सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पंढरपूर , गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (08:27 IST)

पंढरीत 5 लाखांवर भाविक दाखल

vitthal pandharpur
महाराष्ट्राची दक्षिण काशी पंढरीत सावळ्या विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यास राज्याच्या कानाकोप-यातून सुमारे ५ लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. यामुळे पंढरीनगरी दुमदुमून गेली आहे. गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर २०२३ कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी पहाटे २.२० मिनिटांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह सत्ताधारी गटाचे आमदार, खासदार, राज्यातील दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
 
पंढरीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाचा कार्तिकी वारी सोहळा मोठ्या थाटात साजरा होत आहे. दोन दिवसांपासून दर्शन रांगेत सुमारे ३० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी उभे राहून दर्शन घेत आहेत. दर्शनासाठी सुमारे १५ तास लागत आहेत. दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. याच बरोबर भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. दर्शनासाठी १० पत्रा शेडची निर्मिती करण्यात आली असून भाविकांना दर्शन रांगेत कुलरची व्यवस्था, विश्रांतीसाठी कक्ष उभारण्यात आला. तसेच पिण्याचे पाणी, चहा, मोफत भोजनाची व्यवस्था तसेच तात्काळ औषधोपचार आणि इतर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कक्ष उभारण्यात आले आहेत. याच बरोबर मंदिर परिसर आणि ६५ एकर येथे लाडू प्रसाद केंद्र उभारण्यात आले आहे.