बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

विश्वविक्रमाच्या वाटेवरचा ‘रहस्यमय’ प्रवास

- महेश जोशी

PRPR
आपल्या रहस्यकथांनी एकेकाळी उभ्या महाराष्ट्राला झपाटून टाकणारे, कादंबरी हातात घेतल्यानंतर ती संपेपर्यंत सुटूच नये जणू असा प्रघात पाडणारे ज्येष्ठ साहित्यिक गुरुनाथ नाईक आज विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत. १०९२ रहस्यमय कादंबर्‍यांचा बाबूराव अर्नाळकरांचा विक्रम मोडून गिनीज बुकात नाव नोंदविण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या एकूणच साहित्य प्रवासावर खास वेबदुनियाशी नाईक यांनी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा....
``मी कोणताही विक्रम करण्यासाठी कधीच लिखाण केले नाही. जे मनाला भावले ते लिहित गेलो आणि आज विश्वविक्रमाच्या जवळ जाऊन पोहचलो आहे,’’ वयाच्या सत्तरीतही तरुणांना लाजवेल असा उत्साह असणारे गुरुनाथ नाईक सांगत होते. त्यांच्या रहस्यकथांचा प्रवासही एखाद्या सस्पेन्स चित्रपटात शोभावा असाच आहे. ही घटना १९७० सालची. कामानिमित्त नेहमीच त्यांची पुण्यात ये-जा असायची. असेच एका भेटीत सदानंद प्रकाशनचे खाडीलकर भेटले. त्यांनी नाईक यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची मागणी केली. नाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटले. ते पूर्ण करावेच लागणार या हेतूने ते कामाला लागले.

नेमका त्याच काळात अलका चित्रपटगृहात 'किस द गर्ल्स अँड मेक देम डाय' हा इंग्रजी चित्रपट पाहिला. डोक्यात कथा लिहून देण्याचे विचार सुरू होते. अचानक चित्रपट अर्धवट सोडून ते उठले आणि थेट रूमवर गेले. रात्री दोन वाजेपर्यंत जागून त्यांनी पहिली मृत्यूकडे नेणारी 'चुंबन' रहस्यकथा लिहून काढली. सकाळीच ही कथा त्यांनी खाडीलकरांना सोपविली. घरी परतताच 'शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ' ही दुसरी रहस्यकथा तयार झाली. ती खाडीलकरांना सोपवून ते बेळगावला निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ खाडीलकरांचे पत्र आले. तुमच्या आणि गजाननाच्या कृपेने तुमच्या दोन्ही कादंबर्‍या छापत आहोत, कृपया निघून यावे.

येथून सुरू झालेला त्यांचा लेखनप्रवास बारा वर्षे अगदी मंतरल्यासारखा झाला. या काळात बाबुरात अर्नाळकरांनी लेखन पूर्णपणे थांबविले होते. नाईक यांच्या कादंबर्‍यांना बाजारात चांगली मागणी होती. महिन्याकाठी ते ७-८ कादंबर्‍या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रती सहज खपत असत. ही कादंबरी सरासरी शंभर पानांची असायची. अर्नाळकरांच्या कादंबर्‍याही १०० पानांच्या असत. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबर्‍या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणार्‍या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.

रहस्यकथांचा ताण असह्य झाल्याने १९८४ साली त्यांनी रहस्यकथांचे लिखाण थांबविले. प्रसिद्दीच्या शिखरावर असतांना अचानक लिखाण थांबविल्याने अनेकांना मोठा धक्का बसला. मात्र, त्यांचा हा निर्णय योग्यच ठरला. शिखरावर असतांना लिखाण बंद केल्याने त्यांची येथील जागा तशीच राहिली. याबाबत नाईक म्हणतात, रहस्यकथांचे लिखाण वेगळ्या पद्धतीचे असते. कायम विचार करावा लागतो. दिवसाचा आराम, रात्रीची झोप एका कथेसाठी ओवाळून टाकावी लागते. दैनंदिन आयुष्यावर याचा मोठा परिणाम घडतो.

रहस्यकथा लिहिण्यापूर्वी १९५७ ते १९६३ या काळात त्यांचे विविध विषयांवर लिखाण सुरु होते. ते आजही सुरु आहे. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावानी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगितिका तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मुळचे गोव्याचे. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव.

प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक किर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर हे नाईक यांच्या वडिलांचे -विष्णू नाईक- यांचे जवळचे मित्र. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रूजले. माळगावकर व वडिल एकत्र शिकारीला जात असत. नाईक यांच्या वडिलांनी क्रांतीवीर नाना पाटील यांना दारूगोळा पुरविला होता अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्वभूमी आहे. साखळीच्या राणे घराण्याने पोर्तुगीजांविरुद्ध १७ बंडे पुकारली होती. शेवटचे बंड कॅ. दादा राणे यांनी केले. नाईक यांचे आजोबा लेफ्टनंट होते. १९०१ मध्ये त्यांनी बंड पुकारले. १९०३ मध्ये बेसावध असताना त्यांना अटक झाली. पोर्तुगीजांनी त्यांना २८ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यांची रवानगी तिमोर बेटावर केली. यावेळी गुरुनाथ नाईक यांच्या आजी गरोदर होत्या. त्याही पोर्तुगिजांविरुद्ध काम करणार्‍या संघटनेच्या प्रमुख होत्या. पोर्तुगिजांचा ससेमिरा चुकवित त्या साखळीत राहण्यास आल्या. त्यांनी नाईक हे नवीन नाव धारण केले. तेव्हापासून या घराण्याला नाईक हेच आडनाव लागले.

१९४० साली त्यांच्या वडिलांकडे शस्त्रास्त्रे सापडली. त्यामुळे नाईक कुटुंबीयांना गोवा सोडून बेळगाव जिल्हातील लोंढा येथे निर्वासित म्हणून रहावे लागले. येथेच नाईकांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते बेळगावात आले. हा टप्पा त्यांच्या पत्रकारितेतील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरला. येथे बाबूराव ठाकूर यांच्या तरुण भारत दैनिकात ते कामाला लागले. कंपोजिंग, मुद्रीत शोधनापासून बातम्या लिहिण्यापर्यंत सर्व काही शिकले.

या अनुभवाच्या शिदोरीवर पुण्यात कामाच्या शोधात आले. १९५६ साली दै. सकाळ मध्ये उपसंपादक म्हणून चार महिने रोजंदारीवर काम केले. त्या काळी सकाळमध्ये संपादकीय विभागात चं. म. साखळकर वरिष्ठ पदावर होते. ते मूळचे गोव्यातील साखळीचे. त्यांनी नाईक यांना साप्ताहिक स्वराज्याचे काम सोपविले. १९५७ मध्ये त्यांना पुणे तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर नोकरी मिळाली. यानंतर नाईक यांनी मागे वळून पाहिले नाही. येथे दोन वर्षे नोकरी केल्यानंतर मनमाड येथे दै. गावकरीत गेले. त्याकाळी नाशिकचे गावकरी मनमाडहून निघत असे. पां. वा. गाडगीळ त्याकाळी गांवकरीचे संपादक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपादकीय लिखाण सुरू केले.

१९५८ साली साम्यवादावर पहिला अग्रलेख लिहिला. त्यांचे कर्तृत्व पाहून १९६० साली त्यांना औरंगाबादेत दै. अजिंठा सुरू करण्यासाठी पाठविण्यात आले. येथे दोन वर्षे काढल्यानंतर १९६२ मध्ये बा. द. सातोसकर यांनी गोव्यात दै. गोमंतकमध्ये बोलावून घेतले. येथे तब्बल ९ वर्षे नोकरी केल्यानंतर १९७० मध्ये द्वा. भ. कर्णिक संपादक असलेल्या नवप्रभा दैनिकात काम सुरू केले. या काळात स्वतंत्रपणे लिखाणही सुरूच होते.

चार वर्षात ही नोकरी सोडून स्वतःच्या कादंबर्‍या प्रकाशित करण्यासाठी नाईक यांनी १९७४ साली शिलेदार प्रकाशन सुरू केले. स्वतःचे लिखाण सुरू असतानाच मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दै. एकमतमध्ये १२ वर्षे संपादकपदाची धुरा सांभाळली. सध्या बीड येथील दै. लोकांशा या नवीन दैनिकात समन्वयक संपादक म्हणून ते काम पाहत आहेत.

पत्रकारिता सांभाळून त्यांची साहित्य सेवाही सुरूच आहे. नाईक यांच्या कथा आता प्रगल्भ झाल्या आहेत. आपल्या लेखनाचा बाजही त्यांनी बदलला आहे. गूढकथा, साहसकथांबरोबरच त्यांनी आता युद्धकथांकडे मोर्चा वळवला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील कथाकल्पना त्यांच्या मनात घोळत असून, अलीकडेच 'युद्धशास्त्राचे जनक छत्रपती शिवराय' ही नवी कोरी कादंबरी बाजारात आली आहे. ५०० पानांच्या या कादंबरीत शिवरायांच्या युद्धकौशल्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा विषय गेली वीस वर्षे त्यांच्या डोक्यात होता. नाईक सांगतात, युद्धशास्त्राचा अभ्यास करताना हा विषय सुचला.

महाराजांच्या पूर्वी युद्धाचे शास्त्र असे नव्हतेच. साधने मात्र काळानुरुप बदलत गेली. शिवरायांच्या युद्धाचा अभ्यास केला तर त्यातील वेगळेपणा दिसून येतो. त्यांच्या काळात बुद्धीचा वापर करून लढाया लढल्या गेल्या. हा प्रकार पूर्वी नव्हता. गनिमी कावा ही लढाईची पद्धत आहे ते शास्त्र नव्हे. सिकंदरशी अफगाणिस्तानात ज्या लढाया झाल्या त्या गनिमी काव्याच्याच. पण महाराजांनी या गनिमीकाव्याला बुद्धीची जोड दिली.

छत्रपतींनी बुद्धीच्या जोरावर कशाप्रकारे लढाया जिंकल्या हेच या कादंबरीत दाखविण्यात आले आहे. या पाठोपाठ संभाजी महाराजांच्या धगधगत्या जीवनाचे दर्शन घडविणारी नरकेसरी ही कादंबरी हातात घेतल्याचे नाईक यांनी सांगितले. नाईक यांची साहित्यसंपदा १०७० कादंबर्‍यांची झाली आहे. अर्नाळकरांच्या १०९२ कादंबर्‍यांचा विक्रम मोडण्यासाठी नाईक तयार आहेत. कदाचित दोन ते अडीच वर्षांत ते विश्वविक्रमी ठरतील यासाठी गोवा मराठी अकादमी प्रयत्न करीत आहे. त्याकरीता आतापर्यंतच्या कादंबर्‍यांची जुळवाजुळव त्यांनी सुरू केली आहे. एवढे लिहिले आहे की आता नेमके प्रकाशन, वर्षे, कादंबरीचे नावही नीटसे आठवत नाही. विक्रम करण्याच्या हेतून लिहिले असते तर आधीपासूनच रेकॉर्ड ठेवले असते असे नाईक मिश्किलपणे सांगतात.

साहित्यात एवढे मोठे योगदान दिल्यानंतरही नाईक यांच्या कार्याची दखल मराठीतील समीक्षकांनी घेतलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या वृत्तपत्रात एक तप घालविल्यानंतरही शासनाचे लक्ष त्यांच्याकडे गेले नाही हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. गोमंतकच्या या सुपुत्राने उभ्या महाराष्ट्रात केलेली साहित्यसेवा गोवा सरकारकडूनही दुर्लक्षितच राहिली. मात्र नाईक यांना त्याची अजिबात खंत नाही. कोणी दखल घेवो वा न घेवो वाचक आपल्या प्रत्येक कादंबरीची दखल घेतात. त्यांचे प्रेम पुढेही मिळत राहो अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

मैं तो अकेलाही चला था ।
जानीबे मंजिल मगर ॥
लोग जुडते गया ।
कारवाँ बनता गया ॥

अशीच काही गत झाल्याचे नाईक शेवटी म्हणाले.