साई भक्तांवर निवारा शेड कोसळल्याने १७ भक्त जखमी, शिर्डी साई यात्रेदरम्यान इगतपुरीत मोठी दुर्घटना
इगतपुरी: साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन शिर्डीकडे निघालेल्या भाविकांवर इगतपुरी येथे मुक्कामाच्या ठिकाणी काळाने झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी निवारा शेड अचानक कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत चार महिलांसह एकूण १७ साईभक्त जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकी घटना काय?
जखमी झालेले सर्व साईभक्त ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील रहिवासी आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे सर्व भाविक मोठ्या श्रद्धेने पायी पालखी सोहळ्यासह शिर्डीच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांचा दुसरा मुक्काम इगतपुरी येथील 'साईभक्त निवास' येथे ठेवण्यात आला होता.
दिवसभराचा पायी प्रवास आटोपून सर्व भाविक रात्री या निवासात पोहोचले. रात्रीचे जेवण झाल्यानंतर काही भक्त विश्रांती घेत होते, तर काहीजण झोपण्याच्या तयारीत होते. नेमक्या याच वेळी मुक्कामाच्या ठिकाणचे निवारा शेड अचानक कोसळून थेट खाली असलेल्या भाविकांच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे झोपण्याच्या तयारीत असलेल्या भक्तांमध्ये एकच धावपळ उडाली.
जखमींची प्रकृती कशी आहे?
दुर्घटनेनंतर तातडीने मदतकार्य राबवून शेडच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या अपघातात एकूण १७ जण जखमी झाले आहे. दोन भाविकांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, त्यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तीन भक्तांना फ्रॅक्चर झाले आहे. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने शिर्डीची वारी करणाऱ्या या भक्तांच्या प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणीच ही दुर्घटना घडल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

