शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (16:28 IST)

मदतीचा हात! राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेकडून लसीसाठी २५ लाखाचा निधी

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरातील परिस्थिती तात्काळ आटोक्यात यावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोना लस खरेदीकरिता दिला. लसीकरणासाठी आमदार निधी देणारे ते शहरातील पहिलेच आमदार आहेत.
 
कोरोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या लसीकरण मोहिमेचा सध्या बोजवारा उडाला आहे. बहूतांश लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर, १८ ते ४४ वयोगटात ती टोकन स्वरुपात सुरु आहेत. तेथे ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जात आहे. १८ ते ४४ वयोगटाचे हे लसीकरण १ मे ला सुरु झाल्यावर लस व मनुष्यबळाचाही प्रश्न उभा राहण्याची भीती आमदार बनसोडे यांनी त्याअगोदर आठ दिवस वर्तवली होती.
 
हा प्रश्न उभा राहणार असल्याने त्यांनी या मोहिमेचे योग्य नियोजन करण्याची सूचना पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांना २३ एप्रिललाच केली होती. ती १ मे लाच  शंभर टक्के खरी ठरली. कारण पुरेशा लसीअभावी त्यादिवशी १८ ते ४४ चे लसीकरण सुरु झाले. मात्र ४५ वर्षावरील लसीकरण बंद पडले. म्हणून आता आमदार बनसोडेंनी या समस्येवर उतारा म्हणून लस खरेदीसाठी  २५ लाख रुपये दिले आहेत.
 
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र बसविण्यासाठी मार्च महिन्यात सव्वा कोटी रुपये आपल्या आमदारनिधीतून आमदार बनसोडे यांनी दिले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना आपला HRCT SCORE किती आहे,  हे आता मोफत कळणार आहे. त्यासाठी बाराशे ते पाच हजार रुपये शुल्क आहे. आता त्यांनी लस खरेदीसाठीही २५ लाख रुपये दिल्याने कोरोनासाठी सर्वाधिक निधी देणारे ते शहरातील पहिले आमदार ठरले आहेत. या निधीतून आपल्या पिंपरी मतदारसंघातील नागरिकांसाठी लस खरेदी करण्यात यावी, असे पत्र त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना दिले.