शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

दामोदर पंडित

डॉ.यू.म.पठाण

महानुभाव सम्प्रदायाचं महाभारत पारंपारिक महाभारतापेक्षा वेगळं आहे, हे मी संपादिलेल्या नवरसनारायणाविरचित शल्यपर्वाच्या प्रस्तावनेत स्पष्ट केलंच आहे. त्याचप्रमाणं महानुभावांचं पद्मपुराणा प्रक्षाणं वेगळं म्हणजे पारंपारिक रामायणापेक्षा वेगळं आहे. खरं तर हा मध्ययुगीन मराठी संतसाहित्य-बृहद् संशोधनाचा विषय व्हायला हवा होता. जैन मराठी पद्मपुराणाविषयी थोडं फार संशोधन झालं असलं तरी व्यापक व मूलभूत स्वरुपाची तुलनात्मक चिकित्सा अद्यापि झाली नाही. महानुभावीय महाभारताच्या बाबतीतही हेच घडलं आहे.

महानुभावीय पद्मपुराणाचा कर्ता संतकवी दामोदरपंडित होऊन गेला असावा व तो महानुभाव साम्प्रदायिकांच्या उपाध्ये आध्यायातील असावा, असं मत महानुभाव साहित्याचे थोर अभ्यासक डॉ.वि.भि.कोलते यांनी मांडलं आहे. ही उपाध्ये आम्नायाची नववी पिढी.

अनेक संस्कृत पंडित श्री चक्रधरस्वामींच्या भूमिके नुसार संस्कृत या देववाणीऐवजी मराठी या लोकभाषेत लेखन करण्यास प्रवृत्त झाले. व तसा उल्लेख त्यांनी आपल्या साहित्यक्रुतीत प्रारंभीच केल्याचं आढळतं.

तरि संस्कृत पद्मपुराण ।
मागा दत्तायदेवी सांगितले जाण ।
ते पद्मऋषी सांगे आपण ।

पद्मपुराणींचा इतिहास ।
परि मर्‍हाटिया सांगन सौरसु ।
म्हणे पंडित दामोदरु ।
श्रोंतयातें ।।

याबाबतीत पंडित दामोदर यांचा गुरु कोण असावा ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न हा ग्रंथ संपादित करुन प्रसिद्ध करणा४या संपादकांचा थोडा वैचारिक गोंधळ झाला असावा, असं वाटतं. महानुभाव संप्रदाय श्रीकृष्ण हा पूर्णावतार मानतो व त्यांच्या पंचकृष्णा च्या संकल्पनेत (एकमुखी, त्रिमुखी नव्हे) ही संकल्पनाही रुढ आहे, या पंचकृष्णात तर श्रीदत्त अवताराचा, समावेश आहे. त्याविषयीचा रवळो व्यास यांचा सैह्याद्रवर्णन हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. स्वत: कवीनंच म्हटलं आहे.

वरि माझा सैह्याद्रीचा रावो ।
तो मज प्रसन्न दत्तात्र्यदेवो ।
जेणे पाविजे ठावो ।
सर्व सीधींचा ।।

कवीनं दत्तराज उदारुला नमन केलं असल्यानं दत्तराज मराठे (महानुभाव) हे दामोदर पंडित यांचे गुरु असावेत, असा तर्क प्रकाशित प्रतीचे संपादक यांनी केलं असलं तरी ते दूरान्वयाचं व चुकीचं वाटतं तथापि याच ग्रंथात

मजउपकारु । जेवी ठेविला मस्तकी करुं ।
तो गोविंद उदारु । आपण मज ।।
आता तमाचेनि पदें प्रसादे । आक्षरें, पदें-पदें ।
जे मज सांघीतली गोवींदें । बरवयापरी ।।

असं म्हटलं असल्यानं गोविंद हेच त्यांचे गुरु आहेत, असं सप्रामाण म्हणता येतं. डॉ.अ.ना. देशपांडे यांनीही अशाच प्रकारचं मत मांडलं आहे.

दामोदर पंडितांच्या पद्मपुराणात मुख्यत्वेकरुन भुवनकोश, अवतार व ब्रम्हविद्या यांचं विवरण केलं आहे. त्यात महानुभाव संम्प्रदायास अभिप्रेत असलेल्या अध्यात्म विचाराचं तपशीलानं विवेचन केलं आहे.

खरं तर हे महानुभावीय पद्मपुराण अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करतं. त्यातून संशोधाच्या अनेक आयाम व दिशा जाणकारांना व जिज्ञासूंना जाणवायला हव्या आहेत व त्यासाठी अनेक संशोधकांनी आपापल्या दृष्टिकोणातून विचार करायला हवा. एक-दोन संशोधकांचं हे काम नव्हे, असं मला इतक्या वर्षाच्या/ दशकांच्या महानुभावीय संशोधनानंतर जाणवू लागलं आहे. हे आयाम व या समस्या अशा:
१) जैनधर्मियांप्रमाणं पद्मपुराण ही महानुभावीय रामकथा वा रामायण आहे का ? असं असेल तर ती पंथीय तत्त्वज्ञानास कितपत परिपोषक आहे ? महानुभावीय पंचकृष्णच मानतात. त्यात रामावतारांचा विचार कसा ? नि रामावताराविषयी तर दामोदर पंडित सम:अवतारी मोक्ष नसे किंवा रामअवतारी उधरण (जीवोद्धार) नसे असं का म्हणतात ?
२) महानुभाव पंथाला पंचावतार (पंचकृष्ण) मान्य असतानाही दामोदर पंडितांच्या पद्मपुराणात दशावतारांचा उल्लेख का यावा ?
३) त्याच प्रमाणं नव्याण्णव विष्णू आणि नव्याण्णव शंकर या उल्लेखांमागील हेतू कोणता ?
४) जैन व महानुभावीय पद्मपुराणात रामकथाच असल्यास तिच्यातील साम्यस्थळं वा भेद -स्थळ कोणती ?
५) बौद्ध अवताराविषयी मुरारीमल्ल बासाच्या दर्शन प्रकाश यासारख्या वा अन्य महानुभावीय ग्रंथात चांगला उल्लेख असताना व महानुभावांच्या ब्रम्हविद्येत स्त्री-पुरुष समावतो, अहिंसा, करुणा व शील यासारखीसमान तत्त्वं असताना बौद्ध नावेअसूर कपट देखा । असा उल्लेख दामोदरपंडित पद्मपुराणात का करतात.
६) संशोधन दृष्टय़ाही पद्मपुराण लोकवक्तवीय अध्ययनात महत्त्वाची भर टाकील, असं वाटंत त्या दृष्टीनं त्याचा विचार होणं महत्त्वाचं आहे.