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या बिगर ब्रिटीश कंपनीने बनविलेल्या जहाजाचाही समावेश आंहे. आज हा ग्रुप हा प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. टेक्सटाईल, फूड अँड डेअरी, लाईट इंजिनिअरींग, पॉलिस्टर, केमिकल, रिअल इस्टेट, रिटेल एव्हिऐशन आदी क्षेत्रांचा यात समावेश आहे.

वैयक्तिक माहिती
नेस व बॉलिवूड स्टार प्रीती झिंटा यांच्यात 2005 पासून घट्ट मैत्री आहे. या दोघांच्या मैत्रीचे लवकरच विवाहात रूपांतर होणार आणि दोघांचे बिनसले अशाही बातम्या प्रसारमाध्यमांत नेहमी येत असतात. पण असे काही नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही अधून मधून बातम्या येतच असतात. वाडिया परिवार हा अत्यंत धार्मिकही मानला जातो. ते पारशी असूनही नित्यनियमाने तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जातात हे विशेष.