1 ऑक्टोबरपासून रेशनदुकानवर आधारसक्ती
रेशनदुकानदारांचा काळाबाजर रोखून संबंधित व्यक्तीलाच धान्य मिळावे, या उद्देशाने अन्न व नागरी पुरवठा विभाग राज्यात 1 ऑक्टोबरपासून आधारकार्ड असलेल्यांनाच धान्य उपलब्ध करणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून रेशनदुकानदारही काळाबाजार करत असल्याची काही प्रकरणे उघडकीस आली होती. दुकानांमध्ये रेशन न आणता परस्पर विक्री करणे,कार्डधारकांच्या नावावरील धान्य भलत्याच व्यक्तीला देणे, आपल्या जवळच्या कार्डधारकाला मर्जिनुसार धान्य वाटप करण्याबाबतच्या तक्रारी वाढत होत्या. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अनेक तक्रांरीची गंभीर दखल घेऊन आधारकार्ड रेशनकार्डशी जोडलेल्यांनाच धान्य देण्याचे आदेश दुकानदारांना देणार असल्याचे समजते. रेशनसक्तीसाठी आधारसक्ती केल्यास राज्यात डिजीटल व्यवहार वाढतील, असा दावा बापट यांनी केला आहे. स्वतःचा अंगठा यंत्राला लावल्याशिवाय रेशन मिळणार नाही, त्यामुळे दुकानदारांना परस्पर धान्य विक्री करता येणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.