बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 17 जानेवारी 2022 (11:35 IST)

कत्थक सम्राट बिरजू महाराज यांचे निधन, नातवासोबत खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला

कत्थक नृत्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले 83 वर्षीय बिरजू महाराज ऊर्फ पंडित ब्रजमोहन मिश्रा यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त मिळाले आहे. रविवारी रात्री उशिरा बिरजू महाराज आपल्या नातवासोबत खेळत होते. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध झाले. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना  दिल्लीतील साकेत येथील रुग्णालयात नेले, तेथे त्यांना  मृत घोषित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी ते किडनीच्या समस्येतून बरे झाले होते आणि सध्या डायलिसिसवर होते. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक अद्वितीय कलाकार गमावला आहे.
 
पंडितजी किंवा महाराजजी या नावाने प्रसिद्ध असलेले बिरजू महाराज हे देशातील अव्वल कत्थक नर्तकांपैकी एक मानले जातात. अनेक दशकांपासून ते कलाविश्वाचे प्रमुख आहेत. ते कत्थक नर्तकांच्या महाराजा घराण्यातील आहेत. त्यांचे काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील कत्थक नर्तक होते. याशिवाय त्यांचे वडील आणि गुरू अच्चन महाराज हेही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे मोठे कलाकार होते. कत्थक नृत्यातून सामाजिक संदेश देणारे बिरजू महाराज सदैव स्मरणात राहतील. कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे
देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केले. त्यांनी सत्यजित रे यांच्या 'शतरंज के खिलाडी' चित्रपटाला संगीत दिले होते. बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाने बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट उपाधी प्रदान केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कत्थक सम्राट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बिरजू महाराजांसोबतचा स्वतःचा फोटो शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले की, 'भारतीय नृत्य कलेला जगभरात एक विशेष ओळख मिळवून देणारे पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वाची कधीही भरून न येणारी हानी आहे. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांना माझ्या संवेदना आहे . ओम शांती!''