मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:08 IST)

नाशिकच्या पोलीस अकादमीत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोनाबाधित

नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये गेल्या आठ दिवसात १६७ प्रशिक्षणार्थी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग तपास कामाला लागला असून संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसात नव्याने सहाशे प्रशिक्षणार्थींच्या रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाधितांपैकी १२१ प्रशिक्षणार्थींना ठक्कर डोम येथील कोव्हीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. 
 
राज्यभरातील पोलिस अधिकारी व शिपायांना नाशिकमधील पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर नियमित सराव सुरु करण्यात आले होते. सोबतच प्रशिक्षणार्थींना नियमित व साप्ताहीक सुट्ट्या देखील सुरु झाल्या होत्या. यात पंधरा डिसेंबर पुर्वी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एका प्रशिक्षणार्थीला सुट्टी देण्यात आली. पंधरा डिसेंबरला अकादमीमध्ये परतल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटू लागले. तपासणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सोळा डिसेंबरला ४२१ प्रशिक्षणार्थींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यात १५१ बाधित आढळले. त्यानंतर अकादमीत स्वॅब व रॅपिड ॲण्टीजेन मिळून एकुण ८९४ तपासण्या करण्यात आल्या. त्यातून १६७ बाधितांचा आकडा समोर आला आहे. अकादमी मध्ये सातशे प्रशिक्षणार्थी, कॅण्टीन, हॉस्टेल व अन्य सातशे असे एकुण १४०० जण राहतात. यात ५०६ जणांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. बाधित आढळलेल्यांपैकी बहुतांश पोलिस उपनिरीक्षक असून त्यांना ठक्कर डोम कोव्हीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. तर प्राणवायु पातळी खालावलेल्यांना मविप्र व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.