गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2019 (14:29 IST)

सप्तपदी

आजोबांनी लाडू मागितला आजीने नाही दिला..
आजोबा खूप चिडले काही-बाही बोलले आणि निघून गेले
तशी कॉलेजात जाणारी नात म्हणाली शी बुआ आजी
आजोबांचं तुझ्यावर प्रेमच नाही..
आजी हसून म्हणाली असं काही नाही..
नाही कसं..?तुला रोझ नाही,साधं प्रपोज ही नाही
व्हॅलेंटाईन ला असं कधी भांडतात का कुणी…
 
तुला आमच्यातलं प्रेम कधी कळणारच नाही...
लग्नात देवाब्राह्मणसमोर मला वरलं..
गळ्यात त्यांच्या नावाचं मंगळसूत्र बांधलं..
सांग हे प्रपोज होतं का नव्हतं..?
ऑफिसातून येताना गजरा आणणं…
डोक्यांत माळल्यावर त्याचा अलगद सुगंध घेणं…
माहेरून परत आल्यावर आतुरतेने पळत येणं..
मी सासूबाईंना पाहून डोळे वटारले की
गुपचूप लाजून माझ्या हातातली बॅग आत नेऊन ठेवणं..
सांग हे प्रेम होतं का नव्हतं..
बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत हे डॉक्टर नी सांगूपर्यंत 
अस्वस्थ फेऱ्या मारणं…
मला त्रास नको म्हणून तुझ्या बाबाला तासभर फिरवून आणणं..
माहेरून उशिरा आले म्हणून सासूबाई रागावल्या तर ‘मीच सांगितलं होतं अशी थाप मारणं..” या सगळ्यांत प्रेमच तर होतं..
याच्याशी बोलू नको,आता माहेरी जाऊ नको.. या आज्ञेत प्रेम होतं.
साडी विकत आणून कोणी तरी प्रेझेंट दिली असं सासूबाईंना सांगणं..
नातेवाईकांच्या लग्नात ती साडी नेसून मिरवताना मला पाहणं..,
वट सावित्रीच्या उपवासादिवशी गुपचूप फळं आणून ठेवणं …, 
लेकीच्या लग्नात रडताना हळूच खांद्यावर हात ठेवून जवळ घेणं हे ही प्रेमच होतं..
 
त्यांनी ते प्रेम कोणत्या शब्दांत मांडलं नाही..
तुमचा सात दिवसांचा सप्ताह आमची साताजन्माची सप्तपदी..
मोहाच्या क्षणी चुकलेली वाट माझ्या डोळ्यातलं पाणी बघून सावरली…
आता पिकली पानं पण माझ्याशिवाय जगायची सवय नाही..
म्हणून तब्बेत बिघडवून माझ्या आधी जायची घाई…
आता या वयात हे ब्रेक-अप सोसवणार नाही...पण आता मी पण थोडी स्वार्थी झाले त्यांना इतक्या सहजा-सहजी सोडणार नाही..