मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By वेबदुनिया|

महिला सशक्तीकरण

-स्वाती दांडेकर

ND
आठ मार्च. जागतिक महिला दिन. महिला सशक्तिकरण दिवस. आम्ही सशक्त तर आधीपासूनच होतो. आमची शक्ती, आमचे शौर्य, बुद्धी यांची प्रचीती देवांपासून सर्वांनाच होती. पुराणामध्येही स्त्री शक्तीला वंदन केले आहेच. स्त्री ही अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे. राक्षसांचा संहार असो वा आणखी कोणते कठीण काम स्त्री सर्वदाच अग्रणी आहे. म्हणून महिला सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे.

  आमचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगीण नाही. समाजाचा काही वर्ग खूप पुढे निघून गेला आहे. परंतु, काही वर्ग मागेच आहे. त्याचा विकास झाला नाही.      
बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. आणि त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे. ह्या सर्व गोष्टींचा वेचार केला तर असे वाटते की आम्हाला आमची जागा मिळाली आहे. पण माझ्या मते अजून आम्हाला बरेच प्रयत्न करायचे आहेत.

आमचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगीण नाही. समाजाचा काही वर्ग खूप पुढे निघून गेला आहे. परंतु, काही वर्ग मागेच आहे. त्याचा विकास झाला नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्ष‍ित, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेल्या आहे. त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाहीये. त्यांचा दिवस कोंबडं आरवण्याच्या आधी सुरू होतो आणि रात्रीच्या किरकिर होता संपतो. अजूनही त्या दोन वेळेची भूक भागवण्यासाठी 'ठेविले अनंते तैसिची राहावे' असे म्हणत नवर्‍याची मारहाण सहन करण्यात अख्खं आयुष्य घालवत असतात. पण या आरशाची एक बाजू फारच सुंदर आहे तर दुसरी तेवढीच कुरूप. ह्या दिवशी दहा मिनिटं थांबून जर विचार केला तर आपल्याला आत्मग्लानीच होईल, की आपण फक्त आपलाच विचार केला आहे. दुसर्‍याच्या नाही. आणि याची परिभाषा विकास आहे. तर तो फक्त स्व:विकासच आहे.

ND
आज आमच्यापैकी अनेक महिला डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, नेता, अभिनेत्री, मंत्री, देशाच्या सर्वोच्च पदांवरदेखील आहेत. त्याचवेळी दुसरीकडे गावात अनेक स्त्रिया मुलांना जन्म देताना मरतात, हुंड्याच्या अभावी जळतात पण त्यांना न्याय मिळत नाही. त्यांची बातमीही वर्तमानपत्रात झळकत नाही. त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन होत नाही. असे का? जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो, तर ह्या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का? आत्मविश्लेषण केल्यास ही जबाबदारी आपली आहे, याची जाणीवही आपल्याला होईल. त्यांच्या मागासण्याचं कारण
आम्ही काही अंशी आहोतच.

ह्या प्रश्नांना सोडविण्यासाठी आंदोलनाचं रूप द्यावंच लागेल. आपल्या जीवनक्रमात एक दिवस जरी समाजासाठी द्या. जर हे प्रश्न आज सोडवू शकलो नाही तर हे असेच कायम राहतील. अनेक मुले अनाथ होतील. काही तर जन्मच घेणार नाहीत. अनेक स्त्रियांचे अश्रू असेच वाहत राहतील. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की ''एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ'' या विचाराची अंमलबजावणी करून आपल्या गरजू बहिणींना आधार देऊ तरच आजचा दिवस सार्थकी लागेल.