बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (12:09 IST)

विद्यार्थ्यांचे आधार नाही, शिक्षकांना पगार नाही

पुढील महिन्याभरात राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार काढून सरलमध्ये न भरल्यास शिक्षकांचे दिवाळीतील पगार रोखणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. मुख्य म्हणजे इयत्ता पहिली ते बारावीमधील 2 कोटी 24 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 75 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे आधार लिंक झाले आहे. तर 88 लाख 76 हजार विद्यार्थ्यांचे आधार तपासून घेणे बाकी असून 59 लाख 64 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढलेच नसल्याची आकडेवारी शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने 14 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढत राज्याच्या विद्यार्थी, शिक्षक, शाळा, संस्था यांच्यासाठी असणाऱ्या सरल या संगणक प्रणालीमध्ये माहिती अपलोड करण्यास सांगितले आहे. विविध टप्प्यांवर भरण्यात येणाऱ्या या माहितीसाठी शिक्षण विभागाकडून मुदत ठरवून देण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नाव, जात, जन्मतारीख, पत्ता या गोष्टींपासून आधार, शिक्षक मान्यता, शाळा नोंदणी या सगळ्याची माहिती शिक्षकांना सरल प्रणालीत भरण्यास सांगितले आहे. शिक्षण विभागाचा हा सरलमध्ये माहिती भरण्याचा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे, मात्र अद्यापही राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, संस्थांची आणि शाळांची माहिती सरल वर आलेली नाही. त्यामुळेच शिक्षण विभागाने संस्थानोंदणीसाठी 31 ऑगस्ट, स्टाफ पोर्टल भरण्यासाठी 15 सप्टेंबर तर संचमान्यता आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे.