शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2023 (07:58 IST)

आम आदमी पक्षाकडून नाशिकच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांवर पुन्हा कारवाई

नाशिक -  आम आदमी पक्षातर्फे नाशिक मध्ये जितेंद्र भावे यांच्या कारवाईनंतर आता शहर सचिव जगबीर सिंग आणि नाशिक पश्चिम आणि मध्य चे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र गायधनी यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात आली आहे. कोणतेही कारण न देता पक्षाने यांना पद मुक्त केल्याचे पत्र पाठवले आहे.महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच पक्षातर्फे असे निर्णय घेतले जात असल्याने नक्की पक्ष वाढवायचा आहे की, संपवायचा आहे? अशी कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. नाशिकच्या अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू, त्यांच्याकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याने कार्यकर्ते नाराज झालेले आहे.जगबीर सिंग हे शहर सचिव असून गेल्या दहा वर्षापासून पक्षाचे अतिशय तळमळीने काम करत आहे,  महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन पक्ष वाढीसाठी  गेल्या दोन वर्षापासून सतत नाशिकच्या घराघरात जाऊन पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करत आहे. नवनवीन लोकांना पक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.तसेच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांची नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभेची जबाबदारी राजेंद्र गायधनी यांना देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी नाशिक शहरात विविध भागात पक्षाच्या नवीन २३ शाखा स्थापन करून कामाचा धडाका लावला होता. प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांना जबाबदाऱ्या देऊन काम सुरू केले होते. जवळपास ४२ इच्छुक उमेदवारांची यादी पक्षाकडे दिलेली होती. असं सर्व असताना पक्षाने कोणतीही पूर्वसूचना न देता डायरेक्ट जबाबदारीतून मुक्त करत असल्याचे पत्र काढून धक्का दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याविषयी नाशिकचे नवनियुक्त प्रभारी धनराज वंजारी  यांना देखील काही कल्पना नसल्याचे समजले. यामुळे पक्षातील अनेक सक्रिय कार्यकर्ते नाराज झाले असून, इच्छुक उमेदवार संभ्रमात पडले आहे. या संदर्भात दाद मागण्यासाठी लवकरच दिल्लीला अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. असे कार्यकर्त्यांनी कळविले आहे.