शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (11:19 IST)

अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू, फेसबुक लाइव्हमध्ये मॉरिसभाई काय म्हणाला होता?

abhishek ghosalkar
abhishek ghosalkar twitter
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी (8 फेब्रुवारीला) फेसबुक लाइव्ह करतानाच गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या गेल्याचे पोलिसांनी सांगितले. यातच घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे.
 
जेजे हाॅस्पिटलमध्ये पोस्ट माॅर्टमनंतर मृतदेह दहिसर येथील त्यांच्या घरी आणला आहे. आज शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर, आदित्य ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
ते लिहितात, "अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो."
 
या घटनेनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा विरोधकांनी मागितला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंडांना आश्रय देत आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. पुणे आणि मुंबईत होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना यामुळे विरोधकांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. गृहमंत्री फडणवीस अपयशी ठरल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
'एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे.' अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
 
पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ही घटना चुकीची घडलेली आहे. अशा घटना घडू नये अशा मताचे मी पण आहे. पण तुम्ही मी गप्पा मरतोय. संभाषण स्पष्ट आहे. संभाषण ऐकल्यावर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत असं स्पष्ट आहे. उठताना घोसाळकर म्हणतात, आम्ही बस घेऊन जाणार. घटना काळीमा फासणारी आहे. बाहेर पोलीस असेल तरी आत लोक धंदा-पाण्याचा गप्पा करतायेत. एक जण हाफ चड्डीत दिसतोय त्यात. नेमके काय याचा तपास झाला पाहिजे. विरोधकांना निमित्त मिळाले आहे. आम्ही नाकारत नाही. तू आणि मी एका खोलीत थांबलो तर सिक्युरिटीला बाहेर थांबा तर ते बाहेर थांबणार. मी कोणाचे समर्थन करतो असा अर्थ काढू नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा वर जाऊन चर्चा केलेली आहे."
 
मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला आहे. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
 
गोळ्या झाडल्यानंतर मॉरीसने देखील स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात मॉरिसचा मृत्यू झाला आहे अशी एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.
 
अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. अभिषेक हे मुंबईतल्या दहीसरच्या वार्ड क्रमांक एकचे माजी नगरसेवक होते. तसंच ते मुंबै बँकेचे संचालकदेखील होते. घोसाळकर पितापुत्र सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत.
 
खासगी वादातून हा गोळीबार झाल्याचं बोललं जातंय. अभिषेक यांना बोरीवलीच्या करूणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
 
सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या नगरसेविका आहेत. अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर हे माजी आमदार आहेत. बोरीवली मतदार संघात घोसाळकर कुटुंबाची राजकीय ताकद आहे.
 
मॉरिस नोरोन्हा हे दहिसरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते, त्यातून त्यांच्यात वाद होता, असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
 
आज बहोत लोग सरप्राईज होगे'
पूर्व वैमनस्य संपल्याचं दाखवत मॉरिसस आणि अभिषेक फेसबुक लाइव्हमध्ये एकत्र आले खरे. एकत्र आल्याचं दोघांनी दाखवलंही. हसून बोलत आता लोकांसाठी एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं. पण पुढे काय होईल याची कल्पना कुणालाच आली नव्हती.
 
या फेसबुक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर म्हणतात, आज मॉरिसभाईबरोबर एकत्र लाइव्ह येण्याची संधी मिळाली आहे, अनेकजण सरप्राइज होतील. तितक्यात त्यांच्याशेजारी मॉरीसभाई येऊन बसतो आणि आज बहोतसारे लोग सरप्राईज होंगे असं म्हणतो. त्यानंतर तो आगामी काळात आपण रेशन वाटू, साड्या वाटू असं म्हणतो.
 
पण आज एकत्र येऊन काम केलं तर चांगलंच आहे. त्यामुळे लोकांचे आशीर्वादही मिळतील. नाशिकच्या बसचंही काम आम्ही केलं आहे. यानंतर घोसाळकर सांगतात, मॉरिसभाई म्हणतात तसं आम्ही एकत्र आलो आहोत, लोकांच्यासाठी काम करणार आहोत, लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत. मॉरीसभाईनं आज धान्य आणि साड्या वाटण्याचा चांगला निर्णय घेतला आहे.
 
त्यानंतर मॉरिसभाई म्हणतो, हे सगळं मी यांच्याच मार्गदर्शनाखाली करत आहे. देवाच्या कृपेने यातून चांगलं काहीतरी बाहेर येईल. आता अभिषेक दोन मिनिटं बोलतील आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू असं सांगून मॉरिस उठून जातो.
 
10 तारखेपासून मुंबई-नाशिक, नाशिक मुंबई बस सुरू करणार आहोत. लोकांना एकत्र येऊन काम करू असं ते सांगतात. अध्येमध्ये मॉरिस येऊन जात असताना दिसतो.
 
यावेळेस घोसाळकर आमच्यातला गैरसमज दूर झाला आहे. आता यापुढे गरीब लोकांसाठी काम करत राहू असं ते सांगतात. विल गो आऊटसाईड गॉड ब्लेस यू असं सांगत घोसाळकर उठतात आणि त्यानंतर क्षणार्धात त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात.
 
'महाराष्ट्रात गुंडाराज' - संजय राऊत
काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.
संजय राऊत यांनी या प्रकरणी ट्वीट करून एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. त्यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
“महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे. अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय. आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत! फडणवीस राजीनामा द्या. ”
 
आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाही त्यांनी मागितला आहे.
 
गोळ्या झाडणारा मॉरिसभाई कोण आहे?
मॉरिसभाई नावाने प्रसिद्ध असलेला ही व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणवत होती.
 
मॉरिसभाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्यांच्याविरोधात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.
 
या मॉरिसवर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या मॉरिसभाईने एका महिलेची 88 लाखांची फसवणूक केली होती. तसंच या महिलेवर बलात्कार करून तिची व्हीडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीचा कथित व्हीडिओही व्हायरल झाला होता. एवढंच नव्हे तर न्यायालयात जात असताना त्याने पत्रकारांनाही धमकावलं होतं.
 
अशा बातमी आधी फक्त बिहार-उत्तर प्रदेशातून येत असत: वडेट्टीवार
ही घटना सामान्य माणसाला चीड आणणारी असून अशा बातमी आधी फक्त उत्तर प्रदेश किंवा बिहारमधून येत असत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
 
ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, "फेसबुक लाईव्ह वर एका लोकप्रतिनिधी वर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते?
 
"शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे.
 
"एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे.
 
"अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तरप्रदेश मधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे.
 
"राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. राज्यात काय सुरू आहे याची जाणीव तरी सत्ताधाऱ्यांना आहे का?" असं वडेट्टीवार म्हणाले.
 
माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही ट्वीट करुन सरकारवर टीका केली आहे. ते लिहितात, "गुंडाराज! फेसबुक लाईव्ह मध्ये गोळीबार करायचं धाडस येतं कुठून? जेव्हा कायद्याची भीती ऊरत नाही तेव्हाच हे घडते! आपलं राज्य एवढं असुरक्षित कधी पासून झालं, कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा ?
 
याबद्दल काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीही ट्वीट केले आहे, त्या लिहितात,
 
"जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले.
 
आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर या नवोदित राजकीय नेतृत्वावर बेधडक गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या भयानक प्रकरणाची चौकशी होईलच पण आता प्रश्न उपस्थित होतो तो कायदा-सुव्यवस्थेचा.. घोसाळकरांच्या कुटुंबियांचा.. अभिषेक यांच्या वडिलांचा.. त्यांच्या पत्नी-मुलाबाळांचा..
जिवंतपणी बापाला मुलाचं मरण पाहावं लागलं याहून मोठं दुर्दैव काहीच नाही. अभिषेक घोसाळकर यांना दोन लहान मुलं आहेत. त्यांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपून गेलं. आता पुढे काय? हा सवाल आपला जोडीदार गमावलेल्या त्यांच्या पत्नी तेजस्वी यांना सतावत असेल..
 
घोसाळकर कुटुंबावर कोसळलेलं हे दुःखाचं डोंगर फार मोठं आहे. मी त्यांच्या भावनांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. अभिषेक घोसाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
 
कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानाने महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच बिकट होत चालली आहे. वाढत्या गोळीबाराच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणे आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणे, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचे राजकारण वाढणे या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे. मुंबईकर हे त्यांच्या राहत्या परिसरात सुरक्षित आहेत याची हमी गृहमंत्री कशी देणार आहेत? याचे काही उत्तर आहे का त्यांच्याकडे?"
 
Published By- Priya Dixit