मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (10:41 IST)

स्थापत्यवेदाचे प्रमुख भाग

वास्तुशास्त्राचा आधारभूत ग्रंथ 'समरांगण सूत्रधार' यामध्ये स्थापत्याविषयी सांगितले असून त्यानुसार वास्तुशास्त्राचे आठ प्रमुख भाग आहेत.
 
दिग्विन्यास व वास्तुपदविन्यास
कोणतेही घर, प्रासाद, महाल, गाव किंवा शहर विकसित करताना दिशा निश्चित केल्या जातात त्यालाच दिग्विन्यास म्हणतात. त्यानंतर वास्तुपदविन्यास केला जातो. आपण प्रथम दिग्विन्यास म्हणजे काय त्यावर विस्तृत चर्चा करू.
 
दिग्विन्यास - प्राची साधन
दिग्विन्यासाच्या वर दिलेल्या व्याख्येला प्राचीसाधनही म्हणतात. प्राची म्हणजे दिशा. यात प्रथम पूर्व दिशा निश्चित करून नंतर इतर दिशा निश्चित करतात. त्याआधारे वास्तुपदविन्यास केला जातो.
 
शास्त्रात सूर्य शंकू तसेच दोरीच्या सहाय्याने त्याच्या सावलीच्या प्रतिबिंबावरून पूर्व दिशा ठरवण्याचे व ध्रुव तारा, नक्षत्र यांच्या सहाय्याने ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या ग्रंथात सुचवल्या आहेत. 'शिल्परत्न' ग्रंथात चुंबक सुईचे वर्णन आहे.
 
शुल्बसुत्राने दिशा ठरवणे :-
पूर्व दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करतात. ही दिशा ठरवताना शंकू, दोरी व खुंटी लागते. पहिल्यांदा या उपकरणांना विशिष्ट कात्यायन शूल्बसुत्राने पाहून सूर्याच्या पूर्व व उत्तर दिशांना ठरवण्याची ही पद्धत आहे. मुख्यत: शंकु ठेवूनच मग पूर्वेचे निश्चितीकरण केल्याचा उल्लेख आहे. हा शंकू एका विशिष्ट प्रकारच्या लाकडाचा बनवलेला असतो त्याचा आकार 22 सेंटीमीटर लांब आणि परीघ 11.4 सेंटीमीटर असतो. जमिनीच्या मध्यभागी (नभीस्थळ) शंकूचा 1/3 भाग पुरून 2/3 भाग वर ठेवतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पडणार्‍या शंकूच्या सावलीच्या आधाराने, दोरी व खुंटीच्या सहाय्याने पूर्व ठरवली जाते.
 
नक्षत्रांचे दिशा निश्चितीकरण -
ज्योतिषशास्त्राच्या 'मुहूर्तमार्तंड' ग्रंथात दिशा ठरवण्यासाठी नलिकायंत्राचे वर्णन आढळते. ग्रंथानुसार उज्जैन शहराच्या दक्षिणेला पूर्व दिशा ठरवण्याची असेल तर चित्रा आणि स्वाती नक्षत्राच्या मध्यबिंदूद्वारे ठरवावी. जर ती जागा उज्जैन शहराच्या उत्तरेला असेल तर कृतिकेच्या आधारे पूर्व दिशा ओळखावी.
 
ध्रुव तार्‍याने दिशा निश्चितीकरण-
कात्यायन शुल्बसुत्र, राजवल्लभ व शिल्पदिपक या ग्रंथात ध्रुव तार्‍याने उत्तर दिशा मिळते असे सांगितले आहे. राजवल्लभ व शिल्पदिपक यात अधिक माहिती अशी दिली आहे की ध्रुव व सप्तर्षी दोन तारे जोडून जी रेष तयार होते तिथे जमिनीवर उत्तर दिशा मिळते.
 
चुंबकसूचीने दिशा ठरवणे -
'शिल्परत्न' नावाच्या ग्रंथात याचा उल्लेख आहे मात्र विस्तृत विवेचन नाही. चुंबकसूचीचा शोध भारतीय असला तरी लोक दिशा ठरवण्यासाठी सूर्य व नक्षत्रांवरच अवलंबून होते. या गोष्टी योग्य व अचूक दिशा ठरवण्यासाठी नक्कीच चुंबकसूचीहून अचूक आहेत. आजही भारतीय शिल्प-ग्रंथाच्या पद्धतीने घर बांधणारे याच पद्धतीचा वापर करतात.
 
पूर्वेला सूर्योदयाबरोबरच पृथ्वीवर प्रकाश, किरणे व उर्जेचा संचार होतो, त्याचे महत्व सर्वश्रुत आहेत. घराची बांधणी आपण अशा रितीने करावी की, त्यात रहाणार्‍यांना सूर्यप्रकाशाचा पूर्ण फायदा मिळायला हवा. कारण हा प्रकाश आपल्या शरीराला पोषक आहे.
 
सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व, तो मावळतो त्या दिशेला पश्चिम त्याच्या डावीकडे (सूर्याकडे, पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताची उत्तर तर उजव्या हातची दक्षिण दिशा असते या दिशांना प्रमाण मानून वास्तुपदविन्यास करतात.
 
वास्तुपदविन्यास :-
हे स्थापत्यवेदातले महत्वाचे अंग आहे. कोणत्याही घराचे बांधकाम करताना त्याचा उद्देश्य व आवश्यकतेनुसार त्याचा आराखडा कागदावर बनवला जातो. मग त्यावर काम केले जाते. त्याचा हल्ली 'साईट प्लॅनिंग' म्हणतात. वेगवेगळ्या घरासाठी वेगवेगळे वास्तुपदविन्यास सांगितले आहेत. त्यात 64, 81, 100 व 1000 पद असतात. त्यावर वेगवेगळ्या देवतांना विराजमान केले जाते.
 
वास्तुपदविन्यास घर बांधताना ‍अतिशय महत्वाचा आहे. यात घरबांधणीच्या सौंदर्याची कला व बांधण्याच्या दृष्टीने विज्ञानही आहे. कालांतराने यातील विज्ञान मागे पडत चालले व फक्त सौंदर्य (कला) शिल्लक राहिले. याला धर्माशी जोडून याचा प्रचार केला गेला हेही याचे कारण असू शकेल. पूर्वीच्या काळी धर्मावरील विश्वासाने लोक ते स्वीकारत असत. ऋषिमुनींनी अध्ययन, संशोधनाच्या सहाय्याने योग्य ज्ञान मळवून ते नियमात बांधले त्यामुळेच धर्माशी निगडीत असूनही या गोष्टींना एक शास्त्रीय अंगही आहे. तेव्हा जेवढे संशोधन झाले ते सर्व आजही उपयोगी आहे.
 
नगर‍ निवेश/पूर निवेश :-
गाव, नगर किंवा शहराचे नियोजन हाही स्थापत्यवेदाचा भाग आहे. हल्ली त्याला शहर विकास आराखडा (टाऊन प्लॅनिंग) म्हणतात. प्राचीन काळी राज्याची राजधानी, बाजार, विद्यालये, सार्वजनिक इमारती, दवाखाने, मंदिर, विहीरी, घरे, खेळाची मैदाने वर्ण व्यवस्थेनुसार जागेचे वर्गीकरण यानुसार ते होत असे.
 
मंदिराची बांधणी :-
मंदिर, प्रासाद यांची निर्मिती आपल्या भारतीय संस्कृतीचे एक सुंदर गौरवशाली रूप आहे. ज्याचे सौंदर्य कला, विज्ञान, श्रद्धा, धर्म या रूपात पूर्वीपासून भारतात आहे. या सर्व गोष्टींची सांगड घालून बनवलेले नियम व सिद्धांत, वेद, शिल्पशास्त्र, पुराणे या ग्रंथात दिले आहेत. यात मंदिरासाठी जागेची निवड, वास्तुपदविन्यास, मुख्यदार, गाभारा, मंडप, कळस, घंटा, नक्षोदार भिंती याचे प्रकार, प्रमाण, शैली तसेच उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय नगरे, द्रविडी, ओडीसी या सर्वांचे विस्तृत विवेचन आणि वर्णन आहे. या शिवाय देवाच्या मूर्ती, त्यांचे भाव, शस्त्र-अस्त्र, दागिने याच्या माहितीबरोबरच प्राणप्रतिष्ठेचे नियम, मुहूर्त या सर्वाचे विस्तृत विवेचन सापडते.
 
राजप्रासादाची निर्मिती -
राजप्रासाद म्हणजे राजाचे निवासस्थान महाल, किल्ले, गड हे होते मंदिराप्रमाणेच हे ही भारतात कला, विज्ञान व उत्कृष्ट वास्तुशास्त्रीय नमुने म्हणून आजही ओळखले जातात. टाऊन प्लॉनिंगबरोबरच राजाचा महाल, सिंहासन, राजसभा, सभागृह, शयनकक्ष, मंडप, दूतावास, खेळाचे मैदान, घोड्यांचे तबेले, विशेष व सामान्य मार्ग याचेही वर्णन ग्रंथात आढळते. हल्ली याचा उपयोग मंत्री, उच्चपदस्थ व्यक्तींची घरे बांधताना करतात.
 
सार्वजनिक बांधकाम :-
बहुमजली इमारती, शाळा, धर्मशाळा, दवाखाने, इतर घरे यांची बांधणी वर्णव्यस्थेनुसार होत असे. हे पण स्थापत्यवेदाचे प्रगल्भ अंग होते. तसेच आधुनिक बहुमजली, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक जागा याची बांधणीही त्याचप्रमाणे आहेत. वास्तुशास्त्राचे नियम सर्वांसाठी लाभदायक ठरतात.
 
ध्वजोच्छिती- इंद्रध्वज :-
पूर्वीच्या काळी इंद्रोत्सवात मोठ्या विमानाच्या आकाराचा रथ तयार करून त्यात इंद्राला बसवून त्याची मिरवणूक काढली जात असे. स्थापत्यवेदात इंद्राच्या रथाचेही विस्तृत वर्णन आहे.
 
यज्ञवेदी :-
वेगवेगळ्या देवांची पूजा, अनुष्ठान करण्यासाठी यज्ञवेदी (यज्ञकुंड) बांधली जात असे. याचे वेगवेगळे आकार, प्रमाण, यात वापरलेल्या विटांची सख्या, हस्त-प्रमाण याचेही वर्णन स्थापत्यवेदात सापडते.
 
राजशिबीर :-
राज्याच्या युद्धकाळ तसेच यात्रा या दरम्यान शिबीर आयोजित केले जात असत यात राजाचे रहाण्याचे, झोपण्याचे ठिकाण, मंत्र्यांचे निवासस्थान सैनिकांसाठी बराकी, तबेले याचेही विवेचन आहे.