शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यस्तरीय आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार प्रदान समारंभ

विकास योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उन्नतीचे प्रयत्न -विष्णु सवरा
वन हक्क जमीन कायदा , पेसा कायदा आणि शासनाच्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उन्नतीचे प्रयत्न करण्यात येत असून  अडचणींवर मात करुन हे आव्हान शासन पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु  सवरा यांनी व्यक्त केला.महाकवी कालिदास कलामंदिर येथे आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित सन 2015-16 व 2016-17 सालच्या राज्यस्तरीय आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,  आमदार जे.पी.गावित, निर्मला गावित, महापौर रंजना भानसी, आदिवासी विकास सचिव मनिषा वर्मा, आयुक्त राजीव जाधव, आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, किसन तडवी आदी उपस्थित होते.सवरा म्हणाले, विभागातील योजनांचा हेतू आदिवासींचा विकास हा असून शासन त्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत आहे . अनेक स्वयंसेवी संस्थांचादेखील यात सहभाग आहे. स्वत:हून प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्या अशा व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा शासन नेहमी प्रयत्न करते. या प्रयत्नांमध्ये सगळ्यांचेच योगदान गरजेचे आहे. ‘देशको दे जो दान रे, वो सच्चा इन्सान रे’ ही प्रार्थना आपल्याला अशा कामासाठी सदैव प्रोत्साहित करते, असे ते म्हणाले.शासनाच्या प्रयत्नांबद्दल बोलताना मंत्री सवरा म्हणाले, दर्जेदार शिक्षण आदिवासी मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी 48 हजार मुलांना आतापर्यंत नामांकित इंग्रजी शाळात प्रवेश देण्यात आला आहे. शहरातील वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळू न शिकलेल्या विद्यार्थ्यांना निवासव्यवस्थेसाठी आर्थिक सहाय्य करण्यात येत असून त्यासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना आदिवासी विकास विभागात चांगल्या पदावर नियूक्ती दिली जाईल, असेही श्री.सवरा यावेळी म्हणाले.राज्यमंत्री भुसे म्हणाले,आदिवासींसाठी असलेल्या योजनांचे अतिशय सुंदर नियोजन मंत्रालय स्तरावर होते. या योजना आदिवासी भागाच्या विकासासाठी उपयुक्त आहेत. विविध संस्था आणि व्यक्ती शासनाच्या खांद्याला खांदा लावून या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कार्यातून इतरांनही प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती
प्रमोद गोपाळराव गायकवाड(नाशिक), रमेश एकनाथ रावले(कळवण), बजरंग बापुराव साळवे(पिंपळगाव, अहमदनगर), डॉ.कांतीलाल टाटीया(शहादा, नंदूरबार), श्रीमती सरस्वती गंगाराम भोये(विक्रमगड, पालघर), लक्ष्मण सोमा डोके(जव्हार, पालघर), हरेश्रर नथू वनगा(डहाणू, पालघर), मनोहर गणू पादीर(लोभेवाडी, कर्जत, रायगड), रामेश्रर सिताराम नरे(करंजाडी, महाड, रायगड), भगवान माणिकराव देशमुख(नांदेड), श्रीमती पौर्णिमा शोभानाथ उपाध्ये(गारखेडा, अमरावती), सुनिल गुणवंत देशपांडे(लवदा, धारणी, अमरावती), सदाशिव डोमा घोटेकर (सरपधरी, कळंब, यवतमाळ), सुखदेव नारायण नवले(कारकिन, पैठण, औरंगाबाद), राजाराम नवलुजी सलामे( म्हैसुली, देवरी, गोंदिया) व प्रमोद शंकरराव पिंपरे(गडचिरोली)   पूरस्कार मिळालेल्या सेवा संस्था
शाश्वत संस्था (मंचर पुणे),विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचलित राष्ट्र सेवा समिती(वसई, पालघर),डॉ.हेडगेवार सेवा समिती (नंदुरबार), आम्ही आमच्या आरोग्यासाठी (कुरखेडा, गडचिरोली),वनवासी कल्याण आश्रम (नाशिक), सुयश चॅरिटेबल ट्रस्ट( पुणे), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (कासार आंबावली, मुळशी,पुणे).