6 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या
अवघ्या 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणारी मुलगी आपल्या घराशेजारी असलेल्या शाळेसमोरील मैदानात खेळत होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ही मुलगी मैदानातच खेळत होती मात्र, खेळता-खेळताच ती गायब झाली.
संध्याकाळी 6 वाजेपर्यंतही मुलगी परत न आल्याने अखेर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुदखेड पोलीसांनी रात्रभर तिचा शोध घेतला पण मुलगी सापडली नाही. त्यानंतर काल म्हणजेच 15 जानेवारी रोजी सकाळी या मुलीचा मृतदेह मुदखेड जवळच्या उमरी रोडवर आढळून आला. मुख्य रस्त्याशेजारी झुडुपातच चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. चिमुकलीचा मृतदेह जिथे आढळला ते ठिकाण तिच्या गावापासून 12 किलोमीटर दूर आहे. या चिमुकलीवर अत्याचार करून अज्ञात नराधमाने तिची हत्या केल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी अत्याचार, हत्या आणि अन्य कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांची वेगवेगळी पथकं तैनात केली असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.