शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By

पहिली आस...!

दिवस कसे जात होते, मला काही कळतच नव्हतं. जेव्हापासून माझ्या मनाला तिला पाहण्याची हुरहुर सुरु झाली, तेव्हापासून माझं आयुष्य कसं बहरुन आलं. माझ्यातला प्रेमांकुर उमलायला लागला. तिच्या एक-एक झलकेसाठी मन कणकण झुरत असायचं. ती जोपर्यंत मला दिसत नव्हती, तोपर्यंत माझं कशातही लक्ष लागत नव्हतं, मनात जेव्हाजेव्हा सोनलला पाहण्याची तळमळता फुलायची, तेव्हातेव्हा मात्र माझ्या मनात काही प्रश्न सारखी कुजबुज करायची की मी तिला पसंत करतो पण ती मला पसंत करेल का? आणि पसंत करत ही असेल... पण जेव्हा तिला माझी अठराविश्र्व दारिद्र्याची परिस्थितीची माहिती होईल, तेव्हा ती आपल्याला खरंच स्वीकारले का?

मी मनाला फार आवर घालीत होतो. पण तिला पाहिल्याशिवाय मला मात्र चैन पडत नव्हते. मी बरेचदा स्वतःशी बोललो की प्रेम करणं आपल्यासारख्या निरागस माणसाचं काम नाही. मला माझ्या हालाकीच्या परिस्थितीची पुर्ण जाणीव होती. शिवाय माझ्यावर माझ्या घरची जबाबदारी होती. तेव्हा मात्र काळीज थक्क व्हायचं. मी तिला न पाहण्याचा, तिच्यापासून दूर जाण्याचा बराच प्रयत्न करीत होतो. पण माझं मन, माझी पावलं तिच्यात दिशेने नकळत वळत असे आणि अशातच तिच्याविषयी आत्मीयता, तळमळता एकासारखी गरुडझेप घेऊन प्रेमाच्या क्षितिजाकडे मार्गस्थ होऊ पाहत होती.

असेच एक दिवशी सोनल कॉलेजमध्ये आली नव्हती. कॉलेज सुरु झाले. पहिली दुसरी क्लास झाली तरी तिचा पत्ता नाही. त्यामुळे माझ्या मनात अस्वस्थता वाढत होती. ती का बरं आज आली नसेल? तिला बरं तर वाटत नसेल ना? कदाचीत ती तिच्या गावाला तर गेली नसेल ना? यासारखी कित्येक प्रश्न माझ्या अस्वस्थ मनाला छळत होती. माझी ही कुतूहलता लक्षात घेत माझा मित्र रवी म्हणाला गुमसूम गुमसूम? 'नाही रे रवी, कुठे मी गुमसुम...?'

मी त्याला खोटं हसू देत म्हणालो. त्यानं मात्र माझा नेम धरत आणखी तार छेडली. 'मग तुझं लक्ष का विचलीत दिसत आहे विशाल...?'
'नाही रे रवी, कुठं विचलीत आहे.'

'विशाल तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरीही काही लपवू शकत नाही.' रवी मला विचारता झाला. त्याचं बोलणं एकून त्याला काय सांगाव नि काय नाही, अशी मनात त्रेधा उडू लागली. मी स्वतःला सावरत त्याला म्हणालो,
'काही नाही रे माझ्या मित्रा मी खरंच काहीही तुझ्यापासून लपविलं नाही... 
पक्कं काहीच नाही...' त्याला कसं सांगावं की सोनल आज न आल्यामुळे मला किती अस्वस्थ होत आहे. पणकाय करावं, तिच्याबद्दल कुणाला विचारावं, या पेचात असतानाच मधली सुट्टी झाली. सारखं वाटत होतं की सोनलच्या मैत्रिणींना विचारावं का? ती का बरं आली नाही. पण कसं? शेवटी हिम्मत करुन मी केवल मॅडमला विचारलं, 'मेडम, आज सोनल मॅडम दिसत नाहीत...' हे ऐकताच त्या तिघी माझ्याकडे टकवक पाहत होत्या. थोड्या हसून त्या म्हणाल्या, 'नाही सर, त्या आज येणार नाही कारण त्यांचा आत्याकडे कार्यक्रम आहेत.'
'हो का'
'का बरं सर, आपण का बरं विचारता?'
केवल मॅडम मला प्रश्नार्थ बोलल्या. 'नाही हो मॅडम, आपलं सहजच विचारलं.'
मला कळत नव्हतं की मला नेमके काय झाले, होत आहे. ती नेमकी माझ्यासाठी कोण आहे? तिची माझी ओळख किती दिवसांची अथवा किती महिन्यांची? जिने मनाला एक विलक्षण भुरळ पाडून मनात अदृश्य प्रेम भावनेचा भाव फुलवला आणि या भासात काळजात तिच्या कल्पनेशिवाय आता स्पंदन नाहीत पण आता आपण काय करावं? आपण या मध्ये नकळतपणे आत-आत शिरत चाललोय, हा विचार येत असतानाच मनात आज, काल व आजजचे प्राधान्य लक्षात यायचे. आजकाल मुली केवळ पैशावाल्यानां, धनसंपन्न व्यक्तीला प्राधान्य देतात. पण नाही आपली सोनल तशी नसेल, ती आपल्यासारख्या सामांन्याला नक्की स्वीकारेल. हा माझा अतिआत्मविश्वास की काय कुणास ठाऊक? पण हा आत्मविश्वास माझ्यात सोनलच्या त्या गोंडस नयनांनीच जागृत केला होता. तिची ती सोज्वळ काया, पिवळ्या पिवळ्या ड्रेसवरती पांढर्‍या ठिपक्यांची पांढरी ओढणी माझ्या समोर मला आता ही प्रभावित करत होती. आणि यात रात्र फुलून बहरली होती. विचार करता करता झोप कशी लागली, काही कळलेच नाही.

सकाळ होताच मी लगबगी ने तयारी करुन कॉलेजमध्ये पोहचलो. तिथे पोहचल्यावर पाहतो तर सोनलसुध्दा मला आज लवकर आलेली दिसली. तेव्हा ती आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारीत होती. मला पाहून केवल मॅडमनी मुद्दाम करुन आवाज दिला' काय सर आज लवकर आलात कॉलेजमध्ये?' मला माहीत होतं की त्या मुद्दामच माझी फिरकी घेत होत्या. मी त्यात हसत म्हणालो, ' नाही हो मॅडम, काही काम होतं म्हणून आलो लवकर...' 'होका' त्या हसत म्हणाल्या.

मी बोलता बोलता सोनलकडे नजर टाकत होतो. आणि माझ्या त्या नजरेला समपर्क प्रतिसादही प्राप्त होत होता. तिची व्याकुळ नजर पाहून मला कळले की तिला न पाहण्याची अस्वस्थता, व्याकुळता जशी माझ्या मनाला भासत होती, तशाच प्रकारच्या त्रास तिलाही झाला. जसे तिला पाहण्यासाठी मी तळमळ करीत आलो, तसेच तीसुध्दा आली असं मला तिच्या मैत्रिणींशी गप्पा करताना उमजलं. तिच्या मैत्रिणी माझ्याकडे पाहत म्हण्याला, 'सोनल मॅडम तुम्हाला यायचं नसलं की आम्हाला सांगत चला... 'अन त्या एकमेकींकडे पाहत हसू लागल्या. त्यांचा तो अंदाज मला पूर्ण उमजल. सोनलच्या त्या नजरेला पाहून मनाला लाजलेली तृष्णा तुप्त झाल्याचाच मला हर्ष झाला. अशातच कॉलेज सुरु झाल्याची घंटा घणनाद करीत समस्त आसमंताची आस जागृत करु लागली.

वात्सल्यसूत