शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (17:29 IST)

दुर्गाबाई भागवत: जिज्ञासेपोटी प्राणाचंही मोल द्यायला तयार असलेली लेखिका

durga bhagwat
तुषार कुलकर्णी
 
social media
दुर्गाबाई भागवत म्हटलं की सर्वांत पहिले आठवतं ते त्यांनी आणीबाणीला केलेला प्रखर विरोध. त्या विरोधामुळे त्यांना तुरुंगवास देखील सोसावा लागला.
 
एका बाजूला त्यांची लेखणी व्यवस्थेला हलवू शकण्याची ताकद असलेली होती त्याच वेळी सामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेणारं देखील त्यांचं लिखाण होतं. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या लेखन प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
 
दुर्गाबाई यांनीच त्यांच्या लिखाणाचे दोन भाग केले आहेत. त्या म्हणतात एक अभ्यासू लिखाण आणि दुसरं ललित लिखाण. त्या असं म्हणतात म्हणून आपण हे मान्य करू. पण त्यांचे ललित लेखही अभ्यासपूर्ण असतात यात काही संशय नाही. आपलं ललित लिखाण काय असतं? 'मी गावाबाहेरच्या मंदिराला भेट दिली आणि सूर्य मावळत होता…' वगैरे..वगैरे..
 
पण दुर्गाबाई हेच कसं लिहितील?
 
आधी त्या मंदिराचा इतिहास सांगतील. तशा प्रकारची मंदिरं देशात कुठेकुठे आढळली हे सांगतील. मंदिराच्या कथाही सांगतील. त्या जेव्हा हे सांगत असतात तेव्हा असं वाटतं की पूर्ण संस्कृतीचा पट त्यांच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्या त्याचं धावतं समालोचन करत आहेत. त्यांच्या मनात हे विचार सुरू आहेत असं वाटत नाही तर साक्षात ते मंदिर, ते गाव, ती नदी सगळे एकत्र येऊन आपल्याशी बोलत आहेत असा भास होतो.
 
राजारामशास्त्री हे थोर समाजसेवक त्यांच्या आजीचे बंधू. राजारामशास्त्री हे टिळक आणि आगरकर यांचे समकालीन होते.
 
मुळातच त्या संवदेनशील असल्यामुळे सर्वांबद्दल त्यांच्या मनात करूणा होती. त्या लहान असताना त्यांच्या सरांनी त्यांना खोचकपणे विचारलं होतं की 'तुम्ही अस्पृश्यांच्याही घरचं खाल का?' त्यावर त्या म्हणाल्या होत्या, 'का नाही खाणार? ती काही माणसं नसतात का?'
 
लहानपणापासूनच त्यांना लिहिण्या-वाचण्याची गोडी होती. जे काही करायचं ते मनापासूनच करायचं असा त्यांचा नियम होता. कॉलेजमध्ये असताना त्या स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाल्या होत्या. ते युग गांधीवादानं भारलेलं होतं. त्या प्रवाहात त्याही सामील झाल्या.
 
आजारपण, सात वर्षांचा कठीण काळ आणि साहित्य प्रवास...
एमए झाल्यानंतर त्या आदिवासी संस्कृतीवर पीएचडी करण्यासाठी मध्यप्रदेशातल्या एका दुर्गम भागात गेल्या. तिथं त्यांच्या खाण्यात विषारी सुरण आलं आणि त्या सलग सात वर्षं अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या 'आठवले तसे' या पुस्तकात त्यांनी याबाबत सांगितलं आहे.
 
खरं तर सात वर्षं हा आयुष्यातला खूप मोठा काळ असतो. त्यातही ऐन उमेदीच्या वर्षांत असाध्य रोगानं पछाडलं जाणं आणि अंथरुणाला खिळून राहणं यामुळे कुणाच्याही मनावर आघात होऊ शकतो. या काळात त्यांनी काय सहन केलं असेल याची मला कल्पना करणं पण शक्य नाही.
 
एक दोन दिवस जर आजारी पडलं तर एकटेपणा, असहायपणामुळे मन उबगतं, बिथरून जातं पण तब्बल सात वर्षं एकाच जागी राहणं आणि नंतर नव्या उमेदीने आयुष्याची सुरुवात करणं हे फक्त त्याच करू जाणे.
 
त्या काळात त्यांना कसं वाटत होतं याविषयी त्या सांगतात, "सारे विश्व ज्ञानाने लखलखते आहे. विद्या मातीत, आकाशात, झाडापानांत भरली होती. पक्षी विद्येचे गाणे गात होते. समुद्र वेद म्हणत होता. विश्वज्ञानाची कुंडली म्हणजेच सृष्टी - ती सृष्टी माझ्याभोवती सजीव होऊन उठली."
 
या आजारातून उठल्यावर त्यांना दीर्घ आयुष्य मिळालं आणि ते त्यांनी साहित्याच्याच सेवेत घालवलं. पुढील आयुष्यातही त्यांच्यासमोर अनेक कठीण प्रसंग आले पण त्या कधी बिथरल्या नाहीत. तेव्हा वाटतं पुढचं आयुष्य आपल्या टर्म्सवर कसं जगायचं याचाच तर त्यांनी त्या काळात विचार नसेल ना केला?
 
त्यांचं ललित लेखन म्हणजे वाहती गंगा आहे असं वाटतं. निर्मळ, आल्हाददायक आणि तितकीच धीरगंभीर. तत्त्वज्ञान, इतिहास, मानववंशशास्त्र, लोककला, धर्म, इत्यादी विषयांच्या अभ्यासाच्या बैठकीवर त्यांचं ललित लिखाण आहे. पण हे वाचताना आपण एखादा विषय वाचत आहोत असं वाटतच नाही. एखाद्या शांत ठिकाणी बसल्यावर दुरून जर एखादा मंजुळ स्वर कानावर पडल्यावर जसं वाटतं अगदी तीच अनुभूती यावेळी येते.
 
पैस, व्यासपर्व, भावमुद्रा, ऋतूचक्र त्यांची ही पुस्तकं याच गोष्टीची साक्ष देतात. पैसमध्ये 'पैसाचा खांब' हा लेख आहे. ज्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याला 'पैसाचा खांब' म्हणतात. वारकरी संप्रदाय आणि बौद्धधर्माचा कसा संगम होतो हे त्यांनी या लेखात सांगितलं आहे.
 
आपण ऐकत असतो की, सर्व थोर लोकांची शिकवण एकच आहे, धर्माचं सार एकच आहे पण म्हणजे नेमकं काय हे कुणीच सांगू शकत नाही. हा लेख वाचल्यावर आपल्याला जाणीव होते की सर्व ज्ञानाचं मूळ तत्त्व एकच आहे आणि तिथपर्यंत पोहचायचे मार्ग वेगळे आहेत.
 
निसर्गाची किती रूपं असतात आणि तो किती सुंदर असतो हे त्यांचं 'ऋतूचक्र' वाचल्यावर वाटलं. यातले सुरुवातीच्या लेख वाचल्यावर वाटलं थोडं रूमच्या बाहेरही फिरून यावं आणि झाडावर एखादा पक्षी दिसत असेल तर त्याचं निरीक्षण करावं. पण पुढचे लेख वाचायचे होते म्हणून प्लॅन रद्द केला.
 
लोककला, लोकसाहित्याचा अभ्यास
दुर्गाबाई या संशोधनातच रमल्या होत्या पण त्यांना साने गुरूजींनी सांगितलं की 'साधना'साठी काहीतरी लिही. याआधी आपण असं काही लिहिलेलं नाही असं त्या म्हणाल्या पण हा लेख लिहिण्याची त्यांनी तयारी दर्शवली. त्यासाठी त्यांनी व्याकरण, लेखनशैली, कथाकथन इत्यादी तंत्रांचा अभ्यास मुळापासून केला.
 
हा अभ्यास करून एका छोट्या मुलीच्या आयुष्याची कथा त्यांनी लिहिली. त्यांचा हा लेख साने गुरुजींना वाचता आला नाही. हा लेख वाचण्यापूर्वीच साने गुरूजींना जगाचा निरोप घेतला होता.
 
लोककला आणि लोकसाहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता असं म्हणणं पतंजलीचा योगाचा खूप अभ्यास होता असं म्हणण्यासारखं होऊ शकतं. दुर्गाबाई या तर 'लोककला आणि लोकसाहित्य' या विद्याशाखेचं मूर्त रूप होत्या. त्यांचं 'लोकसाहित्याची रूपरेखा' हे पुस्तक या विद्याशाखेचं टेक्स्टबुक आहे असंच म्हणावं लागेल.
 
देशभरात हिंडून, लोकांमध्ये मिसळून त्यांच्याकडून त्यांनी लोककला आणि साहित्य समजून घेतलं. हजारो गाणी, ओव्या, त्यांनी वेचून आणल्या. त्याच म्हणत लोकसाहित्यातलं सर्वच काही बावणकशी सोनं नसतं, त्यात काही दगडही असतात. ते आपल्याला बाजूला करावे लागतात.
 
त्यांनी संग्रहित आणि अनुवादित केलेला लोककथांचा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक राज्याचा एक लोककथा संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला आहे.
 
मी उत्तर प्रदेशचा लोककथा संग्रह वाचत होतो. तेव्हा समशेर जंगची कथा वाचली. कुणी गोष्ट सांग म्हटलं लहानपणी ही गोष्ट मी सगळ्यांना सांगत असे. जसं जसं वय वाढलं तसं तसं या गोष्टीच्या डिटेल्स मी विसरलो होतो. पण या पुस्तकाच्या निमित्ताने ती गोष्ट मला पुन्हा भेटली. हो 'भेटली'च मिळाली नाही. अगदी जुना मित्र भेटावा तसंच वाटलं.
 
याच कथा संग्रहासारखा एक त्यांचा एक कथा संग्रह प्रसिद्ध आहे. जातक कथांचा संग्रह. याचं लेखन, अनुवाद त्यांनी तुरुंगात केला आहे. दुर्गाबाई म्हटलं की आणीबाणी आणि त्यावेळी त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांनाच आठवते. आणीबाणी वेळी झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. यशवंतराव चव्हाण समोर असतानाच जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीला आराम वाटावा म्हणून प्रार्थना करण्याची त्यांना सर्वांना विनंती केली होती.
 
जिज्ञासेपोटी प्राणांचं मोल देण्याचाही तयारी
आणीबाणीविरोधी आंदोलनाचं नेतृत्व जयप्रकाश हेच करत होते. स्टेजवरून त्यांचं नाव घेणं हाच मोठा अपराध होता. आपल्याला याची किंमत मोजावी लागणार हे त्यांना माहित होतं. असं असूनही त्यांनी जयप्रकाश यांचा स्टेजवरून उल्लेख केला. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात केली. तुरुंगात गेल्यावरही तिथल्या शांत बसल्या नाही. तिथल्या महिलांचं सुखदुःख जाणून घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्याकडून काही शिकता येतं का हे पाहिलं.
 
त्यांची शिकण्याची आवड इतकी जबरदस्त होती की कुणाला काही चांगलं येत असेल तर त्या लगेच त्या व्यक्तीचं शिष्यत्व पत्करायला मागेपुढे पाहत नसत. चुलीवरची भाकरी, काशिदा अशा कितीतरी गोष्टी त्यांनी पाड्यावरच्या महिलांकडून शिकून घेतल्या होत्या. त्यांच्या काही निवडक रेसिपीज 'खमंग' या पुस्तकाच्या रूपाने आपल्याजवळ आहेत.
 
त्यांची जिज्ञासा इतकी उच्च कोटीची होती की, आपल्या प्राणांचंही मोल द्यायची वेळ आली तरी आपण एखादी गोष्ट जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही असा त्यांचा दंडक होता. याबाबतची गोष्ट अशी की 'निळावंती' या पोथीमध्ये काय आहे हे वाचण्याची त्यांची इच्छा होती. ही पोथी एका मांत्रिकाकडे आहे असं त्यांना एका व्यक्तीने सांगितलं.
 
त्या मांत्रिकाकडे गेल्या आपली निळावंती वाचण्याची इच्छा त्यांनी जाहीर केली. ही पोथी महिलांसाठी नाही असं त्याने तोंडावरच सांगितलं. पण त्या बधल्या नाहीत. पुढे तो मांत्रिक म्हणाला की जर तुम्ही ही पोथी वाचली तर तुमचे प्राण जाऊ शकतात, तुम्ही निर्वंश व्हाल असं म्हटल्यावरही त्या मागे हटल्या नाही. नंतर तो म्हणाला 'यामुळे तुमच्या भावांचाही निर्वंश होऊ शकतो पोथी वाचायची की नाही तुम्ही ठरवा.' तेव्हा मात्र आपल्या भावांवरील प्रेमाखातर त्यांनी माघार घेतली.
 
सडेतोड भूमिका
आणीबाणीनंतरही त्यांनी ठाम भूमिका घेणं सोडलं नाही. सरकारच्या भाषा, शिक्षण, सामाजिक आणि संस्कृतीविषयक धोरणांवर सडेतोड भूमिका त्या घेत राहिल्या. यातले काही लेख मीना वैशंपायन यांनी संपादित केलेल्या विचारसंचित या पुस्तकात आहेत.
 
दुर्गाबाईंना काही लोक 'खाष्ट विदुषी' म्हणत. आपल्याला जे वाटतं ती गोष्ट बिनदिक्कतपणे त्या मांडत. त्यामुळे त्यावेळच्या काही साहित्यिकांचा त्यांच्यावर रोष असावा. त्याचं एक उदाहरण म्हणजे त्यावेळी चापेकर बंधूंवर '22 जून 1897' हा चित्रपट आला होता. त्यावर त्यांनी परीक्षण लिहिलं होतं. हा चित्रपट 1980 मध्ये आला होता.
 
या चित्रपटात कलाकारांचे पोशाख, केशरचना, घर, ओटा, ओसरी इत्यादी गोष्टी या ऐतिहासिकदृष्ट्या कशा चुकीच्या आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. शंभर वर्षांपूर्वीचा काळ उभा करण्यात दिग्दर्शक कसे चूक आहे हे त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे सांगितलं आहे. दिग्दर्शकाच्या प्रयत्नाचं त्यांनी कौतुक केलं आहे पण फक्त चांगला प्रयत्न म्हणून त्यावर टीका करायची नाही असंही नाही हे ही त्यांनी दाखवून दिलं.
 
त्यांनी आताचे ऐतिहासिक चित्रपट पाहिले असते तर त्या काय म्हणाल्या असत्या याचा विचारच न केलेला बरा.
 
प्रोफाइल लिहिताना सगळंच चांगलं लिहू नये असं म्हणतात. पण मी त्यांना काय नाव ठेवणार? पण एक तरी गोष्ट अशी असावी की जी आपल्याला आवडली नाही असं म्हणावं. म्हणून हे उदाहरण.
 
त्यांनी लिहिलेलं प्रत्येक पुस्तक माझ्याजवळ असावं म्हणून मी बुकगंगा, ग्रंथनामा या सगळ्या साइट्स धुंडाळून काढल्या. त्यात एक 'अस्वल' नावाचं पुस्तक होतं. भली जुनी प्रत मिळाली मला. पण तक्रार त्याची नाही. या पुस्तकात होतं काय हे थोडक्यात सांगतो. यात अस्वलाची कुळकथा होती. साहित्यात अस्वल कुठे आलं, कसं आलं कोणत्या ठिकाणी आलं याच्या बारीक सारिक डिटेल्स या पुस्तकात होत्या. हो, मला दुर्गाबाई आवडतात. पण अस्वलावर पुस्तक वाचण्याची शिक्षा कशासाठी? तेव्हापासून मी ठरवलं कुणी लेखक किंवा लेखिका किती आवडली तरी त्यांची सरसकट सगळी पुस्तकं घ्यायची नाही.
 
असा प्रश्न मला बऱ्याचदा पडायचा की त्यांना ज्ञानपीठ किंवा सरस्वती सन्मान का मिळाला नाही आतापर्यंत. अर्थात, हा पुरस्कार मिळाला असता तर त्यांच्या ऐवजी त्या पुरस्काराचाच सन्मान झाला असता. पण त्यांनी तो का स्वीकारला नाही याचं उत्तर मला एके दिवशी त्यांनी लिहिलेल्या एका पत्रात सापडलं.
 
आणीबाणीनंतर त्यांनी कुठलाही पुरस्कार घेणार नाही असं ठरवलं होतं. त्यांना सरस्वती सन्मान देऊ केला होता पण त्यांनी तो घेतला नाही. त्याऐवजी पुरस्काराची रक्कम संशोधन करणाऱ्या संस्थाना देण्यात यावी असं त्यांना वाटत होतं.
 
आपलं जसं वय वाढत जातं तशा आपल्या 'इनसिक्युरिटीज' वाढत जातात पण दुर्गाबाई दिवसेंदिवस तरुणच होत गेल्या. माझं आयुष्यावर प्रेम आहे आणि म्हातारपण हेही त्याचं रूप आहे असं त्या यामुळेच म्हणू शकत असत.
 
ललित लेखन, संशोधन, लोकसाहित्य, समीक्षा, अनुवाद, संपादन असे अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. गीताईमध्ये दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, 'एकांशे विश्व हें सारें व्यापूनि उरलों चि मी.'
 
दुर्गाबाईंचं साहित्य तसंच आहे. मराठी साहित्य विश्वाचं अवकाश व्यापूनही त्यांचं साहित्य पुरून उरलं आहे.
Published By -Smita Joshi