मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

बॉलीवूडचा 'किंग' शाहरूख खान

IFM
'किंग खान', बॉलीवूडचा बादशाह अशा अनेक नावांनी शाहरूख खानला ओळखले जाते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय युवावर्गावर प्रभाव टाकणारा शाहरूख या वर्गाचा 'आयकॉन' मानला जातो. दिल्लीत सामान्य कुटुंबात जन्माला आलेला शाहरूख आज बॉलीवूडचा बादशाह बनला आहे. त्याचा संघर्ष हा अनेकांना प्रेरणा देणारा ठरला आहे.

शाहरूखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. त्याचे वडील ताज मोहंम्मद खान हे स्वातंत्र सेनानी होते. त्याची आई ही मेजर जनरल शहानवाज खान यांची दत्तक मुलगी. दिल्लीतून चित्रपटसृष्टीत करीयर करण्यासाठी आलेल्या शाहरुखने चिकाटी आणि तीव्र संघर्षाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. अमिताभनंतरचा सुपरस्टार म्हणूनही त्याला संबोधण्यात येते.

त्याने आपल्या करियरची सुरवात केली ती हिंदी मालिकांमधून. त्यावेळी तो ज्युनिअर आर्टिस्ट होता. पण 1980 दशकात त्याला चांगले काम मिळत गेले. 1992 साली दिवाना या आपल्या पहिल्या चित्रपटातून त्याला अमाप लोकप्रियता लागली. सुरवातीलाच त्याने जवळपास सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळविले. 1995 मध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' 1998 ला 'कुछ कुछ होता है' 2001 ला 'कभी खुशी कभी गम', स्वदेश आणि अलिकडे 'ओम शांती ओम' असे त्याचे अनेक चित्रपट गाजले.

शाहरूखने वयाची बेचाळीशी पूर्ण केली तरी तिकिट खिडकीवर तो आजही निर्विवाद बादशाह आहे. जाहिरात जगतात त्याची ब्रँड व्हॅल्यू इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त आहे. त्याच्या अफाट प्रसिद्धीची दखल घेत लंडनच्या मॅडम तुसॉं म्यझियममध्ये त्याचा मेणाचा पुतळा बसविण्यात आला आहे. नुकताच त्याला फ्रेंच सरकारचा एक पुरस्कारही मिळाला आहे. शिवाय भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.