शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (10:47 IST)

2 व्यक्तींचा थंडीने गारठून मृत्यू, पशुधनालाही फटका

राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील अनेक भागात तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. त्यामुळे धुकं आणि पाऊस एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं.
 
पुण्यात येत्या तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील हवामान बदलल्याचा फटका रबी पिकांना आणि पशुधनालाही बसल्याचे कळून येत आहे. काल अहमदनगरमध्ये घराबाहेर असलेल्या 20 मेंढ्यांचा गारठ्यामुळे मृत्यू झाला. तर आता शिर्डीत थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. शिर्डीत नगर-मनमाड रोडवर एक तर कणकुरी रोडवर एक असे दोन मृतदेह आढळून आले आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून ते मृतदेह ताब्यात घेतले. एका मृतदेहाजवळ काही कागदपत्रे आढळून आल्याने त्यावरुन ही व्यक्ती शिर्डीत उपचारासाठी आली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. तर दुसऱ्या मृतदेहाजवळ मात्र काहीही आढळून आलेले नाही त्यामुळे ओळख पटलेली नाही.
 
लक्षद्वीप बेटापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारठून मेढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आंबेगाव तालुक्यातील धोंडमाळ शिवार येथे 35, शिंगवे येथे 20 ते 25, खडकी येथे 45, पिंपळगाव म्हाळुंगे येथे 3, खातपूर बुद्रुक येथे 32, वळती येथे 23 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी गावात 25 बकऱ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. इतर ठिकाणी देखील मेंढ्यांचा मृत्यू झाला असून जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे.