सांगलीचे प्रसिद्ध गणपती पंचायतन मंदिर
- किरण दिनकर जोशी
|
सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असणा-या या मंदिराची श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अलीकडच्या काळात शोभा वाढविली आहे. पंचायतन, अर्थात पाच मंदिरांनी बनलेले. गणपतीबरोबरच शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण देवतांची मंदिरे याठिकाणी आहेत. मंदिराचा परिसर विलोभनीय आहेच शिवाय मंदिरातील प्रसन्न वातावरण भाविकांना मंत्रमुग्ध करते. थुई थुई उडणारे कारंजे, उंच शिखरे, त्यावरील नक्षीकाम, बागबगिचे आणि मुख्य म्हणजे गणरायाची देखणी मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे.
|
त्यामार्फत दररोज पूजाअर्चा सुरू करण्यात आली.
दीडशे वर्षाचा काळ लोटला तरी आजही हे मंदिर नवीन वाटते. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सांगलीत आल्यानंतर त्यांनी मंदिरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. अन्नछत्र सुरू केले, उर्दू, जर्मन भाषेचे वर्ग सुरू केले. सुनीतीराजे पटवर्धन सभागृह बांधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना दिली. मंगल कार्यालयाची उभारणी करून अनाथ, अपंग जोडप्यांसाठी हे कार्यालय मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
|
गणपती मंदिराप्रमाणेच संस्थान ट्रस्टचा गणेशोत्सव खास आकर्षण असते. गणपती मंदिरची आकर्षक सजावट करण्यात येते. या गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच 'चोर' गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमानंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. हत्ती, उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, पेढ्यांचा वर्षाव होतो. 'पुढल्या वर्षी लवकर या... ' च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो.
|
गणपती पंचायतन संस्थानाची हत्तींचीही परंपरा आहे. पूर्वी मंदिरात पंचवीस हत्ती होते. संस्थान खालसा झाल्यानंतर संख्या कमी झाली. सुंदर गजराज उंचापुरा व देखणा हत्ती सांगलीची शान होता. त्याच्या निधनानंतर बबलू हत्तीचे आगमन झाले. गेली 20 ते 25 वर्षे बबलूने सांगलीकरांना लळा लावला होता. त्याला 'लाडका बबलू' असे म्हटले जात. संस्थानाचा हत्ती असल्याने त्याचा वेगळाच डामडौल होता. श्रीमंत विजयसिंहराजे यांनी त्याच्यासाठी पंखे, शॉवर आणि टीव्हीची सोय केली होती. खाण्यापिण्याचेही लाड होत असत. याचवर्षी त्याचे अचानक निधन झाले. त्याच्या अंतयात्रेवेळी जनसागर लोटला होता.
कसे जाल :
पुण्याहून सुमारे 235 कि.मी तर कोल्हापूरातून 45 कि.मी अंतर आहे.
रेल्वे - सांगली दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर असल्याने पुणे-मुंबईवरून याठिकाणी येण्यास थेट रेल्वे गाड्या आहेत.
रस्ता मार्ग - पुणे, कोल्हापूरातून प्रत्येक अर्धा तासाला एस.टी ची सोय.
हवाई मार्ग - कोल्हापूर येथे विमानतळ असून येथून पुणे, मुंबई विमानसेवा सुरू आहे.
