गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By डॉ. उषा गडकरी|

जीवनफूल

NDND
हिरव्याकंच गवत-पात्यावरचा
अलवार रुपेरी दवबिंदू,
अथांग जलाशयाच्या नि:स्तब्ध पृष्ठभागावर
हलकंच उमटलेलं तरगांचं आवर्तन,
धनदाट पर्णसंभार असलेल्या गच्च वृक्षावरून
अलगद टपकलेलं दळदार पुष्प,
लुकलुकणार्‍या असंख्य ताराकापुंजातून
अवचित पृथ्वीकडे आकृष्ट झालेली तेजोशलाका,
NDND
लयदार पावलं टाकणार्‍या गाईंच्या कळपातून
चुकून बाहेर पडलेलं चुकार वासरू,
व्यवहाराच्या रहाटगाडग्यातून
हलकेच बाहेरपडू पाहणारं मनाच पाखरू,
जीवनफुलातील हे परागकणच
त्यातील मोहक गंधाचं निधान आहे.