Dharma Sangrah
✕

श्यामची आई - रात्र एकोणचाळिसावी

Updated: मंगळवार, 13 जून 2023 (16:35 IST)
 
"अक्का, तिला भात घातला; परंतु ती नुसते तोंड लावी. दुधा-तुपाचा भात; परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीरबिंदीर." मावशी म्हणाली. "नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे. मुकी बिचारी! बोलता येत नाही; सांगता येत नाही." आई म्हणाली. आईचे दुखणे वाढतच होते. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून माझा मोठा भाऊ चार दिवसांची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीने चार दिवसांची रजा मिळाली. आईला पाहून त्याला भडभडून आले. "आई! काय, ग, ही तुझी दशा! तू इकडे होतीस, काम करीत होतीस. आई! आम्ही तिकडे खुशाल खात होतो; परंतु तुला घास मिळत नव्हता!" असे म्हणून तो रडू लागला. धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती. आईने कसे हाल काढले, दवंडी कशी पिटली, ते सारे त्याने सांगितले. दादाचे हृदय दुभंग झाले. आई म्हणाली, "चाललेच आहे. बाळांनो, या देहाला चांगले दिले काय, वाईट दिले काय, जोपर्यंत देवाला यंत्र चालवावयाचे आहे, तोपर्यंत ते चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तूही दिवसभर काम करतो. तू पाच रुपये पाठविलेस, मला धन्य वाटले. तू एकोणीस रुपयांतून त्यांना पाच रुपये पाठविलेस-खरेच मूठभर मांस मला चढले. मुलाकडून आलेली पहिली मनीऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हांला तयार करणे एवढेच माझे काम! तुम्ही गुणी निघालात-चांगले झाले. तुम्हांला पैसे मिळोत वा न मिळोत; तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे-आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे; ह्या पुरुषोत्तमाला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या. परस्परांस विसरू नका." आई जणू निरवानिरव करीत होती. "आई! मी येथेच राहू तुझ्याजवळ? राहू का? काय करायची ती नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल, तर नोकरी कशाला? आई! मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई! तुझे पाय, तुझी सेवा यांतच माझे कल्याण, माझे भाग्य, माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई! तू सांगशील, तसे मी करीन. राजीनामा मी लिहून आणला आहे. देऊ का पाठवून?" दादा गहिवरून बोलत होता.
 
आई विचार करून हळूच म्हणाली, "गजू! सध्या सखूमावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव. त्यांना पाच रुपये पाठवीत जा. दोन पाठविलेस, तरी चालतील. परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही. तितके माझे भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. फारच अधिक वाटले, तर पुन्हा तुला बोलावून घेईन हो बाळ." दादा परत मुंबईस जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन, अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले. आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्याच्या तोंडावरून, डोक्यावरून आपला कृश हात, प्रेमाने थबथबलेला हात फिरविला, तो मंगल हात फिरवला. "जा, बाळ; काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे, असेच पत्र लिहा. उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमाने नांदा. एकमेकांस कधी अंतर देऊ नका!" आईने संदेश दिला. जड अंतःकरणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला, संसार मोठा कठीण, हेच खरे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दररोज बाटलीबंद पाणी पिता? शरीरात जात आहेत हजारो प्लास्टिकचे कण; कर्करोगाचा धोका किती?

DRDO Paid Internship डीआरडीओमध्ये सशुल्क इंटर्नशिपची संधी; दरमहा ५,००० रुपये मिळवा

Shubh Margashirsha Guruvar Images शुभ मार्गशीर्ष गुरुवार शुभेच्छा इमेज

लोकरीच्या स्वेटरमुळे खाज आणि पुरळ येतात का? जाणून घ्या हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे

पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपी; केळी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर

पुढील लेख
Show comments