1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Uddhav Thackeray's Criticism CM Fadnavis

उद्धव ठाकरेंची टीका: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंगालमध्ये प्रचारात व्यस्त आणि राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Uddhav Thackeray
मुंबईत झालेल्या भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सभेत उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार भाष्य करत सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, इतक्या वर्षांचे नेतृत्व करणे सोपे नाही आणि आज जी परिस्थिती आहे, त्यावर बोलून काही बदल होणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
या सभेचा उद्देश पुढील दिशा ठरवणे असल्याचे सांगताना त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या काळातील आठवणी जाग्या केल्या. दत्ताजी साल्वी यांनी सर्व काही सोडून संघटनेसाठी काम करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला.
 
सध्याच्या राजकारणावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, आज स्वार्थाची स्पर्धा सुरू असून लोक आणि विचार सहजपणे बदलले जात आहेत. कामगार संघटनांमध्येही व्यापारीकरण वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उद्योगपतींशी ओळखी असल्या तरी आपली नाळ कामगार आणि भगव्या विचारसरणीशीच जोडलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी परदेशात काम करणाऱ्या भारतीयांचे उदाहरण दिले. देशात परतल्यास रोजगार मिळणार नाही, या भीतीमुळे ते परत यायला तयार नाहीत, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर निशाणा साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. विरोधकांवर कठोर कारवाई करण्याच्या विधानावर टीका करत, “आम्ही हिंदू आहोत, अशा भाषेचा वापर का?” असा सवाल त्यांनी केला. तसेच महिला आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारावरून आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी जाणाऱ्या भाजप नेत्यांनी तिथल्या कायदा-सुव्यवस्थेवर टीका करण्याऐवजी आधी मुंबईतील गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेची परिस्थिती पाहावी, असा टोला त्यांनी लगावला.
 
त्यांनी म्हटले की, 
मुंबईसारख्या मोठ्या शहरात महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे. गुन्हेगारी वाढत असताना सत्ताधारी पक्षाकडून प्रभावी पावले उचलली जात नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
 
 उद्धव ठाकरे यांनी पुढे असेही सांगितले की,
पश्चिम बंगालमध्ये जाऊन राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्रातील आणि विशेषतः मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. भाजपवर टीका करताना त्यांनी असा आरोप केला की,
जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून फक्त राजकीय प्रचारावर भर दिला जात आहे.
 
भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले की, पक्षात पूर्वीच्या नेत्यांसारखी ताकद आता उरलेली नाही. पश्चिम बंगालमधील राजकारण, केंद्रीय यंत्रणांचा वापर आणि निवडणुकांतील हस्तक्षेप यावरूनही त्यांनी टीका केली. थेट लढण्याऐवजी यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
इतिहासाचा संदर्भ देत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ताराबाई यांच्या कार्याचा उल्लेख केला. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हा “महाराष्ट्र धर्म” असून तोच देशाला वाचवू शकतो, असा संदेश त्यांनी दिला.
 
एकूणच, या भाषणातून ठाकरे यांनी कामगार, महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि सध्याच्या राजकारणावर कठोर शब्दांत टीका करत आपल्या भूमिकेची पुनरुज्जीवन केली.
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
DC vs SRH: सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा ४७ धावांनी पराभव केला