शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (09:59 IST)

पश्चिम महाराष्ट्रात 5.64 कोटींच्या वीजचोरीचा पर्दाफाश, पुणे जिल्ह्यात 889 ठिकाणी 81 लाखांची विजचोरी उघड

वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून  वीज चोरीविरुद्ध धडाक्यात मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तिसऱ्या एक दिवसीय मोहिमेत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत 1418 ठिकाणी 1 कोटी 28 लाख रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा महावितरणकडून नुकताच पर्दाफाश करण्यात आला आहे. तिनदा घेतलेल्या या एक दिवसीय विशेष मोहिमेत आतापर्यंत 4983 ठिकाणी 5 कोटी 64 लाख 32 हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वापर उघडकीस आला आहे. वीजचोरी व दंडाची रक्कम न भरणाऱ्या चोरट्यांविरुद्ध विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
 
आर्थिक संकटात असलेल्या महावितरणने  वीजहानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाईसह गेल्या ऑगस्टपासून पुणे प्रादेशिक विभागात  एक दिवसीय विशेष मोहीम सुरु केली आहे.प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे  यांनी याबाबत निर्देश दिले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागासह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक पथकांद्वारे वीजचोरीविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.यात पाचही जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी 16 हजार 527 वीजजोडण्यांच्या तपासणीमध्ये 1418 ठिकाणी 8 लाख 32 हजार युनिट म्हणजे 1 कोटी 28 लाख 8 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आला आहे.
 
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत वापर
या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात 889 ठिकाणी 81 लाख 19 हजार, सातारा  – 203 ठिकाणी 17 लाख 63 हजार, सोलापूर68 ठिकाणी 5 लाख 19 हजार, कोल्हापूर - 79 ठिकाणी 13 लाख 45 हजार आणि सांगली जिल्ह्यात  179 ठिकाणी 10 लाख 62 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे. आतापर्यंत तिनही एक दिवसीय मोहिमेत पुणे जिल्ह्यात 2535 ठिकाणी 3 कोटी 41 लाख 35 हजार, सातारा- 628 ठिकाणी 45 लाख 16 हजार, सोलापूर- 929 ठिकाणी 90 लाख 3 हजार, कोल्हापूर- 391 ठिकाणी 67 लाख 96 हजार आणि सांगली जिल्ह्यात 500 ठिकाणी 19 लाख 97 हजार असा एकूण 4983 ठिकाणी 5 कोटी 64 लाख 32 हजार रुपयांच्या विजेचा अनिधिकृत वापर उघडकीस आला आहे.