1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 15-year live-in relationship partner killed by girlfriend in Nasik

नाशिकमध्ये १५ वर्षांच्या 'लिव्ह-इन'चा थरारक शेवट; मित्रांच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, मृतदेह कसारा घाटात फेकला

नाशिकमध्ये एका धक्कादायक आणि संतापजनक गुन्ह्याची उकल झाली आहे. गेल्या सुमारे १५ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच प्रियकराचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे.
 
नेमकी घटना काय घडली?
मृत व्यक्तीची ओळख वसंत गोरखनाथ सातपुते (वय ४०, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी आहे. वसंत यांना मद्यपान आणि जुगाराचे गंभीर व्यसन होते. प्राथमिक अंदाजानुसार, याच कारणावरून त्यांच्यात आणि संशयित आरोपी हसीना शेख यांच्यात वारंवार खटके उडत होते. याच त्रासाला कंटाळून हसीना हिने तिच्या मित्रांच्या साथीने वसंत यांच्या हत्येचा कट रचला.
 
मृतदेहाची विल्हेवाट
वसंत यांचा गळा चिरून हत्या केल्यानंतर, हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह तब्बल १८ तास घरातच लपवून ठेवण्यात आला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कारचा वापर करून मृतदेह कसारा घाटात नेऊन फेकून देण्यात आला.
 
पोलीस तपास आणि कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने तांत्रिक माहिती आणि तपासाच्या आधारे कसारा घाटात शोधमोहीम राबवून मृतदेह शोधून काढला. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे ज्यात हसीना शेख (मृत वसंत सातपुते यांची लिव्ह-इन पार्टनर), साहिल शहा आणि मोईन शहा हे सामील आहेत.
 
सध्या पोलीस या तिन्ही संशयितांची चौकशी करत असून हत्येचा नेमका घटनाक्रम, त्यामागील मुख्य कारण आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
 
दीर्घकाळ सोबत राहिल्यानंतर घडलेल्या या निर्घृण हत्याकांडाने नाशिक परिसर पूर्णपणे हादरून गेला आहे.
पुढील लेख
पालघरच्या तारापूर एमआयडीसीमध्ये तीन शक्तिशाली स्फोट, ३ कामगार जखमी