Last Modified: पुणे, ता. 13: , सोमवार, 13 जुलै 2009 (15:18 IST)
निळू फुले यांचे स्मारक उभारणार
मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे राज्य शासनातर्फे उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केली.
निळू फुले यांच्या निधनाचे वृत्त समजताच येवला तालुक्यातील (जि. नाशिक) आपला पूर्वनियोजित दौरा रद्द करून श्री. भुजबळ यांनी पुणे येथे धाव घेतली. येथील वैकुंठ स्मशानभूमीत निळू फुले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांनी श्रद्घांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, निळू फुले यांनी साकारलेल्या काही वादग्रस्त भूमिकांविरोधात आंदोलने झाली. पण तरी देखील आपल्या भूमिकांतून समाजातील त्रुटी मांडताना ते अजिबात नमले नाहीत. त्यातूनच त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिका साकार झाल्या. मोठ्या पडद्यावरील या लोकप्रिय कलाकाराचा फुले-शाहू-आंबेडकर यांचा अभ्यास दांडगा होता. समाजवादी विचारसरणीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली होती. बहुजन समाजाकरिता त्यांनी अनेक व्याख्याने दिली. सेवादलाच्या कलापथकाच्या माध्यमातून ते अनेक उपक्रमांत सहभागी झाले. त्याचबरोबर समाजसेवकांसाठी 50 लाख रुपयांचा सामाजिक कृतज्ञता निधी जमा करण्याच्या कामी त्यांनी दिलेले योगदान आदर्शवत असेच आहे. फुले यांच्या निधनाने एक समाजसुधारक आपल्यातून कायमचा निघून गेला आहे.