गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By वेबदुनिया|

बरस रे घना...

प्रत्येकाच्या प्रेमात या रिमझीम पावसाची ओढ लावणारी मध्यस्थी असते. म्हणूनच या रिमझीम बरसणा-या पावसात आणि तिच्यात काही तरी साम्य असल्याचे नेहमीच त्याच्या मनाला स्पर्श करून जाते. कारण सुगंधाची दरवळ घेऊन पृथ्वीच्या सानिध्यात बरसणा-या या पावसाच्या आगमनामुळेच ओसाड माळरानावरतीही प्रीतीची पालवी फुटते. अगदी तसेच ती आल्यावरही त्याच्या मनामध्ये या प्रीतीचा गंध दरवळू लागतो आणि पाहता पाहता वातावरण गुलाबी होऊन जाते हे त्यालाही कळत नाही. मित्रांनो, अशाच या रिमझीम पावसाच्या आणि तिच्या आठवणींनी, तुमच्याही मनामध्ये घर केलं असेलच ना. मग हा रिमझीम पाऊस पाहिला की, खुलताना तुमच्याही मनाचा पिसारा त्याच पावसाच्या व तिच्या आठवणींनी खुलतो.

त्याची आणि पावसाची मैत्री काही न्यारी असते. नेमकी ती भेटावयास आली की, पाऊस बरसून मदत करणार. मग तीच या पावसावर आणि त्याच्यावर रुसव्यफुगव्यांची बरसात करते. पण मनापासून तिला हा पाऊसही आवडतो आणि तोही. कारण या पावसाच्या साक्षीनेच प्रीतीचा गारवा दोघांच्याही मनामध्ये गंधीत होत असतो. पावसामुळे दरवळणारा मातीचा गंध, ते टपोर थेंब, वा-याची येणारी ती झुळूक, चिंब भिजल्यानंतर एकमेकांना नयनात शोधणा-या त्या नजरा आणि तिच्या भिज-या चेह-यावरील आनंद पाहण्याचे मिळालेले ते भाग्य त्याला आणि तिला अगदी बेधुंद करून जाते. पावसाने तिची अडवलेली वाट त्याच्यासाठी एक प्रीतीची भेटच ठरून जात नाही. मित्रांनो, यामध्ये पाऊस आपली मैत्री निभावतो आणि आपण आपली प्रीत फुलवतो.

अजूनही आठवतंय मला, एकदा या वेड्या पावसाने तिची अशीच वाट अडविली होती. पण ती त्या पावसावर थोडीही रागावली नाही. उलट तिनं या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. या पावसाचा तिला इतका आनंद झाला होता की, आता तिला तिनं आणलेल्या छत्रीचंही भान राहिलं नव्हतं की, घरी जाण्यासाठी होणारा उशीरही ती विसरली होती. त्या पावसात अगदी चिंब चिंब भिजली ती. पावसाच्या रिमझीम सरी अंगावरती घेत ती माझ्यावर पाणी उडवीत होती आणि मी तिचं भिजलेले रूप न्याहळत होतो. माझ्याशी हुज्जत घालून चहा पिण्याचा आनंदही अगदी मनमुरादपणे तिनं यावेळी घेतला होता.

पावसाची सर आणि तिचं सौंदर्य यांचा मिलाफ त्या क्षणाला अगदी गुलाबी करून गेला होता. अशीच ओढ वाढविताना मित्रांनो हा पाऊस त्याच्या आणि तिच्या भेटी घेत. खरंच त्याला आणि तिला काही क्षण का होईना पण हृदयातील प्रीतीचे मनमोहक क्षण बहाल करणारा हा पाऊस वेडाच भासतो नाही. कोण जाणे त्याला कशा कळतात हृदयातील या भावना. त्यानेही प्रेम केले असेल का कुणावर ? कुणीतरी दिला असेल त्यालाही प्रीतीचा गुलमोहर. कुणीतरी पाहावयास लावली असेल त्यालाही वाट. म्हणून नाही का हा पाऊसच शाहण्यासारखा धाऊन येतो. एकांताच्या क्षणी दोघांच्याही आनंदाला मोकळी वाट करून देण्यासाठी. दुनिया काहीही म्हणो पण त्या दोघांचीही प्रीत या रिमझीम पावसाच्या सरीशिवाय गंधीत होऊन फु लत नाही हेच खरे.